दुरूस्तीविनाच पालखी सोहळा मार्गस्थ होणार?

खळद- पालखी मार्ग असलेला हडपसर -जेजुरी मार्गाचे चौपदरीकरणाचे काम अर्धवट अवस्थेत आहे. मात्र, श्री संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. त्यामुळे पालखी सोहळ्याच्या दुरूस्तीला मुहुर्त अद्याप मिळाला नाही. रस्त्याची दुरूस्ती होणार कधी? की, दुरूस्ती शिवायच पालखी सोहळा मार्गस्थ होणार असा प्रश्‍न वारकऱ्यांतर्फे विचारला जात आहे.
या महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना विश्वासात न घेता सुरू केल्याने गेली तीन ते चार वर्षांपासून अर्धवट अवस्थेत आहे. या रस्त्याला मोठ्या प्रमाणावर दुरूस्तीची गरज आहे. यामध्ये अनेक भागात दोन्ही बाजूने रस्ता झाला आहे. मधील भागातील रस्त्याचे काम न झाल्याने येथे बाजुच्या रस्त्यापेक्षा तीन ते चार फुटामधला रस्ता खोल अशी धोकादायक स्थिती आहे. तर काही भागात दोन्ही बाजूने कामे झालेली आहे. मधील दुभाजकाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मोकळी खडी आहे. यामुळे वाहन एका बाजुने दुसऱ्या बाजुला जाताना ही खडी रस्त्यावरच पसरते. काही भागात रस्ता करताना दुभाजकांचा विसरच पडला आहे.
अनेक ठिकाणी पुलांची अर्धवट कामे झाली आहेत. यामुळे या भागात सातत्याने अपघात होत आहेत. यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर अनेकांना कायमचे अपंगत्व आले आहे. अशा स्थितीत ही दुरूस्ती तातडीने होणे गरजेचे आहे. अन्यथा लाखोंचा वैष्णवांचा मेळा या मार्गावरून जात असताना हा मार्ग धोकादायक होऊ शकतो.
गतवर्षी शासनाने या मार्गाच्या दुरूस्तीसाठी सुमारे 30 कोटी रूपये खर्च केले. पण हे काम ऐन पालखी सोहळ्याच्या तोंडावर व पावसातच झाले. यामुळे पालखी वारीवरून परत येण्यापूर्वीच रस्त्यावरील डांबर उडाल्याचे व मार्गावर पुन्हा खडेड् पडल्याचे पाहावयास मिळाले. यामुळे असंख्य प्रवाशांनी या कामावर नाराजी व्यक्‍त केली होती.
ही सर्व स्थिती पाहता यावर्षी यामार्गाची दुरूस्ती लवकर पालखी सोहळ्यापूर्वी व पावसाळ्यापूर्वी होणार का? असा प्रश्‍न निर्माण होत आहे. तर आता हा राज्य मार्ग केंद्रीय महामार्ग घोषीत झाला असून हस्तांतराच्या प्रक्रीयेत अडकला असल्याचे समजते. यामुळे यावर खर्च करणार कोण?

  • आता केवळ दुरूस्ती करता येते – आवटे
    सार्वजनिक बांधकाम विभागाचे सासवड 1 चे उपअभियंता आवटे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी पालखी महामार्गाच्या दुरूस्तीला सुरूवात केल्याचे सांगितले. पण हा मार्ग आता केंद्राच्या ताब्या गेल्याने आमच्याकडून फक्‍त आम्ही केलेल्या कामावर पडलेले खडेड् बुजवण्याचे काम होत असल्याचे सांगितले. इतर कामासाठी राज्य शासनाकडून कोणतीही आर्थिक तरतूद नसल्याचे सांगितले. यामुळे या पालखी सोहळ्यापूर्वी इतर दुरूस्तीबाबत संभ्रम निर्माण इाला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)