दुचाकी रॅली, टायर पेटवून नोंदविला सरकारचा निषेध

आरक्षचा प्रश्न सुटत असेल, तरच राजीनामा- कोल्हे

कोपरगाव – सकल मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न माझ्या एकटीच्या आमदारकीच्या राजीनाम्याने सुटत असेल, तर मी लगेच राजीनामा दिला असता; पण सरकारमध्ये राहून सरकारची प्रतिनिधी म्हणून आरक्षण प्रश्नावर भांडू शकते, असे आ. स्नेहलता कोल्हे यांनी सकल मराठा समाजाच्या ठिय्या अंदोलनाच्या वेळी सांगितले.

-Ads-

कोपरगाव तहसीलदार कार्यालयासमोर सकल मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन दिवसभर सुरू होते. छत्रपती संभाजी महाराज व शिवाजी महाराजांच्या पुतळयाला पुष्पहार घालून हे आंदोलन सुरू करण्यात आले. या वेळी आ. कोल्हे म्हणाल्या, “”मी सरकारमध्ये आमदार असले, तरी शेतकऱ्यांच्या संपाला पाठिंबा दिला. मराठा समाजाच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. मी जनतेसाठी पक्षविरहीत काम करीत आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न 1980 पासून प्रलंबित आहे. तेव्हापासून मुख्यमंत्रिपदावर मराठी प्रतिनिधी होते. सध्याचे मुख्यमंत्री कानात सांगून आरक्षण देणार नाहीत. मनापासून आरक्षण देणार आहेत. कोणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले जाईल, अशी व्यवस्था हे सरकार करीत आहे.”

या वेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे युवानेते आशुतोष काळे म्हणाले, की अतिशय शांततेत मराठा समाजाने 58 मूकमोर्चे काढले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी काकासाहेब शिंदे या मराठा समाजाच्या तरुणाने कायगाव टोक येथे जलसमाधी घेतली. या घटनेने मराठा समाजाचा दबलेला आवाज पेटून उठला. मराठा समाजाच्या आंदोलनाचा आवाज हा निश्‍चितपणे सरकारपर्यंत पोहोचणार आहे. मराठा समाजाने सरकारपुढे ठेवलेल्या मागण्या रास्त असून इतर समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. या मराठा समाजाच्या आरक्षणाला आपला पूर्ण पाठिंबा आहे. मोर्चे, आंदोलन कोणतेही असो; माझी भूमिका प्रत्येक वेळी स्पष्ट असते.

समृद्धी महामार्ग असो, शेतकरी संप; मी माझी भूमिका स्पष्ट मांडलेली आहे. काही व्यक्ती आंदोलकांसमोर एक बोलतात आणि सरकारसोबत राहून वेगळी भूमिका घेतात. गेल्या वर्षी शेतकरी संप निर्णायक वळणावर पोहचलेला असताना, शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या शासन मान्य करणार होते; परंतु या शेतकरी संपात मिठाचा खडा कोणी टाकला, हे सर्वांना माहीत आहे. मी कोणत्याही शासकीय पदावर असतो, तर मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी राजीनामा फेकून दिला असता, यापुढे मराठा समाज आंदोलनाची जी दिशा, धोरण ठरवील, त्या धोरणांना माझा पाठिंबा राहील.

दरम्यान, आज संपूर्ण शहरात रस्त्यावर शुकशुकाट होता. बाजारपेठ ठप्प होती. ठिय्या आंदोलनाच्या ठिकाणी मराठा बांधवांसमवेत आमदार स्नेहलता कोल्हे, नगराध्यक्ष विजय वहाडणे, राष्ट्रवादीचे युवानेते आशुतोष काळे, संदीप वर्पे, उपनगराध्यक्ष विजय वाजे, जिल्हा परिषदेचे सदस्य राजेश परजणे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र जाधव, विकास आढाव, भाजपचे तालुकाध्यक्ष शरद थोरात, पराग संधान, शिवसेनेचे तालुकाप्रमुख शिवाजी ठाकरे, उपजिल्हाप्रमुख प्रमोद लबडे, नगरसेवक सपना मोरे, प्रतिभा शिलेदार, विजया देवकर,स्वप्नजा वाबळे, उमा वहाडणे, स्वप्नील निखाडे, जनार्दन कदम, डॉ. अजय गर्जे, जितेंद्र रणशूर, ऍड.नितीन पोळ, डॉ. अतीष काळे, बाळासाहेब आढाव, कृष्णा आढाव, विजय आढाव, ऍड.मनोज कडू, अशोक अव्हाटे, अनिल गायकवाड यांच्यासह मुस्लीम, दलित बांधवासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.

वर्दळीचे रस्तेही शांत..

कोपरगाव अगाराने आपल्या 32 बसेस आगारातून बाहेर काढल्याच नाहीत. त्यामुळे बससेवा ठप्प झाली होती. आगारातील 550 कर्मचारी कामाविना बसून होते. कोपरगाव आगाराचे एका दिवसाचे सव्वाआठ लाखांचे उत्पन्न बुडाले. नेहमी वर्दळीचा नगर-मनमाड महामार्ग आज निर्मनुष्य आणि वाहनाविना होता. शहरामध्ये चोख पोलीस बंदोबस्त लावला होता. यापूर्वीच्या आंदोलनाच्यावेळी काही कार्यकर्त्यांनी पाण्याच्या टाकीवर चढून आत्महत्या करण्याचा स्टंट केला होता. त्यांच्यावर पोलिसांनी विशेष नजर ठेवली होती. आंदोलकांवर गुन्हे दाखल करू नका, अशा सूचना कोल्हे यांनी पोलीस अधिकाऱ्यांना दिल्या.

छोट्या मुलीच्या भाषणाची मोहिनी

ठिय्या आंदोलनाच्या वेळी ऋचिका गव्हाणे या छोटया मुलीने आपल्या भाषणात सरकाचे वाभाडे काढले. तिचे खेड्यातील बोलीभाषेतील भाषण उपस्थितांची मने जिंकून गेले. तिच्या भाषणाने आ. कोल्हे यांनाही विचार करायला भाग पाडले. उपस्थित आंदोलकांनी टाळया वाजवून तिला दाद दिली.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)