#दिल्ली वार्ता : आधी मोदींचा पराभव; पीएमचा निर्णय नंतर 

 वंदना बर्वे 

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचे लोकसभेतील भाषण ऐकल्यानंतर 2019 ची निवडणूक “वन-साईड’ होणार नाही असं खात्रीशीर म्हणायला हरकत नाही. मोदी यांना पुन्हा पंतप्रधान होण्यापासून थांबविणं या मुद्यावर सगळ्या पक्षांमध्ये एकमत झालं आहे. आता त्यास अधिकृत आघाडीचं स्वरूप देण्याचे काम सुरू झालं आहे. ममता बॅनर्जी-सोनिया गांधी आणि शरद पवार-मायावती यांची भेट त्याच मोहिमेचा भाग होय! 

स्वातंत्र्योत्तर काळात विविध पक्षांची सत्ता केंद्रात राहिली आहे. मात्र, केंद्रातील सरकारविरूध्द राजकीय पक्षांमध्ये एवढा असंतोष कधीच पहायला मिळाला नाही; जेवढा आता दिसून येत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारवर कॉंग्रेसप्रणित संपुआतील पक्षच नव्हे तर रालोआतील पक्षसुध्दा नाराज आहेत. ही नाराजी सरकारच्या कामकाजाच्या पध्दतीमुळे असू शकते किंवा “व्हेस्टेड इंटरेस्ट’ साध्य होत नसल्यामुळेही असू शकतो. ही नाराजी दूर करण्याचे प्रयत्न न होणे ही गंभीर बाब आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आक्रमक झाले आहेत. ते आता आधीसारखे पोरकट विधान करीत नाहीत. भाजपचा दोन दशकांचा मित्र तेलगू देसम पक्षाच्या अविश्वास ठरावावर राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेले भाषण मोदी सरकारविरूध्द केलेली धुंवाधार बॅटींग होती असं भाजपचीच मंडळी मानतात. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी, कर्ज बुडविणाऱ्यांचे पलायन अशा मुद्यांवर केंद्र सरकार खिंडीत सापडली असतानाच आसाममधील “नॅशनल रजिस्टर ऑफ सिटीझन’चा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मुख्यमंत्री नितीशकुमार आणि मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू बिहार आणि आंध्रप्रदेशला विशेष राज्यांचा दर्जा देण्याची मागणी करीत आहेत. दोन्ही पक्ष सरकारवर नाराज आहेत. यामुळे कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आता देशभरातील क्षेत्रीय पक्षांची आघाडी करून 2019 च्या निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना पराभूत करण्याची योजना आखत आहेत. उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, बिहार या राज्यांमध्ये कॉंग्रेसची आघाडी झाली आहे. उत्तरप्रदेशात सप आणि बसपची आघाडी झाली असून कॉंग्रेस आणि चौधरी अजितसिंग यांचा रालोदही यात सामील आहे. बिहारमध्ये लालूप्रसाद यादव कॉंग्रेससमवेत आहे. महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेसची साथ आहे.

आता कॉंग्रेसची नजर अन्य राज्यांवर आहे. पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल कॉंग्रेसला सोबत घेण्याची तयारी आहे. तामिळनाडूमध्ये द्रमुक किंवा अन्नाद्रमुक यापैकी एकाला सोबत घेतले जावू शकते. जम्मू-काश्‍मीरमध्ये नॅशनल कॉन्फरन्सचा पर्याय आहे. या मोहिमेत राहुल गांधी यांचा भर आहे मायावती यांच्यावर. शरद पवार, अखिलेश यादव, लालूप्रसाद यादव, ममता बॅनर्जी ही मंडळी आपआपल्या राज्यांमध्ये दादा आहेत. परंतु, स्वत:च्या राज्याबाहेर त्यांचा फारसा प्रभाव नाही. मायावती यास अपवाद आहेत. उत्तरप्रदेशच्या बाहेर राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, बिहार, उत्तराखंड या राज्यांमध्ये मायावती यांची सॉलिड व्होटबॅंक आहे. कदाचित म्हणूनच भाजपाशासित राजस्थान, छत्तीसगड आणि मध्यप्रदेश या तिन्ही राज्यांमध्ये कॉंग्रेस मायावती यांच्याशी आघाडी करण्याच्या प्रयत्नात आहे. मायावती यांच्याशी आघाडी झाली तर दलितांची मते कॉंग्रेसकडे वळतील, असे राहुल गांधी यांना वाटत आहे. सन 2019 मध्ये भाजपला धडा शिकविण्यासाठी महाआघाडीत सामील होण्याच्या मुद्यावर शरद पवार यांनी मायावती यांच्याशी चर्चा केल्याचे समजते.

