दुकानदारीसाठी खेटे घालणारे लफंगे ट्रस्टी होवूच शकत नाही

आ. जयकुमार गोरे टोला : पिंगळी तलावात पाणी यायला सरकारने रुपयाही दिला नाही 

खटाव, दि. 25 (प्रतिनिधी) – मी माण खटावच्या स्वाभिमानी जनतेचा आणि मतदारसंघात येणाऱ्या पाण्याचा पुजारीच आहे. मला त्याचा अभिमानही आहे. पिंगळी तलाव कॅनॉलची वर्क ऑर्डर आघाडीच्या कार्यकाळातील सप्टेंबर 2014 मधील आहे. त्यापूर्वीच या कामाचे टेंडर झाले होते. उरमोडीचे पाणी पिंगळी तलावात आणायला या सरकारने एक रुपयाही दिला नाही. त्यामुळे डिपॉझीट जप्त झालेले आणि दुकानदारीसाठी मंत्रालयात खेटे घालणारे लफंगे ट्रस्टी होवूच शकत नाहीत, असा घणाघात आ. जयकुमार गोरे यांनी केला.

पिंगळी तलावात पोहचणाऱ्या उरमोडीच्या पाण्याचे यादव मळा येथे पूजन केल्यानंतर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी जेष्ठ नेते भास्कर गुंडगे, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष एम. के. भोसले, अर्जुन काळे, जि. प. सदस्य अरुण गोरे, नगराध्यक्षा साधना गुंडगे, उपनगराध्यक्ष दिलीप जाधव, धनाजी जाधव कॉंग्रेसचे नगरसेवकांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. गोरे पुढे म्हणाले, गेल्या चार वर्षांपूर्वीच मी उरमोडीचे पाणी माण तालुक्‍यात आणले आहे. लबाड आणि दुकानदारी करणाऱ्या विरोधकांनाही ते माहित आहे. आमदारकीचे डोहाळे लागलेल्यांना फोटोची भारी हौस आहे. मात्र, कॅनॉल आणि आलेले पाणीच कुठे आहे हे त्यांना माहित नाही. माझ्या मतदारसंघासाठी पाणी हा जीवन मरणाचा प्रश्न आहे. त्याची चेष्टा करु नका. एकदा समोरासमोर या. पाणी योजनांसाठी कुणी काय केले ते जनतेसमोर मांडू.

आ. गोरे पुढे म्हणाले, आलेले उरमोडीच्या पाण्यामुळे दहिवडीसह परिसराचा पाणीप्रश्न काही अंशी हलका होइल. मी जीवंत आहे तोपर्यंत विविध पाणीयोजनांचे शाश्वत पाणी आणणारच आहे. मी आणलेल्या पाण्याचे पूजन करण्याची विरोधकांची हौस कायमच पुरवली जाणार आहे. पाण्याचे श्रेय माझ्यावर विश्वास दाखवणाऱ्या जनतेचे आहे. त्या जनतेच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

भास्कर गुंडगे, एम. के. भोसले, दिलीपराव जाधव, साधना गुंडगे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमात आ. गोरे यांचा जनतेच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. माजी ग्रा. सदस्य बाळासाहेब जाधव यांनी कॉंग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला. प्रास्ताविक दिगंबर राजगे यांनी केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)