दुचाकी वाहन क्षेत्रातील आघाडीची कंपनी ; टीव्हीएस मोटर्स कंपनी लिमिटेड

खूप जुनी गोष्ट आहे. 1911 मधील. दक्षिण भारतात एक व्यक्ती काही बस विकत घेऊन प्रवाशांची सेवा करत होती. त्याचबरोबर वाहनांचे सर्व्हिसिंग व दुरुस्तीचाही व्यवसाय सुरू केला होता. पण ही व्यक्ती एवढ्यावरच खुश नव्हती. त्या व्यक्तीची महत्त्वाकांक्षा तिला स्वस्थ बसू देत नव्हती. त्या व्यक्तीचे नाव होते. टी. व्ही. सुंदरम अय्यंगार. त्यांनी स्थापन केलेली कंपनी पुढे टीव्हीएस ग्रुप बनली. वाहनांचे निरनिराळे सुटे भाग बनवण्याच्या महत्त्वाच्या क्षेत्रातून वाढ होत होत आज या ग्रुपमध्ये जवळपास 90 कंपन्या आहेत. या सगळ्या कंपन्यांचे 2015-16 मधील एकत्रित उत्पन्न होते 40,000 कोटी रुपये.

आज या ग्रुपमधील आघाडीची कंपनी असलेल्या टीव्हीएस मोटर्सचे वार्षिक उत्पन्न आहे 13,500 कोटी रुपये. आजच्या घडीला टू व्हीलर बनवणारी ही भारतातील तिसऱ्या क्रमांकाची कंपनी आहे. आकार आणि व्यवसाय या दोन्ही आघाड्यांवर ही टीव्हीएस ग्रुपमधील सर्वात मोठी कंपनी आहे. 1982 साली इंडियन मोटारसायकल प्रा. लि. या नावाने कंपनीची सुरवात झाली. या कंपनीने पुढे सुझुकी कंपनीशी सहकार्य करार करून वाटचाल सुरू केली.

याच सुमारास लोकांना गरज होती छोट्या वाहनाची. मोपेड होत्या पण सगळ्या एक सीटर. या कंपनीने पहिली 50 सीसी इंजिन क्षमतेची दोन जणांना प्रवास करता येईल अशी मोपेड बाजारात आणली आणि पाहता पाहता तिने बाजारपेठ काबीज केली. ती होती टीव्हीएस फिफ्टी. पाठोपाठ भारतात पहिल्यांदा जपानी कंपनीच्या सहकार्याने आली 100 सीसी मोटारसायकल. मोपेडमुळे भारतात दुचाकी वाहन चालवणाऱ्या स्त्रियांची संख्या वाढू लागली होती. ही बाब लक्षात घेऊन टीव्हीएसने 100 सीसी क्षमतेची छोटी आणि वजनाला हलकी स्कूटर बाजारात आणली. तिला नावही तसेच दिले. स्कूटी. आजही हे नाव आणि ही स्कूटर बाजारात आपले स्थान टिकवून आहे. लोक आजही हिला पसंती देतात. 1996-97 च्या काळात मोटारसायकलची बाजारपेठ वेगाने वाढू लागली होती. तेव्हा टीव्हीएस मोटारसायकल्सने दोन मॉडेल बाजारात आणली. त्यादेखील जपानी कंपनीच्या सहकार्याने बनवलेल्या. शोगन आणि शाओलीन अशी त्यांची नावे होती. दक्षिण भारतात या मोटारसायकलींना खूप प्रतिसाद मिळाला.

पुढील काळात आली टीव्हीएस फेरेरो आणि तरुणाईमध्ये धूम करणारी टीव्हीएस व्हिक्‍टर. विशेष म्हणजे टीव्हीएस व्हिक्‍टर पूर्णपणे भारतीय बनावटीची होती. भारत सरकारनेही त्याचे कौतुक केले. टीव्हीएस मोटर्स सतत आपल्या उत्पादनांवर सुधारणा आणि बदल करत होती व त्यानुसार ठराविक अंतराने त्यांची विविध मॉडेल बाजारात पदार्पण करत राहिली. टीव्हीएस सेन्ट्रा, टीव्हीएस स्टार आणि पाठोपाठ आणखी एक सुप्रसिद्ध नाव टीव्हीएस अपाचे मोटारसायकल. 2005-06 मध्ये कंपनीने आपले उत्पादन क्षेत्र इंडोनेशियापर्यंत वाढवले. 2007 मध्ये हिमाचल प्रदेशात नवा कारखाना सुरू केला. या सर्वातून नवीन अपाचे मोटारसायकल डिस्क ब्रेक सिस्टीम घेऊन बाहेर पडली.

आता किक स्टार्टचा जमाना मागे पडला होता. त्यातून 2009-10 मध्ये ऑटोक्‍लच मोटारसायकल बाजारात आली. टीव्हीएस हा मोस्ट ट्रस्टेड ब्रॅंड झाला होता. अपाचे आणि व्हिक्‍टरच्या निरनिराळ्या सुधारीत आवृत्ती बाजारात येत होत्या. आता लोकांना हवी होती स्टाईल आणि पॉवर. स्कूटरमध्ये हवी होती विविधता आणि सुविधा. स्पर्धा वाढत होती. मागे पडून चालणार नव्हते. मग ब्लू टूथ, मोबाईल चार्जर अशा सुविधा असलेल्या ज्युपिटर, झेस्ट, स्कूटीपेप, वेगो सारख्या स्कूटर्स, 100 ते 300 सीसीपर्यंतच्या मोटारसायकली आणि अगदी रिक्षांचे उत्पादन करण्यापर्यंत टीव्हीएसने मजल मारली. आजही या कंपनीची उलाढाल आणि प्रतिष्ठा दिवसेंदिवस वाढत आहे. अगदी महेंद्रसिंग धोनीपासून ते अमिताभ बच्चनसारखे सेलिब्रिटी कंपनीचे ब्रॅंड अम्बेसिडर आहेत. या सगळ्यांचा परिणाम कंपनीच्या आकडेवारीमध्ये दिसून येतो.

आज अनेक देशांमध्ये या कंपनीची कार्यालये आहेत. गेल्या 35 वर्षांमध्ये देशातील व परदेशातील अनेक रॅली आणि रेसिंग सर्किटमध्ये कंपनीने बक्षीसे मिळवली आहेत. त्यामुळे आपणही या कंपनीच्या दीर्घकालीन रेसमध्ये सहभागी व्हायला हरकत नाही.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)