दुर्घटना की हत्या? (अग्रलेख)

रेल्वेगाडी आणि वाहनाच्या दुर्घटनेत आणखी 13 जणांचे बळी गेले. गुरुवारी उत्तर प्रदेशातील गोरखपूर जवळ कुशीनगर येथे हा अपघात झाला. त्यात वयाची दहा वर्षेही ज्यांनी पूर्ण केली नाहीत, अशा चिमुरड्यांना प्राण गमवावे लागले.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जवळपास सर्वच रेल्वे मंत्र्यांच्या कारकिर्दीत अपघात घडले आहेत. त्या त्या वेळी अपघातातील बळींच्या कुटुंबांच्या प्रती संवेदना व्यक्‍त करताना या त्रुटी दूर करण्याच्या घोषणा केल्या गेल्या आहेत. मात्र इतकी वर्षे झाली आणि कितीतरी बळी गेले, मंत्री बदलले तरी भारतीय रेल्वेला अजूनही ही मूलभूत सुविधा निर्माण करता आली नाही, ही शोकांतीकाच म्हणावी लागेल.

भयंकर बाब म्हणजे, त्यांना बिचाऱ्यांना त्यांचा मृत्यू डोळ्यासमोर दिसत होता. त्याच्या पंजातून निसटण्याचा प्रयत्नही त्यांनी केला. जिवाच्या आकांताने आरडाओरड केली. मात्र त्यांच्या पालकांनी ज्या विश्‍वासाने ज्या व्यक्तीकडे त्यांच्या वाहनाचे सारथ्य दिले होते. तो बहिरा होता; कानाने नाही, तर अकलेने! स्वत:चा जीव वाचवण्यासाठी टाहो फोडणाऱ्या त्या चिमुरड्यांचे आवाज त्याच्या कानापर्यंत पोहोचलेच नाहीत व त्या बिचाऱ्यांनी त्यांचा कोणताही दोष नसताना त्यांची जीवनयात्रा अवेळी संपवली.

अशा काही घटना घडल्या की, त्याला दुर्घटना म्हटले जाते. अमूक ठिकाणी दुर्घटना घडली. त्यात अमूक-तमुक बळी गेले. मृतांच्या नातलगांना काही लाखांची व जखमींना काही हजारांची मदत जाहीर केली जाते. सोपस्कार पूर्ण होतात व विषय तेथेच संपतो. पुन्हा पुढची कोणती दुर्घटना होइपर्यंत! पण खरेच ही दुर्घटना आहे का, हा खरा प्रश्‍न आहे. ज्या प्रकारे आता अपघात घडला आहे किंवा इतरही बहुतेक प्रकरणांत ज्या प्रकारे अपघात घडतात त्याला दुर्घटना म्हणण्यापेक्षा अत्यंत बेजाबदारपणा किंवा अगदी हत्या म्हणणेच योग्य ठरेल.

त्याचे कारण म्हणजे कोणीही विचार केला नसेल अशी अकल्पित घटना अचानक आणि अनपेक्षितपणे घडणे याला दुर्घटना म्हणतात. मात्र, ज्या बाबींची आपण खबरदारी घ्यायची असते, त्या संदर्भातील नियम पाळायचे असतात आणि इतरांबरोबरच स्वत:च्या जिवितालाही कोणता धोका निर्माण होणार नाही, याची पुरेपूर दक्षता घ्यायची असते. ते न करता त्याच्या अगदी विपरीत वर्तन करत अपघाताला निमंत्रण देणे याला दुर्घटना म्हणता येत नाही.

सिग्नल सुरू असताना गाडी पुढे दामटण्याचे प्रकार वाहतुकीने सदैव गजबजलेल्या आणि सतत घाईने धावत असलेल्या शहरांत सतत पाहायला मिळत असतात. नो एंट्री अथवा एकेरी वाहतूक असली तरी त्याकडे दुर्लक्ष करत विरुद्ध दिशेने भरधाव वाहने हाकणे आणि स्वत:सोबत दुसऱ्यांचाही जीव धोक्‍यात घालण्याचे प्रकार सर्रास घडत असतात. सन 2015 ची रस्ते अपघातांची आकडेवारी उपलब्ध झाली आहे.

त्यानुसार अशा अपघातांत त्या वर्षभरात तब्बल दीड लाख लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. या सगळ्या प्रकरणांचे जेव्हा विश्‍लेषण केले तेव्हा असे समजते की, त्यातील तब्बल एक लाख सहा हजार बळी हे वाहनचालकांच्या निष्काळजीपणामुळे व बेदरकारपणामुळेच गेले आहेत. तसे त्यांनी केले नसते, तर त्या लोकांचे प्राण वाचू शकले असते. कमाल 120 ते 140 च्या वेगाने वाहन हाकल्यावर अचानक मध्ये आलेल्या अडथळ्यावर कशी मात करणार? त्यावेळी जेव्हा चालकाकडून कोणती कृती केली जाते, तेव्हा ती घातकच असते. “मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक’ असे फलक महामार्गांवर लावलेले दिसतात. ते सजावट म्हणून नक्कीच लावलेले नसतात.

