प्रभात वृत्तसेवा

पुणे- पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून मतदार याद्या अद्यावतीकरणाची मोहिम हाती घेण्यात आली आहे. त्यानुसार मतदार यादीत नाव नोंदविणे, मयत, दुबार, स्थलांतरीत मतदारांचा शोध घेऊन त्यांची नावे कमी करण्यात येणार आहे. मतदार यादीतील दुबार अथवा समान नावे असलेल्या मतदारांच्या घरी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) जाऊन पडताळणी करणार आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी मतदार आढळून येईल, अशा ठिकाणी मतदाराचे नाव कायम ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्निरिक्षण कार्यक्रमाची माहिती देण्यासाठी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये जिल्हाधिकारी राम यांनी ही माहिती दिली. यावेळी उपजिल्हा निवडणुक अधिकारी मोनिका सिंह उपस्थित होत्या.

भारत निवडणुक आयोगाच्या सूचनेनुसार छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनर्निरिक्षण कार्यक्रम जिल्ह्यात सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार निवडणुक निर्णय अधिकारी यांना प्रशिक्षण देणे, सर्व बीएलओ यांची नियुक्ती करून त्यांना प्रशिक्षण देणे, मतदार यादीतील तफावतींचा शोध घेणे, मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण करणे, मयत, दुबार मतदारांचा शोध घेऊन त्यांची नावे कमी करणे आदी कामे करण्यात येणार आहे. यामुळे मतदार यादी अद्यावत होण्यास मदत होणार आहे.

यावेळी जिल्हाधिकारी राम म्हणाले की, जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघाच्या मतदार यादीचे पुनर्निरिक्षण सुरू करण्यात आले आहे. मतदार यादीतील दुबार अथवा समान असलेली नावे संगणक प्रणालीद्वारे शोधली जाणार आहे. यामध्ये समान अथवा दुबार नाव आढळ्यास त्या मतदारांच्या घरी जाऊन पडताळणी करण्यात येणार आहे. त्यानंतर मतदाराकडून मतदार यादीतील नाव वगळण्यासाठीच्या अर्ज भरून घेतला जाणार आहे.

मतदारयादीमध्ये दुरुस्ती करण्यासाठी आणि नव्याने माहिती घेण्यासाठी बीएलओ घरोघरी जाणार आहेत. मतदार यादीत नाव नसल्यास त्यांची मतदार यादीत नावे समाविष्ट केली जाणार आहे. ही मोहिम 20 जून 2018 पर्यंत सुरू राहणार आहे. जिल्ह्यात 7 हजार 534 बीएलओंची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना ओळखपत्रही देण्यात आले आहे. या मोहिमेसाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)