दिवाणी न्यायालयातील बेलिफला लाच घेताना रंगेहाथ पकडले

पुणे, दि. 12 (प्रतिनिधी) – शिवाजीनगर येथील दिवाणी न्यायालयात विरोधकाला नोटीस बजावण्यासाठी 500 रूपयांची लाच घेणाऱ्या बेलिफ याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. शनिवारी (दि. 12) सकाळी शिवाजीनगर येथील दिवाणी न्यायालयात ही कारवाई करण्यात आली. राजु रामचंद्र भुजबळ (वय 40) असे या बेलिफाचे नाव आहे.

तक्रारदारांचे उरूळीकांचन परिसरात कार्यालय असून त्याचे बांधकाम सुरू आहे. विरोधकाने तक्रारदारांच्या जागेत काम केल्यामुळे शिवाजीनगर दिवाणी न्यायालयात त्यांनी खटला दाखल केला होता. दरम्यान, विरोधात पाठवण्याची नोटीस तयार झाली असून ती पाठवण्यासाठी भुजबळ याने तक्रारदार यांच्याकडे 500 रूपयांची लाच मागितली. पैसे दिल्याशिवाय भुजबळ नोटीस पाठवणार अशी तक्रारदार यांची खात्री झाल्यावर त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. तक्रारीच्या शहानीशा केल्यावर विभागाने सापळा रचला. त्यानंतर कार्यालयातच तक्रारदारांकडून लाच घेताना भुजबळ यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. त्याच्याविरोधात लोणीकाळभोर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय लोकसेवकाने अशा प्रकारे लाच मागितल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार करण्याचे आवाहन विभागाचे अधिक्षक संदीप दिवाण यांनी केले आहे.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)