दिव्यांग विद्यार्थ्याच्या लेखनिकासाठी ससूनचे प्रमाणपत्र नको!

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा “फतवा’ : सरकारी रुग्णालयावर अविश्‍वास

पुणे – दिव्यांग विद्यार्थ्याला परीक्षेसाठी लेखनिक मिळावा, याबाबत ससून रुग्णालयाने दिलेल्या प्रमाणपत्रावरच महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने अविश्‍वास दाखवला आहे. एवढेच नव्हे, तर या विद्यार्थ्यांची शारीरिक तपासणी खासगी रुग्णालयात केली जाणार आहे. याबाबत अविश्‍वास दाखवल्याने ससून रुग्णालयाने या निर्णयावर आक्षेप नोंदवला आहे.

रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांचे प्रमाणपत्र यामुळे डावलले जाणार असून सरकारी यंत्रणेवर विद्यापीठाने अविश्‍वास दाखवल्याचे ससून प्रशासनाचे म्हणणे आहे. नाशिक येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत एमबीबीएस, आयुर्वेद, दंत, युनानी, होमियोपॅथी अशा विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षा घेतल्या जातात. त्या आता सुरू होणार आहेत. दिव्यांग विद्यार्थ्यांना विद्यापीठाकडून परीक्षेसाठी लेखनिक किंवा ज्यादा वेळ दिला जातो. पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या दुसऱ्या वर्षातील एका विद्यार्थ्याच्या दोन्ही हातांना दुखापत झाली. त्यामुळे या विद्यार्थ्याला लेखनिक मिळण्यासाठी नियमाप्रमाणे ससून रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकांनी प्रमाणपत्र दिले. परंतु, आरोग्य विज्ञान विद्यापीठाने हे प्रमाणपत्र ग्राह्य धरले नाही. खासगी रुग्णालयात तपासणी होईल, असे या विद्यार्थ्याला कळवण्यात आले आहे. संबंधित रुग्णालयात विद्यापीठानेच तज्ज्ञांचे पॅनल नेमले आहे. या पॅनलमार्फतच तपासणी झाल्यानंतर लेखनिक किंवा ज्यादा वेळ देण्याबाबत मान्यता दिली जाणार असल्याचे विद्यापीठाने संबंधित विद्यार्थ्याला कळवले आहे. याशिवाय संबंधित विद्यार्थ्याला जिल्हा शल्यचिकित्सकाचे प्रमाणपत्रही आणण्यास सांगण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या या निर्णयावर महाविद्यालय प्रशासनाने नाराजी व्यक्त केली असून, कायद्याप्रमाणे ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता हे राजपत्रित अधिकारी आहेत. त्यामुळे खासगी किंवा सरकारी कामातही ससूनकडील “फिटनेस’ प्रमाणपत्रच ग्राह्य धरले जाते. असे असताना खासगी ठिकाणाहून प्रमाणपत्र मागणे म्हणजे शासकीय यंत्रणेवरच अविश्‍वास दाखवण्यात आल्याचे महाविद्यालय प्रशासनाचे म्हणणे आहे. याशिवाय ससून रुग्णालयातही वैद्यकीय पॅनल असते. असे असताना खासगी रुग्णालयात पॅनल नेमणे योग्य नाही, असेही महाविद्यालयाचे म्हणणे आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)