दिवशी घाट बनलाय मृत्यूचा सापळा

ढेबेवाडी, दि. 14 (वार्ताहर) : पाटण तालुक्‍यातील ढेबेवाडी-पाटण रोडवरील दिवशी घाटातून जाताय…… जरा सावधान. कारण हा घाट अरुंद रस्ता, नागमोडी वळणे, वारंवार होणारे अपघात, यासाठी प्रसिध्द झाला आहे. सध्या पावसाचे दिवस सुरु असून या घाटामध्ये रस्त्यावर दरडी व दगड कोसळण्याचे प्रकार होवू लागले आहेत. याला सार्वजनिक बांधकाम विभागाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याने घाटातील प्रवास हा वाहन चालकांच्या जिवावर बेतण्याची वेळ आली आहे.
सध्या पावसाळ्यास प्रारंभ झाल्याने घाटामध्ये धोकादायक दरडी कोसळू लागल्या आहेत. यामुळे एखादा अपघात होऊन जिवितहानी होण्याची भीती निर्माण झाली आहे. धोकादायक दरडी तसेच तीव्र वळणांमुळे हा मार्ग धोकादायक बनला आहे. या ठिकाणी कोणतेही सूचना फलक लावलेले नाही. ठिकठिकाणी दरडी सुटलेल्या आहेत. त्या कोणत्याही क्षणी ढासळू शकतात, अशी परिस्थिती तयार झाली असून घाटरस्त्याने जाताना वाहनचालकांना कोणताही अंदाज येत नाही. त्यातच ठिकठिकाणी रस्त्यात पडलेले खड्डे, घाटातील अपुर्ण रस्त्याची कामे याची भर पडली असल्याने हा घाट जणू वाहनचालक व प्रवाशांच्या जीवावर बेतला आहे.
याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष झाले असून या घाटामधून प्रवास करताना वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत आहे. या घाटातील समस्यांचे गांभीर्य लक्षात घेवून बांधकाम विभागाने धोकादायक दरडी तातडीने काढण्यात. तसेच धोकादायक वळणे व दरडी या ठिकठिकाणी सूचना फलक लावावेत, अशी मागणी वाहनचालक व प्रवाशांमधून केली जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)