दीर्घायुष्याचे रहस्य

   कथाबोध

 डॉ. न. म. जोशी

कन्‌फ्यूशिअस नावाचे चीनमधील तत्त्वज्ञ होते. गहन, गूढ तत्त्वांचे विवेचन ते अगदी सोप्या भाषेत करून लोकांचे प्रबोधन करीत. एकदा एक जिज्ञासू साधक कन्‌फ्यूशिअस यांच्याकडं आला आणि त्याने अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली. शेवटी तो म्हणाले, “आता एकच प्रश्‍न!’ “विचारा कोणताही प्रश्‍न विचारा,’ तत्त्वज्ञ म्हणाले. “दीर्घायुष्याचं रहस्य काय?’
“सांगतो. तुम्ही जरा आत या.’ मग कन्‌फ्यूशिअस यांनी आपलं तोंड उघडलं आणि ते म्हणाले… “माझ्या तोंडात डोकावून बघा. काय दिसतंय?’ “जीभ आहे.’ “दात आहेत का?’ “नाही. दातांच्या फक्‍त खुणा आहेत, हिरड्यांवर. दात पडलेत.’ “ठीक. माणसाचा जन्म होतो तेव्हा तोंडात दात असतात का? जीभ असते का?’ “दात नसतात; जीभ असते.’

“दातांच्या आधी जिभेचा जन्म आहे. दात नंतर येतात. मग दात? जिभेच्या आधी दात पडतात. जीभ दीर्घायुषी आहे. दात नाहीत.’ “होय महाराज. पण मी विचारलेल्या प्रश्‍नाचा जीभ-दातांशी काय संबंध?’ “आहे ना. तुमच्या प्रश्‍नाचं उत्तरच त्यामध्ये आहे. कसं ते विचारा.’ “कसं काय?’ “दातांच्या आधी जीभ असूनही दात लवकर पडतात, अल्पायुषी ठरतात. कारण दात कडक असतात. जीभ मऊ असते. जीभ वळते. दात वळत नाहीत. दात ताठ असतात जीभ विनम्र असते. जीवनाकडे विनम्रपणे पाहिल्यामुळेच जीभ दीर्घायुषी होते. दात ताठ असल्यामुळे अल्पायुषी होतात.’
साधक काय समजायचं ते समजला.

   कथाबोध

मानवी जीवन अहंकार, ताठा, फुकाचा अभिमान यांनी झाकोळलेलं असलं तर त्याचा पूर्ण जीवनशैलीवर परिणाम होतो. माणसानं मऊ असावं. विनम्र असावा… जीवनानुभव घेण्यासाठी रसास्वाद घेण्यासाठी जिभेप्रमाणे त्याला वळता आले पाहिजे. तोंडाबाहेर जीभ काढून दुसऱ्याला वाकुल्या दाखवल्या तर कधी कधी जीभ दाताखाली अडकते आणि ती जायबंदीही होते. म्हणून जिभेनेसुद्धा आपली मर्यादा सोडून वागता कामा नये. दीर्घायुष्याचं रहस्य हेच आहे की मानसिक जीवन निरामयतेने जगा!


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)