दीर्घकाळ दुचाकी चालवल्यास मानसिक परिणाम?

सार्वजनिक वाहतूक व रस्त्यांचे जाळे यांसारख्या घटकांचा लोकांच्या आरोग्यावर मोठा प्रभाव पडतो. या दोन गोष्टींचा शहरातील वायू प्रदूषण आणि रस्त्यावरील अपघातांच्या संख्येवर देखील परिणाम होतो. पुण्यासारख्या शहरांमध्ये चांगली सार्वजनिक वाहतूक उपलब्ध नसल्यामुळे लोक दुचाकी वापरण्यास प्राधान्य देतात.
संशोधकांनी असे सुचवले आहे की खराब रस्ते, इंजिनचे कंप, आणि अनेक तास गाडी चालवल्यामुळे दुचाकी चालवणाऱ्यांना विविध प्रकारच्या आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागते. मान, पाय, व मणक्‍यांशी संबंधित समस्या दुचाकी चालवणाऱ्यांना जाणवतात.
गाडी, बस, किंवा मेट्रो रेल्वेमध्ये प्रवास करणाऱ्या लोकांच्या तुलनेत अधिक दुचाकीस्वारांचा दर वर्षी अपघातात मृत्यू होतो.
नागरिक, तसेच प्रशासकांना कदाचित या सर्व समस्यांचा अभ्यास असेलच, परंतु, दैनंदिन आधारावर, प्रचंड रहदारीमध्ये दुचाकीवर प्रवास करण्याच्या मानसिक परिणामाबद्दल सर्वांमध्ये फार कमी जागरूकता आहे. या विषयावर तज्ञांचे मत जाणून घेण्यासाठी आम्ही मनोविज्ञानी डॉ. मिनी राव, मानसशास्त्रज्ञ अक्षरा दामले आणि मनोचिकित्सक विक्रांत भुजबळराव यांच्याशी चर्चा केली.
राग आणि चिडचिड यावर ताबा ठेवणे गरजेचे आहे
आपले मत मांडताना चेन्नईस्थित मनोवैज्ञानिक डॉ. मिनी राव यांनी सांगितले कि प्रचंड रहदारी, ध्वनी प्रदूषण, धूळ आणि रस्त्यावरील वादां मुळे दुचाकी चालविताना व्यक्तीला भरपूर तणाव येतो. याशिवाय बहुसंख्य लोक रस्त्यांचे नियम पाळत नाहीत यामुळे निराशाही वाढू शकते व एखाद्या व्यक्तीवर नकारात्मक प्रभाव पाडतो. ऑफिसला जाताना असे काही घडल्यास कामावर देखील वाईट परिणाम होतो.
गाडी चालवताना राग आणि चिडचिड यावर ताबा ठेवणे गरजेचे आहे व त्यासाठी सकाळी घरून निघण्याआधी नाश्‍ता करून निघावे, कारण भुकेल्या व्यक्तीला राग लवकर येतो असे डॉ. राव यांनी सांगितले.
चिंता, तणाव आणि उच्च रक्तदाब
बेंगलोर स्थित मानसशास्त्रज्ञ अक्षरा दामले यांच्या मते अल्प कालावधीसाठी (1/2 महिने) दुचाकी चालवणाऱ्यांना मानसिक आरोग्यावर मोठा प्रभाव जाणवणार नाही. तथापि, जर व्यक्तीने दैनंदिन आधारावर दीर्घ अंतर प्रवास केला तर उच्चरक्तदाब, चिंता, ताण, व इतर मानसिक विकारांना सामोरे जावे लागू शकते. दुचाकी चालवताना येणाऱ्या शारीरिक आणि मानसिक तणावामुळे चारचाकी गाडीतून प्रवाससुखाचा ठरतो असे दामले यांचे मत आहे.
लोकांच्या आनंद पातळीवर होणारे परिणामही मोठे आहेत.
समीकरण सोपे आहे, लोक दररोज सुमारे 9 ते 12 तास कामाच्या ठिकाणी असतात. सरासरी, पुणे शहरातील वाहतूक आणि अन्य समस्यांमुळे लोक दोन ते तीन तास प्रवास करतात. त्यामुळे, आठ तास झोपण्यासाठी गृहीत धरले तर त्यांना वैयक्तिक व कौटुंबिक गोष्टींसाठी एक किंवा दोनच तास मिळतात. या मर्यादित वेळेत ते टीव्ही पाहतील, स्मार्टफोनमुळे व्यस्त राहतील, किंवा भोजनासाठी बाहेर जातील. या जीवनशैलीमुळे एखाद्या व्यक्तीला जीवनात खरे समाधान मिळू शकणार नाही व यामुळे त्याच्या / तिच्या आनंद पातळीवर नकारात्मक प्रभाव पडेल असे मत मनोचिकित्सक विक्रांत भुजबळराव यांनी मांडले.
सार्वजनिक वाहतूक थेट नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करू शकते. मोदी सरकारच्या स्मार्ट सिटीज मिशनमध्ये सार्वजनिक वाहतुकीवर जोर देण्यात आला आहे. पण दुर्दैवाने पुणे मेट्रोची कामाची गती, अडथळे, आणि चर्चा पाहता असे म्हणता येईल कि पुणेकरांना चांगल्या सार्वजनिक वहातुकीसाठी अनेक वर्ष थांबावे लागेल. तोपर्यंत, आपल्या आरोग्याशी तडजोड करण्या व्यतिरिक्त पुणेकरांकडे इतर पर्याय नाहीत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)