दिवाळीनंतर शासकीय ग्रंथालयांची तपासणी

तपासणीनंतर अनुदान : अहवालासाठी 31 ऑक्‍टोबरपर्यंत मुदत

पुणे – जिल्ह्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची दिवाळीनंतर विशेष तपासणी पथकामार्फत तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतरच ग्रंथालयांना अनुदानाचा दुसरा हप्ता वाटप होणार आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुणे जिल्ह्यात एकूण 496 शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालये आहेत. ग्रामपंचायतीची 69 ग्रंथालये आहेत. या शासनमान्य ग्रंथालयांना त्यांच्या दर्जानुसार अनुदानाचे वाटप केले जाते. ग्रंथालयांना लेखा परीक्षण अहवाल सादर करण्यासाठी 31 ऑक्‍टोबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. ग्रंथालयांनी हे अहवाल सादर केल्यानंतर त्याची तपासणी करण्यात येणार आहे. या अहवालांची तपासणी पूर्ण झाल्यानंतर लगेचच ग्रंथालयांची प्रत्यक्ष विशेष पथकांमार्फत तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी दिवाळीनंतर सुरू करण्याचे नियोजन करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा ग्रंथालय अधिकारी श्रेया गोखले यांनी दिली.

विविध सामाजिक संस्था, संघटना, मंडळे यांच्यामार्फत शासनाची मान्यता घेऊन सार्वजनिक ग्रंथालये सुरु झालेली आहेत. शासकीय धोरणाची अमंलबजावणी करुनच ग्रंथालयांचे कामकाज पूर्ण करण्याचे बंधन प्रत्येक ग्रंथालयाला लागू करण्यात आलेले आहे. ग्रंथालयांच्या सर्व कामकाजाची अचानक तपासणी करण्यासाठी विशेष पथकाची नेमणूक करण्यात येणार आहे. या पथकात निरीक्षक, तांत्रिक सहाय्यक लिपीक आदींचा समावेश असणार आहे. मार्च अखेरपर्यंत या ग्रंथालयांची तपासणी पूर्ण करण्यात येणार आहे. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतरच ग्रंथालयांना अनुदानाच्या दुसऱ्या हप्त्यांचे वाटप करण्याचे धोरणही शासनाने निश्‍चित केलेले आहे.

स्थानिक नागरिकांकडून ग्रंथालयांच्या कामकाजाबाबत शासकीय जिल्हा ग्रंथालय कार्यालयात अनेकदा तक्रारी करण्यात येतात. तपासणी करताना या तक्रारींची दखल घेऊन योग्य ती कारवाई करण्यात येणार आहे. ग्रंथालयांची अवस्था, उपलब्ध असलेल्या सोयी सुविधा, पुस्तकांची संख्या, सभासदांची संख्या, ग्रंथालय नियमित चालू असते की नाही, अनुदानाचा वापर कशासाठी केला जातो, कर्मचाऱ्यांची व सभासदांची उपस्थिती असते की नाही, सभासदांच्या समस्या व सूचना आदींना तपासणी करताना प्राधान्य देण्यात येते. तपासणी पूर्ण झाल्यानंतर पथकामार्फत तपासणी अहवाल सादर केला जाणार आहे.

तपासणी पथकामार्फत अहवाल सादर झाल्यानंतर दोषी आढळलेल्या ग्रंथालयांवर कडक कारवाई करण्यात येणार आहे. नियमावली डावलून कामकाज करणाऱ्या ग्रंथालयांना अनुदानाचा दुसरा हप्ताच वाटप करण्यात येणार नाही, असा इशारा गोखले यांनी दिलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)