दुसरीकडे, मायावती एक-एक पाऊल विचार करून टाकीत आहेत. राहुल गांधी कॉंग्रेसकडून पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील असे विधान कॉंग्रेसच्या नेत्याने केले. तर, मायावती यांनी लगेच जाहीर केले की, आपल्याला सन्मानजनक जागा मिळाल्या तरच बसपा महाआघाडीत सामील होईल. याचा परिणाम असा झाला की, राहुल गांधी यांना स्पष्टीकरण द्यावे लागले. महाआघाडीचा पंतप्रधान कोणीही होवू शकतो आणि कॉंग्रेसचा त्यांना पाठिंबा असेल असे राहुल गांधी यांना स्पष्ट करावे लागले. मायावती यांनी एका दगडात दोन पक्षी मारले. अखिलेश यादव यांनाही संदेश दिला.

मायावती यांचे कौतुक व्हायला पाहिजे. त्यांना भाषण करणे जमत नाही. भाषण कला अवगत नाही. भाषणात शेरो-शायरी नाही किंवा एखादा विनोद नाही. चेहायावर कुठलेही हावभाव नाही. भाषण करताना उजवीकडे बघत नाहीत आणि डावीकडे बघत नाहीत. फक्त मान खाली-वर करतात. पाचवीचा पोरगा पुस्तकात बघून जसा धडा वाचतो; मायावती तशा भाषण वाचतात. यानंतरही लोकांमध्ये त्यांना पाहण्याची जबरदस्त क्रेझ आहे. बहनजींचे भाषण ऐकण्यासाठी दलितवर्ग 20-25 फूट उंच होर्डिंग्सवर चढायला मागे-पुढे पाहत नाही. यूपीच्या आग्रा आणि अलिगढ या दोन विभागातील जाटव मतदारांची संख्या साडे सहा लाख आहे. खरं म्हणजे हा मतदार मायावती यांची व्होटबॅंक नसून फिक्‍स्ड डिपॉझीट’ आहे.

सध्याचे यूपीतील वातावरण मायावती यांना अनुकूल आहे. सत्तेची चाबी दलित मतदारांच्या हाती आहे आणि हा मतदार म्हणजे त्यांचा फिक्‍स्ड डिपॉझीट’. मायावती यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असले तरी सामान्य नागरिकाला याचा त्रास कधिच होत नाही. मायावती यांच्या काळात राजा भैय्या यांच्यासारखे बाहुबली अंडरग्राउंड झाले होते. काहींना खडी फोडायला पाठविले होते.

नरेंद्र मोदी यांच्या लाटेत 2014 मध्ये बसपाचे पानीपत झाले असले तरी भाजपला मायावती यांच्या ताकदीची भाजपला जाणीव आहे. आणि सपा-बसपा-कॉंग्रेस आघाडी झाली तर परिणाम नक्कीच वेगळे येतील याचीही जाणीव आहे. यामुळे ही आघाडी होणारच असं भाजप मानून चालत आहे. अशात भाजपने दोन योजना तयार केल्या आहेत. पहिली म्हणजे आघाडी झाली तर काय करायचे? आणि दुसरी म्हणजे, 2014 सारखा निकाल आणण्यासाठी यूपीचे वातावरण मोदीमय करने. यासाठी भाजप काहीही करायला तयार आहे. जसे विद्यमान खासदारांचे तिकीट कापने, गैर यादव, गैर ओबीसी आणि गैर जाटव यांना जवळ करणे, मुस्लिम महिलांना सोबत घेवून हिंदुत्वाला चालना देणे. योगी मंत्रीमंडळातून काहींची सुट्टी होवू शकते आणि चांगल्या मंत्र्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरविले जावू शकते. भाजपसाठी आनंदाची बाब अशी की, स्वार्थाशिवाय एकजुट आलेल्या पक्षांची महाआघाडी फार काळ टिकत नाही. सध्या जी महाआघाडी अस्तित्वाला येत आहे ती मोदीविरोधांमुळे येत आहे.

विरोधकांच्या आघाडीमुळे कुणाचा फायदा होईल यापेक्षा नुकसान कुणाचे होईल? हा जास्त महत्वाचा प्रश्न आहे. मागच्या निवडणुकीत सपाचा यादव मतदार भाजपकडे सरकला होता. मात्र, मायावती यांचा जाटव मतदार बसपला सोडून कुठेही जात नाही. आतापर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीत ही बाब स्पष्ट झाली आहे. मात्र, कॉंग्रेसची नजर सपाच्या मुस्लिम मतदारावर आहे ही बाब सपाला खटकत आहे. यूपीच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार? कोण किती जागा लढविणार? कॉंग्रेस आघाडीत सामील होणार की नाही? असे प्रश्न सध्या अनुत्तरीत आहे.
मागील पाच वर्षांपासून जे नेते 2019 ची तयारी करीत आहे, त्यांचा मतदारसंघ दुसऱ्याच्या ताब्यात गेला तर ते काय करतील? हे पाहणे मजेशीर राहील. कारण, भारतीय जनता पक्ष जवळपास 40 टक्के खासदारांचे तिकीट कापणार असल्याची चर्चा आहे. शिवाय, राहुल गांधी यांना घेरण्यासाठी भाजप अमेठीवर खास लक्ष ठेवून आहे. रायबरेलीमधून सोनिया गांधी लढणार की प्रियंका गांधी? हाही एक प्रश्न आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)