#दिल्ली वार्ता: सर्वाधिक वादाच्या नोटबंदीचा भोपळा 

वंदना बर्वे 
नोटबंदीचा खरंच काही तरी परिणाम झाला काय, या प्रश्‍नाचं उत्तर मिळणे आवश्‍यक आहे. आपल्या अर्थव्यवस्थेत काळ्या पैशांची निर्मिती अजूनही सुरू आहे काय? आणि आताही काळा पैसा बनू शकतो अशी परिस्थिती आहे काय? हे दोन्ही प्रश्‍न अनुत्तरीत आहेत. 
देश लोकसभा निवडणुकीच्या रंगात रंगू लागला असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी नोटबंदीच्या निर्णयाची हवा निघाली आहे. रिझर्व बॅंकेच्या अहवालानुसार, हजार आणि पाचशे रुपयांच्या 99 टक्के नोटा बॅंकेत परत आल्या आहेत. काळा पैसा बाहेर काढणे आणि भ्रष्टाचाऱ्यांच्या मुसक्‍या आवळण्यासाठी नोटबंदी आवश्‍यक असल्याचा दावा, मोदी यांनी तेव्हा केला होता. मात्र, आता “राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला,’ असं म्हणण्याची वेळ आली आहे.
भ्रष्टाचार, काळा पैसा आणि काश्‍मीरातील दहशतवाद्यांच्या मुसक्‍या आवळण्याच्या नादात मोदी यांनी 125 कोटी भारतीयांचं कंबरडं मोडणारा नोटबंदीचा निर्णय घेतला होता, असं आता सहज म्हणता येईल. आरबीआय सांगते की, पाचशे आणि हजाराच्या 99.3 टक्के नोटा बॅंकेत परत आल्या आहेत. “तीन लाख कोटी रुपयाच्या नोटा बॅंकेत जमा होणार नाहीत’, असा अंदाज सरकारकडून व्यक्त करण्यात आला होता. अर्थात, हवामान खात्याच्या अंदाजाप्रमाणे पंतप्रधानांचा अंदाज चुकला आहे, असं खेदाने म्हणावे लागेल.
मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी घेतलेल्या नोटबंदीच्या निर्णयाला दुःखी मनाने का होईना पण देशवासीयांनी साथ दिली. महिना-महिनाभर दिवस-रात्र बॅंका, एटीएमच्या रांगेत उभे राहिले. किमान घरखर्च भागविण्याइतपत पैसे मिळविण्यासाठी लोकांनी हा संघर्ष केला. नोटबंदीचा निर्णय झाला तेव्हा लग्न-सराईचे दिवस होते. मुलांचं लग्न ठरवलेल्या आई-वडिलांच्या पायाखालची जमीन नोटबंदीमुळे सरकली होती. मोठी काटकसर करून कसेतरी लग्न पार पाडले गेले. अनेकांनी तर एटीएमच्या रांगेतच श्वास सोडला. लोकांची मजुरी गेली. लहान उद्योगांचे सर्वाधिक नुकसान झाले. तरीसुध्दा, लोकांनी सगळे सहन केले. फक्त एकाच हेतूने की, भ्रष्टाचार दूर होईल आणि दहशतवाद्यांचे कंबरडे मोडेल.
मात्र, घडलं भलतंच . नोटबंदीची हवा निघाली. नोटबंदीचा निर्णय चुकीचा असल्याचे सिध्द झाले. रिझर्व बॅंकेच्या 2017-18 च्या वार्षिक अहवालानुसार, पाचशे आणि हजाराच्या 99.3 टक्के नोटा परत आल्या आहेत. नोटाबंदीपूर्वी पाचशे आणि हजार रुपयांच्या स्वरूपात 15.41 लाख कोटी रुपये चलनात होते. यापैकी 15.31 लाख कोटी रुपये परत आले. याचा अर्थ, 10,720 कोटी रुपयाच्या नोटा परत आल्या नाहीत. नेपाळ आणि भूतानमध्ये भारतीय चलन वापरात असल्यामुळे या शिल्लक नोटा वरील दोन्ही देशात असाव्यात, असा एक अंदाज आहे.
आरबीआयनुसार, 10720 कोटी रूपयाच्या नोटा परत आल्या नाहीत. मात्र, दुसरीकडे, पाचशे आणि दोन हजाराच्या नोटा छापल्या. यावर 7965 कोटी रुपये खर्च आला. आता 10720 कोटीमधून 7965 कोटी रुपये वजा केले तर 2755 कोटी रुपये उरतात. म्हणजे, नोटंबदीमुळे 2755 कोटी रुपयांचाच फायदा झाला, असे म्हणावे लागेल. याशिवाय, नवीन नोटांच्या छपाईमुळे रिझर्व बॅंकेचा नफा कमी झाला. वार्षिक लाभांशात घट आली.
