दीपिका व अतानू दास यांचे आव्हान संपुष्टात 

जकार्ता: भारताची अव्वल महिला तिरंदाज दीपिका कुमारीचे आशियाई क्रीडास्पर्धेतील आव्हान धक्‍कादायक पराभवामुळे उपउपान्त्यपूर्व फेरीतच संपुष्टात आले. त्यामुळे महिलांच्या तिरंदाजीतील वैयक्‍तिक रीकर्व्ह प्रकारात पदक जिंकण्याच्या भारताच्या आशा उद्‌ध्वस्त झाल्या. तसेच मोठ्या स्पर्धांमध्ये अपेक्षित कामगिरी करण्यातील दीपिकाचे अपयशही पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
दीपिकाने पात्रता फेरीत निराशाजनक कामगिरी केल्याने तिची 17व्या स्थानी घसरगुंडी झाली. तरीही ती अंतिम फेरीसाठी पात्र ठरली होती. पहिल्या फेरीत बाय मिळाल्यानंतर दीपिकाने दुसऱ्या फेरीत उत्तर कोरियाच्या हयांग जि रि हिच्यावर 6-2 अशी मात करीत विजयी सलामी दिली होती. परंतु तैपेई चीनच्या चिएन यिंग लेई हिच्याविरुद्ध आघाडीवर असताना नाहक चूक केल्यामुळे तिला उपउपान्त्यपूर्व फेरीतच पराभव पत्करावा लागला.
वास्तविक दीपिका यिंग लेईविरुद्ध तोपर्यंत आघाडीवर होती. परंतु तिसऱ्या सेटमधील शेवटून दुसऱ्या संधीला घोडचूक केल्यामुळे तिला 3-7 अशा पराभवाला सामोरे जावे लागले. दीपिकाने आशियाई स्पर्धेपूर्वी विश्‍वचषक तिरंदाजी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. तसेच चमकदार कामगिरी करीत विश्‍वक्रमवारीत अग्रस्थान मिळविल्यानंतर दीपिकाने रिओ ऑलिम्पिकमध्ये निराशाच केली होती.
त्याच वेळी अतानू दासने पुरुष गटात उपान्त्यपूर्व फेरी गाठली होती. अतानूने पहिल्या फेरीत कोरियाच्या योंग वोन पेकवर 7-3 अशी एकतर्फी मात केली. तसेच दुसऱ्या फेरीत कझाखस्तानच्या डेनिस गॅनकिनला 7-3 अशाच फरकाने पराभूत करून त्याने आगेकूच केली. मात्र पुरुष गटात उपान्त्यपूर्व फेरीपर्यंत मजल मारणारा एकमेव खेळाडू ठरलेल्या अतानूलाही इंडोनेशियाच्या साल्साबिला अगाटाविरुद्ध 3-7 असा पराभव पत्करावा लागला.
इतर भारतीय महिला खेळाडूंपैकी प्रोमिला दायमेरीने 642 गुणांसह 21वे स्थान मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला होता. परंतु मंगोलियाच्या उरनतुंगालाग बिशिंदीविरुद्ध 2-6 असा पराभव पत्करावा लागल्याने तिचे आव्हान दुसऱ्याच फेरीत संपुष्टात आले. तसेच पुरुष गटांत विश्‍वासने मंगोलियाच्या बाता पुरेवसुरेनवर 6-2 अशी मात करताना विजयी सलामी दिली होती. परंतु दुसऱ्या फेरीत त्याला कझाखस्तानच्या इल्फत अब्दुलिनकडून पराभव पत्करावा लागला.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)