दिवाळीत “गोडवा’ राहणार कायम

पिंपरी – दिवाळी आणि मिठाईचे जणू काही एक अतूट नाते आहे. दिवाळी येताच मिठाईच्या दरांमध्ये नेहमीच वाढ होते; परंतु यंदा स्थिती बदलेली आहे. सध्या तरी बहुतेक मिठाईचे दर स्थीर असून काही मोजक्‍या मिठाईच्या दरात केवळ दहा टक्‍क्‍यांनी वाढ झाली आहे. दिवाळीस अद्याप दहा दिवस बाकी असून अजून बाजारात तेजी दिसत नसली तरी यावर्षी ग्राहकांचा कल चॉकलेट्‌स ऐवजी पारंपरिक मिठाईकडे असण्याची शक्‍यता आहे.
दरवर्षी शहरात दिवाळीला शेकडो टन मिठाईची विक्री होते. परंतु काही वर्षांमध्ये मिठाईची जागा ड्रायफ्रुटस्‌ आणि वेगवेगळ्या कंपनींच्या “चॉकलेट सेलिब्रेशन पॅक’ ने घेतली. मागील वर्षी मिठाई दरांत 20 ते 25 टक्‍के वाढ झाली. परंतु ग्राहकांना पुन्हा आपल्याकडे वळवण्यासाठी मिठाई व्यावसायिकांनी दर आणि गुणवत्ता दोन्ही नियंत्रणात ठेवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला आहे. दैनिक “प्रभात’ ला व्यावसायिकांनी सांगितले की, यंदा महागाई वाढली असली, तरी दर स्थीर ठेवण्याचा तसेच मिठाईची गुणवत्ता टिकवून ठेवण्याचा प्रयत्न आम्ही करीत आहे.

मिठाईला अच्छे दिन
गेल्या काही वर्षांत जाहिरातबाजीच्या जोरावर बहुराष्ट्रीय चॉकलेट कंपनींनी मिठाईच्या बाजारावर कब्जा मिळवला होता. मिठाई ऐवजी दिवाळीला चॉकलेटचे आकर्षक पॅकेट भेट म्हणून देण्याचे नवी पद्धत सुरू झाली होती. परंतु चॉकलेटस्‌ची गोडी नागरिकांना जास्त काळ धरुन ठेऊ शकली नाही. ड्रायफ्रुटस्‌ देखील महाग असल्याने पुन्हा एकदा मिठाईकडे लोक वळले आहेत. मिठाईमध्ये भेसळचे बरेच प्रकार पुढे आले होते. यामुळे देखील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. काही मोजक्‍या व्यावसायिकांच्या भेसळखोरीचा फटका या संपूर्ण क्षेत्रालाच बसला होता. परंतु आता व्यावसायिक आपल्या ग्राहकांना गुणवत्तेची हमी देऊ लागला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जास्त दिवस टिकणाऱ्या मिठाईला मागणी
अद्याप बाजारात म्हणावी तशी तेजी नसली, तरी काही लोकांनी मोठ्या ऑर्डर्स दिल्याचे व्यावसायिकांनी सांगितले. जास्त दिवस टिकेल, अशाच मिठाईला ग्राहक प्राधान्य देत आहे. त्यामुळे 24 तास टिकणाऱ्या मिठाईला खूपच कमी मागणी आहे. वर्षभरात क्‍वचितच दिसणारे लाडू, करंज्या, चकली हे पदार्थ देखील हळूहळू स्वीट मार्टस्‌मध्ये प्रवेश करू लागले आहेत.

मोठ्या व्यावसायिकांचे जीएसटीने काम वाढवले
जीएसटी लागू होऊन एक वर्ष उलटून गेले; परंतु अद्याप मोठ्या व्यावसायिकांना जीएसटीबाबत संभ्रम आहे, तसेच जीएसटीच्या वेगवेगळ्या स्लॅबस्‌मुळे काम वाढले आहे. मिठाईंवर वेगवेगळ्या दराने जीएसटी आकारला जात असल्याने ही स्थिती आहे. हा दर पाच टक्‍क्‍यांपासून अठरा टक्‍क्‍यांपर्यंत आहे. यामुळे बिलिंग करणाऱ्या व्यावसायिकांना एक नवा त्रास आहे. लहान व्यापारी सरसकट कर आकारुन दर निश्‍चित करत असल्याने ते कराच्या या फंद्यात जास्त पडत नसल्याचे दिसते. वेगवेगळ्या प्रकारच्या आणि उत्तम गुणवत्तेच्या मिठाई या दिवाळीत खायला मिळतील. यावर्षीचा जीएसटीचा गेल्या वर्षी इतका परिणाम जाणवत नाही.

अद्याप दिवाळीच्या दृष्टीने जास्त मागणी वाढली नाही. परंतु पुढे मागणी वाढण्याची शक्‍यता आहे. यंदा बहुतेक व्यावसायिकांनी मिठाईच्या दरांमध्ये कोणतीही वाढ केलेली नाही, तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या आणि उत्तम गुणवत्तेच्या मिठाई या दिवाळीत खायला मिळतील. यावर्षीचा जीएसटीचा गेल्या वर्षी इतका परिणाम जाणवत नाही.

– दिलीप तनपुरे, वंदन स्वीटस्‌, नवी सांगवी.

साखरेचा वापर करून तयार होणाऱ्या मिठाईवर वेगवेगळा जीएसटी आकारला जातो, मात्र त्याचा फारसा परिणाम झालेला नाही. इतर कसलाही कर न लागता एकच कर सध्या आकारला जात आहे. ग्राहकांना बिलामध्ये वेगळा जीएसटी आकारला जात नाही. गेल्या वर्षीच्या तुलनेत महागाई वाढल्याने साधारण 10% मिठाईच्या किंमतीत फरक पडला आहे.

– मोहनलाल चौधरी, चेतक स्वीटस्‌, थेरगाव, दत्तनगर लिंक रोड.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)