दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात रुग्णावर उतार केल्याप्रकरणात डॉ. चव्हाणला अटक

न्यायालयाने सुनावली पोलीस कोठडी

पुणे – दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात रुग्णावर उतारा करून अंधश्रध्देला चालना देणाऱ्या डॉक्‍टराला अलंकार पोलिसांनी अटक केली. त्याला 2 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी विशाखा पाटील यांनी दिला आहे.
डॉ. सतीश शाहुराव चव्हाण (वय 45, रा. शुक्रवार पेठ) असे पोलीस कोठडी झालेल्याचे नाव आहे. या प्रकरणात उतारा करणारा मांत्रिक सचिन सदाशिव येरवडेकर (वय 48, रा. 306, कसबा पेठ) याला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. संध्या गणेश सोनवणे असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या तरूणीचे नाव आहे. त्यांचा भाऊ महेश विष्णू जगताप (वय 22, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. ही घटना 20 फेब्रुवारी ते 11 मार्च 2018 या कालावधीत स्वारगेट येथील चव्हाण नर्सिंग होम आणि दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात घडली. सोनवणे यांचे छातीमधील दुधाच्या गाठी काढण्याचे ऑपरेशन डॉ. सतीश चव्हाण याच्या चव्हाण नर्सिंग होममध्ये करण्यात येते होते. हे ऑपरेशन करताना मोठा रक्तस्राव झाला होता. त्यामुळे त्यांना पुढील उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिथे त्यांचा मृत्यू झाला होता. मात्र, त्यापूर्वी सोनवणे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात असताना सकाळी 7 ते 8.30 ही वेळ यमाची घंटा आहे, असे सांगून त्यांच्या कुटुंबियांना ऑपरेशन करण्यापासून परावृत्त करण्यात आले. बरे होण्यासाठी सोनवणे यांना मंत्र पठण करण्यास सांगितले. मांत्रिकास बोलावून त्यांच्या उतारा केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी डॉ. चव्हाण आणि मांत्रिक येरवडेकर यांच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमाणुष अनिष्ठ व अघोरी प्रथा व जादुटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्याचे समुळ उच्चाटन करण्याबाबतच्या अधिनियम 2013 चे कलम 3 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. चव्हाण याला अटक करून पोलिसांनी न्यायालयात हजर केले. त्यावेळी नक्की कोणत्या कारणासाठी हा गुन्हा केला, यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, मयत सोनवणे यांच्यावर नोव्हेंबर 2017 मध्ये पहिले, डिसेंबर 2017 मध्ये दुसरे आणि 20 फेब्रुवारी 2018 रोजी तिसरे अशी ऑपरेशन डॉ. चव्हाण याच्या नर्सिंग होममध्ये झाली आहेत. तिसऱ्या वेळी मोठा रक्तस्राव झाल्याने त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. दीनानाथ येथे केलेल्या उपचाराची कागदपत्रे प्राप्त झालेली असून, चव्हाण याने रुग्णावर केलेल्या उपचाराची कागदपत्रे जप्त करण्यासाठी, सोनवणे यांचा मृत्यू निष्काळजीपणामुळे झाला आहे का, त्यांच्या मृत्यूस कोण जबाबदार आहेत, उपचाराच्या वेळी डॉक्‍टरसोबत कोण नर्स अथवा कर्मचारी होते. याचा तपास करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी सहायक सरकारी वकील संध्या काळे यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने डॉ. चव्हाण याला पोलीस कोठडी सुनावली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)