दीड किलो मीटरच्या रस्त्याला कित्येक महिने

वडगाव-मावळ – पुणे-मुंबई महामार्गावरील वडगाव-मावळ येथील सेवा रस्त्याचे दीड किलो मीटरचे काम अनेक महिन्यांपासून रखडले आहे. अधून-मधून कधी तरी एखाद्या दिवशी काम चालू असल्याचे नाटक केले जाते. अर्धवट खोदलेल्या रस्त्यामुळे वाहने पलटी होऊन अपघात होतात, त्यामुळे वाहन चालक व नागरीक त्रस्त आहे. या रखडलेल्या रस्त्याचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

पुणे-मुंबई महामार्गावरून औद्योगीक क्षेत्रातील अवजड व इतर वाहतूक सतत सुरू असते. महामार्ग असल्याने या सेवा रस्त्याचे खूप महत्त्व आहे. स्थानिक आणि वाहन चालकांसाठी हा रस्ता अत्यंत आवश्‍यक आहे. रस्त्याने रयत शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी ये-जा करतात. त्यातच दीड किलो मीटर सेवा रस्त्याच्या कामासाठी जागो-जागी खोदकाम केले. गटाराचे तसेच पुलांचे अपूर्ण काम ठेवले आहे.

हा परिसर एकेकाळी लहान-मोठ्या वृक्षांनी अतिशय नयनरम्य होता. परंतु रस्ता बनवण्यासाठी कित्येक मोठ-मोठ्या वृक्षांचा बळी देण्यात आला. वृक्षांची कत्तल करण्यापूर्वी जेवढी झाडे काढली जातील, त्याच्या पाचपट झाडे लावू आणि जगवू, असे आश्‍वासन देण्यात आले होते. परंतु ना रस्त्याचे काम पूर्ण झाले ना वृक्षारोपणाचे. पर्यावरणाचा समतोल साधणारे कित्येक वृक्ष भुईसपाट करण्यात आले, परंतु त्या बदल्यात अद्यापही एकही रोपटे लावण्यात आले नाही. नयनरम्य निसर्ग या रस्त्यामुळे ओसाड झाला आहे.

पावसाळा दोन-अडीच महिन्यांवर येऊन ठेपला आहे. कित्येक महिने जे काम पूर्ण करता आले नाही, ते या दोन महिन्यात होईल का? अशी काळजी आता स्थानिकांना वाटू लागली आहे. प्रशासनाच्या दिरंगाईची मोठी किंमत स्थानिक नागरिकांना मोजावी लागत आहे. या अर्धवट खोदलेल्या रस्त्यामुळे कित्येक अवजड वाहने खाली घसरत आहेत. महामार्गाला साईट पट्ट्या नसल्याने अवजड व इतर वाहने घसरुन येथे रोज लहान-मोठे अपघात होत आहेत. रस्त्याच्या दुरुस्तीच्या वेळी लावलेले लोखंडी पत्रे वाऱ्याने महामार्गावर येत असल्याने अपघात होत आहेत. रस्त्याचे काम करताना गटाराचे नियोजन न करण्यात आले नाही. यामुळे दूषित सांडपाणी महामार्गालगत साचत असल्याने दुर्गंधीयुक्त वास यात असून नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आले आहे.

एखाद्या कामास जास्त वेळ घेतल्यास असले मानले जाते की ते काम खूपच उच्च गुणवत्तेचे होते आहे. परंतु येथे चित्र मात्र उलट आहे. कित्येक महिने घेऊन देखील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात आहे. निकृष्ट दर्जामुळे पावसाळ्यात हा रस्ता वाहून जाण्याची भीती नागरिकांनी व्यक्त केली आहे. या रखडलेल्या रस्त्याच्या कामामुळे विद्यार्थी जीव मुठीत घेऊन ये-जा करतात. पावसाच्या अगोदर सेवा रस्त्याचे काम पूर्ण करून तोडलेली झाडे नियमानुसार लावण्याची मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य चंद्रशेखर भोसले, माजी ग्रामपंचायत सदस्य बंडोपंत भेगडे, भरत म्हाळसकर, राजेश भोसले, प्रवीण चव्हाण, अनंता कुडे, किरण भिलारे, विनायक भेगडे आदींनी केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)