दुचाकीस्वारची अज्ञाताने 85 हजाराची रोकड लांबविली

शिक्रापूर- पुणे-नगर रस्त्यावर अपघात झाल्यानंतर उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये जात असताना पाठीमागे बसलेल्या अनोळखी इसमाने दुचाकीस्वाराच्या बॅगेतील 85 हजार रुपये घेऊन पोबारा केल्याची घटना गुरुवारी (दि.28) रात्रीच्या सुमारास घडली. याबाबत मनोज राम पवार (रा. शिक्रापूर- मलठण फाटा, ता. शिरूर, जि. पुणे मूळ रा. देऊळगाव घाट, ता. आष्टी, जि. बीड) याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. त्यानुसार शिक्रापूर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, शिक्रापूर (ता. शिरूर) येथील एका वाहनाच्या शोरूममध्ये काम करणारा मुलगा मनोज पवार हा त्याच्या ताब्यातील दुचाकीहून त्यांच्या शोरूमच्या कामानिमित्ताने वाघोली येथे गेला होता. वाघोली येथे जात असताना त्याच्याजवळील बॅगेमध्ये शोरूमची 85 हजार रुपये रोख रक्कम ठेवलेली होती. वाघोली येथील काम आटोपून मनोज हा पुन्हा दुचाकीहून शिक्रापूरकडे येण्यासाठी निघाला. साडेसातच्या सुमारात मानोज कोरेगाव भीमापासून पुढे काही अंतरावर आला असताना अचानक एक महिला त्याच्या दुचाकीला आडवी आली. त्यावेळी मनोजचा त्या महिलेला धक्का लागल्याने ते दोघेही खाली कोसळले.
यावेळी तेथे काही नागरिकांनी गर्दी केली. त्यांनी त्या महिलेला एका दुचाकीवरून सणसवाडी येथील खासगी रुग्णालयात पाठविले. त्यानंतर काही नागरिकांनी मनोजला देखील सणसवाडी येथे रुग्णालयात जाण्याची विनंती केली. तेव्हा मनोज रुग्णालयात जात असताना अचानक एक अनोळखी व्यक्‍ती तेथे येऊन म्हणाला, “मला देखील तुझ्या सोबत रुग्णालयात येऊ दे’. मनोजने त्याला देखील दुचाकीवर पाठीमागे बसविले. त्यावेळी मनोजच्या बॅगमध्ये ठेवलेली रक्कम होती.
तेव्हा मनोज आणि अनोळखी व्यक्‍ती सणसवाडी येथे आले असता त्या व्यक्‍तीने मनोजला त्या महिलेला शिक्रापूर येथील रुग्णालयात नेले आहे. आपण तिकडे जाऊ असे सांगितले. त्यांनतर मनोज शिक्रापूरच्या दिशेने आला असता त्या अनोळखी व्यक्‍तीने बजरंगवाडी येथे थांबण्यास सांगितले. मी येथील रुग्णालयात जातो. महिलेले दाखवून घेतो, असे सांगितले. त्यावेळी मनोजने त्या व्यक्‍तीकडे महिलेच्या उपचारासाठी एक हजार रुपये दिऊन मनोज पुढे गेल्यानंतर बॅगेमध्ये पैसे ठेवले असल्याचे त्याच्या लक्षात आल्याने त्याने बॅगेमध्ये पाहिले असता त्याला बॅगेची चैन उघडी दिसली. त्यामधील रक्कम गायब झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने त्या व्यक्‍तीचा शोध घेतला असता शोध लागला नाही. त्यानंतर मनोज पवार याने पोलिसात फिर्याद दिली. याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अनिल कोळेकर हे करीत आहेत.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)