मात्र त्याकडेही गांभीर्याने पाहिले जात नाही. अपघातांची संख्या आणि त्याची आकडेवारी पाहिली तर दिवसाला 43 ते 50 मृत्यू या अपघातांत होत आहेत. कोठून येतात हे वाहनचालक? ते काही परग्रहावरून आलेले नसतात. मात्र आपल्याच बेदरकारपणाच्या नशेत असतात, एवढे खरे. रस्ते अपघात असो अथवा कोणत्या कारखान्यातील घटना असो, नियमांचे पालन केले गेले व पथ्ये पाळली गेली तरी बऱ्याच जणांचे प्राण संकटापासून आपण वाचवू शकतो. कुशीनगरचा अपघातही असाच सदोष मनुष्यवधाचा प्रकार आहे.

व्हॅन वेगात जात असताना समोरुन आलेली पॅसेंजर गाडी विद्यार्थी पाहत होते. मुले ओरडत होती. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या म्हणण्यानुसार, एका रेल्वेमित्रानेही व्हॅनचालकाला सावध करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने हेडफोन लावला होता व तो गाणी ऐकतच गाडी चालवत होता. त्यामुळे यापैकी कोणाचा आवाज अथवा सूचना त्याच्यापर्यंत पोहोचलीच नाही व जेव्हा पोहोचली तेव्हा उशीर झाला होता.रेल्वे फाटकावर रखवालदार नसल्यामुळे अपघात होतात, त्यामुळे आता सुधारणा केली जाईल व भविष्यात अशा घटना घडू नयेत, याकरता आवश्‍यक ती पावले उचलली जातील, या नेहमीच्या घोषणा पुन्हा एकदा करण्यात आल्या आहेत.

स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जवळपास सर्वच रेल्वे मंत्र्यांच्या कारकिर्दीत असे अपघात घडले आहेत. त्या त्या वेळी अपघातातील बळींच्या कुटुंबांच्या प्रती संवेदना व्यक्‍त करताना या त्रुटी दूर करण्याच्या घोषणा केल्या गेल्या आहेत. मात्र इतकी वर्षे झाली आणि कितीतरी बळी गेले, मंत्री बदलले तरी भारतीय रेल्वेला अजूनही ही मूलभूत सुविधा निर्माण करता आली नाही, ही शोकांतीकाच म्हणावी. जर फाटक असते, तेथे रखवालदार असता तर कदाचित झाली घटना टाळता आली असती, असे म्हणणे आपले दु:ख शितल करण्याचा प्रयत्न आहे.

त्यातून दुर्घटना थांबणार नाहीत हे निर्विवाद. तोच प्रकार मुख्यमंत्र्यांच्या समोर घोषणाबाजी करण्याचा व निषेध करण्याचा. हा अघोरी आणि अनावश्‍यक प्रकारही काल घडला. त्यातून बळी गेलेली मुले पुन्हा परत येणार नाहीत. उलट त्यामुळे घटनेचे गांभीर्य कमी होऊन तिला नको ते वळण लागते आणि मूळ मुद्दा मात्र बाजूलाच पडतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

1 COMMENT

  1. वरील अग्रलेख वाचण्यात आला नियम पाळल्याने होणाऱ्या दुर्घटनेत नक्कीच घाट होईल पण नियम न पाळणाऱ्यांवर तेव्हढाच परिणामकारक उपाय शोधांची गरज आहे त्यासाठी पावती फाडून दंड आकाराने अयशस्वी ठरत आहे तेव्हा रस्त्याचे नियम न पाळण्यावर तिथेच व त्याच ठिकाणी त्या वाहनांची मोडतोड होणे हा नियम असावयास हवा व दंड सुद्धा आकारला जावा एव्हढी खबरदारी घेऊनही जर परिणाम दिसून आला नाही तर भरडावं वाहने चालविणाऱ्यांचे शारीरिक नुकसान होईल अशी शिक्षा त्याच ठिकाणी देण्यात यावी कर्वे रस्त्यावर अथवा पॉड रस्त्यावर ह्याचे प्रत्यक्ष प्रात्यक्षित केले कि हि सुशिक्षित जनावरे गुमाने सरळ होतील ह्यात कोणतीही दयामाया , भेदभाव , उच्चनीच हा भेदभाव नसावा रेल्वे दुर्घटने बाबत तर बोलावयालाच नको आपले मंत्री अनावश्यक त्याच्या सुशोभीकरणावर पैसे खर्च करीत आहेत तोच पैसा फाट्यावरील बंदोबस्तावर खर्च केल्यास वरील होणाऱ्या दुर्घटना तळातील असे वाटते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)