दिवंगत वडिलांची इच्छा केली पूर्ण

विशाल गुजर 

मुलींची दानशूरता


सांस्कृतिक भवनासाठी जमीन दिली दान

परळी : आपल्या दिवंगत पित्याची इच्छापूर्तीसाठी स्वत:च्या वाट्याला आलेली वडिलोपार्जित जमीन गावातील सांस्कृतिक भवन उभारण्यासाठी दान देण्याचा मोठेपणा दाखवत आपल्या वडिलांची इच्छा पूर्ण करण्याचे काम सौ. विमल शिवाजी जाधव व सौ. कमल बजरंग कदम या स्वातंत्र्यसैनिक कोंडीबा धोंडीबा पवार (बापूजी) यांच्या दोन कन्यांनी केले आहे. नुकतेच या सांस्कृतिक भवनाचे भूमिपूजन करण्यात आले.

एक-दोन गुंठ्याच्या तुकड्यासाठी एकमेकांच्या जीवावर उठणाऱ्या बंधूप्रेमाच्या अनेक घटना ताज्या असतानाच पांगारे सारख्या दुर्गम भागातील दोन भगिनींनी आपल्या माहेरच्या बाजूकडून वाट्याला आलेली जमीन गावात सांस्कृतिक भवन बांधण्यासाठी दान दिली आहे. विशेष म्हणजे त्यांचे वडिल स्वातंत्र्यसैनिक कोंडीबा धोंडीबा पवार उर्फ बापूजी यांना दोन्ही कन्याच.

स्वातंत्रसैनिक कोंडीबा पवार यांनी देश स्वातंत्र्य होण्यासाठी दिलेले योगदान आणि त्यांच्या मनात गावाप्रती असलेली निस्सीम श्रद्धा यामुळे आपल्या पांगारे गावातही इतर गावांसारखे एखादे चांगले सांस्कृतिक भवन असावे अशी इच्छा होती. ज्या सांस्कृतिक भवनामुळे गावासह परिसरातील अनेकांना आपले कलागुण विकसीत करण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या व्यक्तिमत्वाला झळाळी मिळावी, ग्रामीण भागातील अप्रसिद्ध कलाकारांना मोठे व्यासपीठ उपलब्ध होण्यासाठी त्याचा उपयोग व्हावा अशी त्यांची इच्छा होती.

दुदैवाने त्यांच्या हयातीत ही इच्छा पूर्ण झाली नाही मात्र, आपल्या वडीलांची ही इच्छा पूर्ण करण्याचा ध्यास घेतलेल्या सौ. विमल शिवाजी जाधव (रा. डांगेशेचीवाडी ता. सातारा) व सौ. कमल बजरंग कदम (रा. बोरणे ता. सातारा) यांनी त्यांच्या वारसा हक्काने आलेल्या जमिनीचे दानपत्र करुन ते समर्थ गणेश मंडळ (पुढील आवाड) पांगारे ता. सातारा यांच्याकडे नुकतेच सुपूर्द केले. दरम्यान, नुकतेच या जमिनीवर सांस्कृतिक भवन बांधण्याच्या कामाला भूमिपूजनाने प्रारंभ करण्यात आला.

वारसा जपला….
स्वातंत्र्य सैनिक म्हणून देशसेवा करणारे कोंडीबा पवार यांनी गावाच्या विकासासाठी योगदान दिले. सौ. विमल शिवाजी जाधव व सौ. कमल बजरंग कदम यांनीही आपल्या दिवंगत वडीलांच्या पश्‍चात हा वारसा आणि वसा जपण्याचा केलेला प्रयत्न निश्‍चितच कौतुकास्पद आणि इतरांसाठी आदर्श ठरावा असाच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)