पुणे – दीड हजार शिक्षकांची नोकरी धोक्‍यात

टीईटी उत्तीर्ण नसल्याने लागणार कात्री

पुणे – राज्यातील प्राथमिक व माध्यामिक शाळांमध्ये 13 फेब्रुवारी, 2013 नंतर नोकरीला लागलेल्या मात्र, शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) उत्तीर्ण न झालेल्या सुमारे 1 हजार 500 शिक्षकांची नोकरी धोक्‍यात आलेली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

राज्यातील विविध भागात स्थानिक स्वराज्य संस्था व खासगी शैक्षणिक संस्थांच्या बहुसंख्य शाळा आहेत. विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात शाळांमध्ये शिक्षकांची नियुक्‍ती करणे बंधनकारक आहे. डी.एड्‌., बी.एड्‌. उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शिक्षक भरती बंद असल्याने यातील बहुसंख्य उमेदवार बेरोजगार झाले आहेत. त्यातच राष्ट्रीय शिक्षक शिक्षण परिषदेने शिक्षकांच्या नोकरीसाठी “टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण होण्याची सक्‍ती केलेली आहे. त्यामुळे उमेदवारांची डोकेदुखी मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे.

सन 2013 नंतर नोकरीला लागलेल्या शिक्षकांना यापूर्वी तीन वेळा “टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मुदत देण्यात आली होती. मात्र, यात शिक्षकांना अपेक्षित यश मिळालेच नाही. आता शासनाकडून 30 मार्च, 2019 पर्यंत “टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अंतिम मुदत देण्यात आली आहे. या मुदतीत परीक्षेचे उत्तीर्ण प्रमाणपत्र सादर न केल्यास या शिक्षकांची सेवा संपुष्टात आणण्यात येणार आहे. दरम्यान, आता मार्चपर्यंत “टीईटी’ची परीक्षाही घेण्यात येणार नाही. त्यामुळे या शिक्षकांची नोकरी अडचणीत येण्याचीच जास्त शक्‍यता निर्माण झालेली आहे.

“टीईटी’ परीक्षा पात्र नसलेल्या शिक्षकांना आणखी एक वर्षांची मुदतवाढ देण्याची घोषणा शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी विधानपरिषदेत केली होती. मात्र, अद्याप याबाबत शासनाकडून अधिकृत कोणताही आदेश काढण्यात आलेला नाही. दरम्यान, शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळांकडून “टीईटी’ पात्र नसलेल्या शिक्षकांबाबतचा सविस्तर अहवाल मागविला आहे. मात्र, शाळांकडून अहवाल सादर करण्यासाठी नकारात्मकता दर्शविण्यात आलेली आहे. प्राथमिक शिक्षण संचालकांनी राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांकडून अहवाल मागविला आहे. त्याबाबतचे लेखी आदेशही त्यांनी बजाविले आहेत; परंतु या आदेशाला शिक्षणाधिकाऱ्यांकडून केराची टोपली दाखविण्यात आलेली आहे.

न्यायालयातही अपूर्णच माहिती सादर
“टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांची माहिती शिक्षणाधिकाऱ्यांकडून मागविण्यात आलेली आहे. मात्र, आतापर्यंत एकाही शिक्षणाधिकाऱ्यांकडून अहवाल दाखल करण्यात आलेला नाही. अहवाल प्राप्त झाल्यानंतरच “टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण नसलेल्या एकूण शिक्षकांची संख्या उघड होणार आहे. न्यायालयात सादर केलेली माहितीही परिपूर्ण नव्हती. ती अंदाजानुसारच मांडण्यात आली होती, अशी धक्‍कादायक वस्तुस्थिती प्राथमिक शिक्षण संचालनालय कार्यालयातील अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)