दीड लाख लाभार्थ्यांना योजनांचा लाभ

पिंपरी – महापालिका हद्दीत वास्तव्यास असणाऱ्या विविध घटकातील नागरिकांसाठी कल्याणकारी योजना राबविणाऱ्या नागरवस्ती विकास योजना विभागावर सर्वसाधारण सभेत सदस्यांनी अर्ज तापासले जात नसल्याचा आरोप केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून नागरवस्ती विकास योजना विभागाने 1 एप्रिल 2017 ते 6 मार्च 2018 या आर्थिक वर्षाच्या कार्यकाळात तब्बल 1 लाख 51 हजार 829 लाभार्थ्यांना योजनांचा लाभ दिल्याचा तपशील जाहीर केला आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभाग आणि महिला व बालकल्याण समितीअंतर्गत वेगवेगळ्या प्रकारच्या कल्याणकारी योजना राबविल्या जातात. त्यामध्ये महिला व बालकल्याण योजनेंतर्गत 21 घटक योजना राबविल्या जातात. इतर कल्याणकारी योजनेंतर्गत 2 घटक योजना राबविल्या जातात. अपंग कल्याणकारी योजनेंतर्गत 7 घटक योजना आणि मागासवर्गीय कल्याणकारी योजनेंतर्गत 6 घटक योजना राबविल्या जातात. योजनांच्या माध्यमातून सर्व घटकातील लाभार्थ्यांचे अर्ज मागविण्यात आले. अर्जांची छाननी करून पात्र आणि अपात्र लाभार्थ्यांची यादी केली. पात्र लाभार्थ्यांना आर्थिक लाभही देण्यात आला. मात्र, बहुतांश पात्र लाभार्थ्यांचे अर्ज वेळेत तपासले जात नसल्याचा आरोप सर्वपक्षिय नगरसेवकांनी केला. त्यावर नागरवस्ती विकास योजना विभागाचा पदभार नुकताच स्वीकारलेल्या सहायक आयुक्त स्मिता झगडे यांना स्पष्टीकरण देता आले नाही. त्यांना खोलात माहिती नसल्यामुळे हा विभाग तोंडघशी पडला. त्यावर समाज विकास अधिकारी संभाजी ऐवले यांनी याबाबत खुलासा दिला आहे.

नागरवस्ती विभागाने 1 एप्रिल 2017 ते 6 मार्च 2018 दरम्यान योजनांच्या लाभार्थ्यांचे अर्ज मागविले. प्राप्त अर्जांची छानणी केल्यानंतर 1 लाख 51 हजार 829 पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ दिला. त्यासाठी पालिकेने तब्बल 40 कोटी 53 लाख 2 हजार 789 एवढी रक्कम मोजली आहे. राज्यातील 26 महापालिकांच्या तुलनेत एवढ्या मोठ्या संख्येने पात्र लाभार्थ्यांना योजनेचा लाभ देणारी पिंपरी-चिंचवड महापालिका अव्वल स्थानी आहे, असा खुलासा ऐवले यांनी केला आहे. काही योजनांसाठी मुदतीत अर्ज मागविले जातात. तर, 15 योजनांचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांना वर्षभर अर्ज करण्याची सुविधा दिली आहे. विशेष म्हणजे सुमारे 200 वेळा सत्ताधारी, विरोधकांच्या नगरसेवकांना योजना राबविल्याची माहिती दिल्याचेही ऐवले यांनी म्हटले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)