चॅंगवोन: दिव्यांश सिंग पन्वर आणि श्रेया आगरवाल या जोडीने कांस्यपदक पटकावताना येथे सुरू असलेल्या आयएसएसएफ जागतिक नेमबाजी स्पर्धेत भारताच्या खात्यात भर घातली. परंतु आजच्या दिवसातील भारताचे हे एकमेव पदक ठरले.

दिव्यांश आणि श्रेया या जोडीने ज्युनियर गटातील 10 मीटर एअर रायफल मिश्र सांघिक प्रकारांतील पात्रता फेरीत 834.4 गुणांची नोंद करताना अंतिम फेरी गाठली. या जोडीने 42 संघांमध्ये पाचव्या क्रमांकाने अंतिम फेरीत स्थान मिळविले. तसेच अंतिम फेरीत संयुक्‍तपणे 435 गुणांची नोंद करताना तिसऱ्या क्रमांकासह कांस्यपदकाची निश्‍चिती केली.

सोफिया बेनेट्टी व मार्को सुप्पिनी या इटालियन जोडीने सुवर्णपदक, तर सादेघियन अर्निमा व मोहंमद आमिर या इराणच्या जोडीने रौप्यपदकाची निश्‍चिती केली. एलॅव्हेनिल वेलारिव्हन व हृदय हझारिका या भारतीय जोडीला 829.5 गुणांसह 13व्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. आता स्पर्धेच्या चौथ्या दिवशी भारताच्या कात्यात तीन सुवर्ण, तीन रौप्य व तीन कांस्यपदकांसह एकूण नऊ पदके जमा झाली आहेत.

पुरुषांच्या 50 मीटर रायफल प्रोन प्रकारांत मात्र चैन सिंग 14व्या स्थानी राहिला. तसेच सांघिक स्पर्धेत भारताची 15व्या क्रमांकावर घसरण झाली. महिला गटात 28वा क्रमांक मिळविणाऱ्या तेजस्विनी सावंतची कामगिरी सर्वोत्तम ठरली. अंजुम मौदगिल 33व्या, तर श्रेया सक्‍सेना 54व्या क्रमांकावर राहिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)