दीड दिवसांच्या बाप्पांना आज निरोप

नदी घाटांवर सुरक्षा : जीवरक्षकही तैनात

पुणे – पुण्याचा वैभवशाली सार्वजनिक गणेशोत्सव निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी अग्निशमन दलाच्या वतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, दीड दिवसांच्या गणपती बाप्पांना शुक्रवारी निरोप दिला जाणार असून विसर्जन घाटावर 130 जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत.

भाविकांच्या सुरक्षेसाठी अग्निशामन दलाचे जवान दिवसरात्र खडा पहारा ठेवणार आहेत, त्याशिवाय याकाळात अग्निशमन दल जवानांच्या साप्ताहिक सुट्ट्या आणि रजा रद्द करण्यात आल्या आहेत.

गणेशोत्सवाच्या कालावधीत पोलिसांप्रमाणेच अग्निशमन दल जवानांवर मोठी जबाबदारी असते. त्यानुसार आपत्तीच्या घटना टाळण्यासाठी आणि आपत्तीच्या ठिकाणी वेळेवर पोचण्यासाठी दरवर्षी नियोजन करण्यात येते. त्यानुसार यावर्षीही नियोजन करण्यात आले आहे. अमृतेश्‍वर, पुलाची वाडी, नटराज सिनेमाच्या जवळ, ओंकारेश्‍वर, वृद्धेश्‍वर, गरवारे कॉलेज जवळ, पांचाळेश्‍वर, अष्टभुजा गार्डन, संगम, बंडगार्डन, विठ्ठल मंदिर, खंडुजीबाबा चौक, बापू घाट, ठोसर पागा, चिमा उद्यान, दत्तवाडी, वारजे स्मशानभूमी आणि सिध्देश्‍वर मंदिराजवळ असलेल्या विसर्जन घाटांवर अग्निशामन दलाचे जवान आणि जीवरक्षक तैनात करण्यात आले आहेत. त्यांचा शुक्रवारपासून या विसर्जन घाटांवर खडा पहारा असणार आहे, अशी माहिती अग्निशामन दलाचे प्रमुख प्रशांत रणपिसे यांनी दिली.

गणेश विसर्जनाच्या वेळी घाटांवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी अग्निशामन दलाच्या वतीने विशेष दक्षता घेण्यात आली आहे. त्यानुसार याठिकाणी नेमण्यात आलेले जवान, जीवरक्षकांना सुरक्षेच्या दृष्टीने लाईफ जॅकेटस, लाईफबॉय, रात्रीच्या वेळी नजरेस पडतील असे फ्लोरोसेंट जॅकेटस उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. तसेच भाविकांनी नदीच्या पाण्यात उतरु नये यासाठी काठावर आडवा दोर बांधण्यात येणार आहे, त्याशिवाय नदीपात्रातही काहीठिकाणी आडवा दोरखंड बांधण्यात येणार आहे. त्यामुळे आपत्तीच्या घटनेच्या वेळी या दोरखंडाचा वापर करणे शक्‍य होणार आहे, असेही रणपिसे यांनी स्पष्ट केले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)