दिवसाला होतेय दोन दुचाकींची चोरी

File pic

शर्मिला पवार

पिंपरी – वाहन तोडफोडीप्रमाणे पिंपरी-चिंचवड कामगारनगरीला वाहन चोरीचे ग्रहण लागले आहे. हॅंडल लॉक तोडून सर्वाधिक चोऱ्या होत असून दिवसाला सरासरी दोन वाहने चोरीला जात आहे. वाहन चोरी करणाऱ्या टोळीपासून ते काही गॅरेज व्यावसायिक, वाहन खरेदी-विक्रीतील “एजंट’ यांच्यापर्यंत त्याचे जाळे पसरले आहे. हे जाळे मोडीत काढण्याचे आव्हान नवीन पोलीस आयुक्‍तालयासमोर आहे.

पिंपरी-चिंचवड शहराच्या लोकसंख्येने 21 लाखांचा टप्पा ओलांडला असून 16 लाखाहून अधिक वाहने वापरात आहेत. शहरात गेल्या 20 वर्षात वाढत्या लोकसंख्येबरोबरच वाहनांचे प्रमाणही वाढते आहे. सन 2001 मध्ये 1 लाख 64 हजार असणाऱ्या दुचाकी आता 11 लाख 69 हजारावर गेल्या आहेत. चार चाकी वाहनांची संख्या 2001 मध्ये 20 हजार होती. ती आता अडीच लाखांवर पोहोचली आहे. 2001 मध्ये शहरात दुचाकी, चारचाकीसह सर्व प्रकारची 2 लाख 10 हजार वाहने होती. हा आकडा 2017 मध्ये 15 लाख 68 हजारावर गेला आहे. एकीकडे वाहनांची संख्या वाढत असताना दुसरीकडे वाहन चोरांची चांदी झाली आहे. दिवसा-ढवळ्या वाहन चोरी, सुट्ट्या भागांची चोरी होत आहे. दुचाकींमधील इंधनही चोर काढून घेतात.

दिवसाला शहरात सरासरी दोन वाहनांची चोरी होत असल्याचे पोलिसांकडील आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. शहरात 15 ऑगस्टपासून स्वतंत्र पोलीस आयुक्तालय सुरु झाले. त्यानंतर 18 ते 20 ऑगस्ट या तीन दिवसांच्या कालावधीत शहरातून आठ दुचाकी चोरीला गेल्या आहेत. त्यातील पाच दुचाकी या सोमवारी (दि. 20) या एकाच दिवशी चोरीला गेल्याच्या तक्रारी विविध पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत. परिमंडळ तीनचे तत्कालीन पोलीस उपायुक्त गणेश शिंदे यांनी शहरात जनजागृती अभियान राबवून थेट नागरिकांशी संवाद साधण्याचे सुतोवाच केले होते. सोनसाखळी चोरी व वाहन चोरीबाबत या अभियानाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यात येणार होते. नागरिकांनीच सतर्कता बाळगली तर वाहन चोरी सारख्या गुन्ह्यांची संख्या कमी होऊ शकते. मात्र ही मोहीम शहरात एकच दिवस राबवली गेली. वाहन-खरेदी विक्री करणारे एजंट, स्पेअर पार्टस्‌ विक्रेते, गॅरेज व्यावसायिक, वाहन चोर अशांची मोठी साखळी वाहन चोरीच्या घटनांमागे कार्यरत आहे. यापूर्वी उघड झालेल्या वाहन चोरीच्या प्रकरणांमधून सातत्याने ही साखळी समोर येत आहे. ही साखळी नेस्तनाबूत करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.

अशी होते वाहन चोरी
वाहने चोरण्याचीही चोरांची एक पद्धत असते. आतापर्यंतच्या उघड झालेल्या चोरीच्या प्रकरणांनुसार, बनावट चावी आणि हॅंडल लॉक तोडून सर्वाधिक चोऱ्या झाल्या आहेत. यासाठी सक्रीय टोळ्यांचे काही सदस्य हे जागा व वाहनांची पाहणी करतात. त्यानंतर त्यांचाच एक साथीदार हॅंडल लॉक तोडून किंवा डुप्लीकेट चावीच्या सहाय्याने काही कळण्याच्या आत गाडी चोरून नेतो. पोलिसांच्या तपासानुसार दुचाकीचे जुने “मॉडेल’ चोरट्यांकडून लक्ष्य केले जातात. हिरो होंडा कंपनीची “स्पलेंडर वाय 2 के’ तसेच “मोपेड’ गाड्या चोरट्यांच्या रडारवर असतात.

वाहन चोरीची ठिकाणे
“नो पार्किंग झोन’ मधील वाहने चोरांकडून लक्ष्य केली जातात. हिंजवडी आयटीपार्कमध्ये वाहने चोरीचे प्रमाण शहरात सर्वाधिक आहे. हिंजवडी भागातील आयटी कंपन्यांमध्ये कर्मचाऱ्यांना हेल्मट सक्ती असून, हेल्मेट नसल्यास कंपनीच्या पार्किंगमध्ये वाहन लावण्यास मनाई केली जाते. यावेळी कर्मचारी त्यांच्या दुचाकी कंपनीच्या बाहेर “नो पार्कींग’ मध्ये लावतात. त्यामुळे त्यांना कोणतेही संरक्षण नसते. तर इतर घटनांमध्ये घरा खालील पार्किंग,उड्डाणपुलाखालील पार्किंग, हॉटेल पार्किंग अशा ठिकाणांहून देखील वाहन चोऱ्या होतात.

अल्पवयीनांचे प्रमाण अधिक
वाहन चोरणाऱ्या टोळीमध्ये अल्पवयीन मुलांचे प्रमाण हे लक्षणीय आहे. मौजमजेसाठी, कमी कालावधीत झटपट पैसे कमवण्यासाठी, घरच्यांकडून “पॉकेट मनी’ दिला जात नाही म्हणून तसेच वेगवेगळ्या दुचाकी चोरून त्यांचे प्रदर्शन करणे तसेच गाडीच्या इंजिनची विक्रीतून पैसे कमवणे अशा विविध कारणासाठी वाहनांची चोरी होते. दुचाकीतील पेट्रोल संपेपर्यंत गाड्या वापरल्या जातात ज्या दिवशी गाडीतील पेट्रोल संपेल त्या दिवशी दुचाकी आहे त्या ठिकाणी सोडून दिली जाते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)