दिव्यांगाला पुस्तक विक्रेत्याकडून धक्काबुक्की

विद्यापीठात तणाव : विनापरवानगी व आक्षेपार्ह पुस्तक विक्री

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात विनापरवानगी व आक्षेपार्ह पुस्तक विक्री करणाऱ्याला अटकाव घालणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्याला पुस्तक विक्रेत्याने धक्काबुक्की केली. या प्रकारामुळे विद्यार्थी व संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेत गर्दी जमवून जोरदार घोषणाबाजी केली. यामुळे विद्यापीठात तणाव निर्माण झाला होता.

सचिन सतीश लांबुटे असे धक्काबुक्की झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून त्याने चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविलेली आहे. लांबुटे हा विद्यापाठातील राज्यशास्त्र विभागात द्वितीय वर्षात शिक्षण घेत असून तो अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा कार्यकर्ता आहे. सोमवारी, दुपारी 12.30 च्या सुमारास हरिती प्रकाशनाच्या पुस्तक विक्रेत्याने विद्यापीठाच्या आवारातील अनिकेत कॅन्टींनजवळ पुस्तक विक्रीचा स्टॉल लावला होता. यात जेएनयु राष्ट्रविरोधी डायरीसारखी आक्षेपार्ह व नक्षलवादाला समर्थन देणारी पुस्तकेही विक्रीसाठी ठेवली होती. विना परवानगी व आक्षेपार्ह पुस्तक विक्रीचा स्टॉल विद्यापीठाच्या आवारात का लावला? अशी विचारणा लांबुटे याने श्‍याम घुगे या पुस्तक विक्रेत्याकडे केली. त्यावर या विक्रेत्याने लांबुटे याला धक्काबुक्की केली. यावेळी काही विद्यार्थी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी पुस्तक विक्रेत्याची बाजू घेतली तर अभाविपच्या कार्यकर्त्यांनी पुस्तक विक्रेत्याच्या विरोधात भूमिका दर्शविली. यावेळी मोठ्या संख्येने विद्यार्थी व कार्यकर्ते जमा झाले व त्यांनी जोरदार घोषणाबाजी केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

विद्यार्थी व कार्यकर्त्यांची गर्दी जमल्याची माहिती मिळताच सुरक्षा रक्षकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. त्यानंतर सुरक्षा रक्षकांनी चतु:श्रृंगी पोलिसांना तत्काळ घटनेची माहिती देवून बोलावून घेतले. पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी गर्दी पांगवली व तणावाची परिस्थिती आटोक्‍यात आणली.

घटनेची चौकशी करून कारवाई
विद्यापीठ आवारात विनापरवानगी व आक्षेपार्ह पुस्तकांची विक्री करण्याचे प्रकार सतत घडत आहेत. दरम्यान, दिव्यांग विद्यार्थ्याला धक्काबुक्का करणाऱ्या पुस्तक विक्रेत्यांवर विद्यापीठ प्रशासनाने तत्काळ कारवाई करावी व त्याच्या विरोधात पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदवावी, अशी मागणी अभाविपच्या पुणे महानगरमंत्री अनिल ठोंबरे, पुणे विद्यापीठ शाखेचे अध्यक्ष अजय चौधरी यांच्यासह इतर कार्यकर्त्यांनी प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. या शिष्टमंडळाने घडलेल्या घटनेची सर्व माहिती डॉ. उमराणी यांना दिली आहे. त्यावर घटनेची सखोल माहिती घेऊन चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्‍वासन त्यांनी अभाविपला दिले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)