दिवाळी बाजारपेठेत प्लास्टिक बंदीला हरताळ

पिंपरी – पर्यावरण प्रदूषणाचा वाढता धोका लक्षात घेता महाराष्ट्र शासनाने पाडव्यापासून राज्यात प्लास्टिक बंदी लागू केली आहे. मात्र लागू केलेल्या प्लास्टिक बंदीला पिंपरी-चिंचवड येथील व्यापाऱ्यांनी हरताळ फासला आहे. दिवाळीच्या निमित्ताने बाजारपेठांमधील खरेदीच्या लगबगीचा फायदा घेत व्यापाऱ्यांनी प्लास्टिकचा साठा पुन्हा बाहेर ठेवला आहे. एवढेच नव्हे तर रांगोळी स्टिकरपासून ते आकाश कंदिलापर्यंत सारे काही प्लास्टिकचे साहित्य असल्याचे पहायला मिळत आहे.

पिंपरी बाजार दिवाळी निमित्ताने गजबजला असल्याने हजारो नागरिकांनी बाजारात दिवाळीच्या खरेदीसाठी मोठी गर्दी केली आहे. बाजारात आलेल्या प्रत्येक नागरिकांच्या हातात सर्रास प्लास्टिकच्या पिशव्या दिसत आहेत. कपड्यासाठी दुकानाच्या नावे प्लास्टिकच्या पिशव्या छापून ग्राहकांना वाटप करण्याचा प्रकार सुरु आहे. त्यांच्यावर महापालिका प्रशासनाकडून कुठलीही कारवाई होताना दिसत नसल्याने सर्वच व्यापाऱ्यांचे फावले आहे. पिंपरी भाजी मार्केटमध्ये कुठल्याही भाजी विक्रेत्यांकडे भाजी घेतली तर तो लगेच कॅरी बॅग काढून देतो. हे चित्र पाहिल्यावर राज्यातील प्लास्टिक बंदी रद्द केली की काय, असे चित्र निर्माण झाले आहे. गणेश उत्सव, दसरा, आणि आता दिवाळीतही पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन कारवाई करणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

प्लास्टिक बंदी जाहीर झाल्यानंतर विक्रेत्यांनी त्यांच्याकडे असलेला पिशव्यांचा साठा नष्ट करणे अथवा विघटनासाठी महापालिकेकडे जमा करणे गरजेचे होते. मात्र, व्यापाऱ्यांनी हा साठा दडवून ठेवला. त्यातच महापालिकेकडून प्लास्टिक साठा तपासणी न झाल्याने अद्यापपर्यंत हा साठा अबादित होता. दिवाळी सण सुरु होण्यास अवघे काही तास उरले आहेत. त्यामुळे खरेदीसाठी नागरिकांची एकच गर्दी झाली आहे. सर्व बाजारपेठा गर्दीने ओसंडून वाहत आहेत. अशा परिस्थितीत महापालिकेच्या यंत्रणेला कारवाई करणे शक्‍य नाही. याचा फायदा घेत विक्रेत्यांना प्लास्टिक पिशव्यांचा साठा बाहेर काढला आहे. प्लास्टिक बंदीचे नागरिकांनी स्वागत केले होते. मात्र, महापालिकेने कारवाईसाठी आखडता हात घेतल्याने नागरिकांनीही प्लास्टिक बंदी फाट्‌यावर मारली आहे.

काही दिवस प्लास्टिक बंदी चांगली आहे. म्हणून मी प्लास्टिक पिशव्या वापरणे टाळले. मात्र अवती-भवती सर्वच व्यापारी प्लास्टिकचा वापर करत होते. त्यांच्यावर कधीच कुणी कारवाई केली नसल्याने मी सुद्धा प्लास्टिक पिशव्या वापरायला सुरुवात केली आहे. काही ठिकाणी कारवाई झाली. मात्र, तोंड पाहून दंडाच्या पावत्या फाडल्या गेल्या. सर्व मार्केटमध्ये सर्रास प्लास्टिक व थर्मोकॉलचा वापर केला जात असल्याचे एका कापड विक्रेत्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)