दिवाळी आली, तरी बाजारात शुकशुकाट

इंदापूर तालुक्‍यात्यातील बाजारपेठांवर मंदिचे सावट : दुष्काळ, महागाईने ग्राहकांनी फिरवली पाठ

रेडा- दिवाळी म्हणजे भरपूर खरेदी, हे दरवर्षीचे चित्र यंदा पालटले आहे. गेल्या वर्षी जीएसटीमुळे वस्तूंच्या किमती वाढल्या होत्या त्याचा मोठा फटका बाजारपेठेला बसला होता. तर यंदा पावसाने दगा दिल्याने ग्रामीण भागाचे कबरंडेच मोडले आहे. दरम्यान, दिवाळी अवघ्या आठ दिवसांवर आली असली तरी इंदापुर तलुक्‍यातील बाजारात शुकशुकाट असल्याने बाजारावर मंदिचे सावट पसरले असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
दिवाळी सणाच्या पार्श्‍वभूमिवर दिवाळी साजरी करण्याकरीता घरोघरी व बाजार पेठेत दिवाळीची तयारी सुरू झाली आहे. बाजारपेठेत दुकानदारांनी ग्राहकांच्या पसंतीने व आवडीनुसार मागणीनुसार, विविध प्रकारच्या वस्तुंनी दुकाने थाटली आहेत. तालुक्‍यातील निमगाव केतकी, भिगवण, इंदापूर, नरसिंहपूर, वालचंदनगर या भागात दुकानदारांनी भरगच्च दुकाने माल भरून विक्रीसाठी सज्ज ठेवली आहेत. लक्ष्मी पुजनासाठी लागणारी केरसुणी, विविध रंगाचे व आकारचे आकाश कंदील, असंख्य डिजाईनच्या पणत्या, रांगोळीचे अनेक रंग, रेडीमेड फराळ, किरणा साहित्यासह कपडे, फटाके, आकाशदिवे, भेटवस्तू यांची दुकाने थाटली आहेत. नुसती दुकाने सजली मात्र, ग्राहक पणत्या सोडून दुसरे खरेदी करताना दिसत नाही.

 • ऑनलाईनकडे कल
  आकर्षक आकाशकंदील असो वा रंगीबेरंगी दिवे… सजावटीसाठी झिरमिळ्या असो वा विद्युत रोषणाईचे दिवे… कपडे, मोबाईल, टीव्ही आदी इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू आदी सगळे ऑनलाइन मिळत आहे त्यामुळे याच ट्रेंडमुळे बाजारापेठांसोबतच ऑनलाइन खरेदीलाही बहर आला आहे. घरबसल्या कपड्यांपासून दागिन्यांपर्यंत अशा कित्येक वस्तूंच्या खरेदीच्या ऑर्डर दिल्या जात आहेत. ऑनलाइन शॉपिंगवर खास ऑफर्सही मिळत असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांचा कलही ऑनलाइन शॉपिंगकडेही वाढला आहे.
 • कुंदनच्या रोगोळ्यांकडे कल
  सण व उत्सवात कुंदनच्या रांगोळी म्हणजे ग्रामीण भागातील जनतेचे वेगळे आकर्षण असते. गृहिणी व नोकरदार महिला या रांगोळ्या खरेदी करीत आहेत. पावडर रांगोळी काढण्यासाठी वेळ लागतो; परंतु कुंदनच्या रांगोळी सहजरित्या काढता येते म्हणून कुंदनच्या रांगोळी खरेदीकडे महिलांचा कल आहे.
 • यंदा आनंदावर विरजण पडणार
  गतवर्षीच्या तुलनेत या वर्षी फटाक्‍यांचे दर स्थिर आहेत. असे असले तरी देखील सर्वोच्च न्यायालयाने फटाके फोडण्याकरीता केवळ दोनच तासांचा अवधी दिला असल्याने यंदा आनंदावर विरजण पडणार असल्यानेही बाजारात गर्दी नसल्याचे बोलले जात आहे.
 • शेतकऱ्यांची दिवाळी अंधारात
  दिवाळी सण महागाईच्या तडाख्यात सापडला आहे. फराळ बनविण्यासाठी लागणाऱ्या डाळी, रवा, मैदा व कपडे पणत्या आकाश कंदिल यासह सर्व वस्तूंचे दर तब्बल 20 टक्‍क्‍यांपेक्षा दराने वाढल्या आहेत. त्यामुळे सर्व सामान्य जनतेचे दिवाळे निघणार आहे. तर दुसरीकडे भारनियमानामुळे बत्ती गुल होत असल्याने शेतकऱ्यांची दिवाळी अंधारातच होणार असल्याची चिंता शेतकऱ्यांना सतावू लागली आहे.
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)