नोटबंदीचा निर्णय फसल्यामुळे मोदींच्या विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळाले आहे. आता नोव्हेंबरमध्ये मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि मिझोरम या चार राज्यात विधानसभेची आणि नंतर लोकसभेची निवडणूक आहे. “काळा पैसा आणि भ्रष्टाचार संपविण्यात नोटबंदीच्या निर्णयाला कितपत यश आले’, असा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला आहे. दहशतवाद्यांचे कंबरडे मोडणं, हाही एक याचा हेतू होता. मात्र, सन 2016 नंतर दहशतवाद आणि घुसखोरी आणखी वाढली आहे.
नोटबंदीचा निर्णय पूर्ण तयारी न करता लागू का करण्यात आला, असा महत्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. याशिवाय, बॅकांनी पाचशे आणि हजाराच्या नोटांची मोजणी करून त्या किती आहेत याची माहिती आधीच रिझर्व बॅंकेला दिली होती. मग सर्व बॅंकॉंची आकडेवारी एकत्र करण्यास रिझर्व बॅंकेला दोन वर्षे का लागली?
माजी अर्थमंत्री आणि कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदम्बरम यांनी म्हटले आहे की, नोटबंदी करताना तीन लाख कोटींच्या नोटा परत येणार नाहीत, असा दावा करण्यात आला होता. मात्र, देशाला नोटबंदीची मोठी किंमत चुकवावी लागली, असा त्यांचा आरोप आहे. दीड टक्के अर्थात 2.25 लाख कोटी रुपये इतके जीडीपीचे नुकसान झाले आहे.
दुसरीकडे, सरकारचा दावा आहे की, नोटबंदी करताना जे उद्दिष्ट ठरविण्यात आले होते, त्यात सरकार यशस्वी झाली. सन 2016 मध्ये उच्च मूल्य वर्गाच्या नोटा चलनातून बाद करण्याचा हेतू बऱ्यापैकी यशस्वी झाला आहे. अर्थ सचिव एस. सी. गर्ग यांच्यानुसार, नोटबंदीमुळे काळ्या पैशांवर अंकुश लागला, दहशतवाद्यांची आर्थिक रसद थांबली, डिजीटल व्यवहार वाढले आणि नकली नोटा समाप्त करणे, हे उद्दिष्ट साध्य झाले.
मात्र, सरकारचा हा दावा कुणालाही मान्य नाही. विरोधक आक्रमक आहेत. केंद्र आणि राज्यात भाजपसोबत सत्तेत सहभागी शिवसेनेनेही नोटबंदीवर सरकारला घेरले आहे. “नोटबंदी एक गुन्हा होता’, असा सेनेचा आरोप आहे. सर्व नोटा परत तर आल्याच. पण तीन ते चार लाख कोटी रूपयाचा काळा पैसाही पांढरा झाला. नकली नोटांची समस्या होती तशीच आहे. मागच्या वर्षी 40 हजार कोटी रूपयाचे नकली चलन बाजारात असल्याची शंका होती. आजही दहा हजार कोटीच्या नकली नोटा बाजारात असण्याचा अंदाज आहे.
नोटबंदीनंतर ज्या खात्यांमध्ये पाच लाखांपेक्षा जास्त रक्‍कम जमा करण्यात आली, त्या खात्यांची चौकशी सुरू आहे. या संदर्भात आयकर विभागाने 18 लाख खातेधारकांना नोटीस बजावली आहे. मात्र, यातून साध्य काय होणार हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण, आयकर विभागाकडे मनुष्यबळाची कमतरता आहे. तसेच दोषींना दंड देणे अवघड आहे. किंबहुना, फक्‍त चार-पाच टक्के लोकांवर कारवाई होत आली आहे. यामुळे भ्रष्टाचाऱ्यांचा आत्मविश्वास बळावला आहे.
नोटबंदीमुळे टॅक्‍स रिटर्न भरणाऱ्यांची संख्या वाढली असल्याचा दावा, सरकार करत आहे. खरं म्हणजे, आधी ज्यांचा टीडीएस कपात होत नसे, ते टॅक्‍स रिटर्न भरत नव्हते. आता हा वर्ग टॅक्‍स रिटर्न दाखल करू लागला आहे. यामुळे आकडा वाढल्याचे दिसून येते. मुळात, करदात्यांची संख्या आताही 2012-13 सारखीच आहे.
नोटबंदीपूर्वी, ऑक्‍टोबर 2016 मध्ये भारताची अर्थव्यवस्था चीनला टक्‍कर देत होती. मात्र, नोटबंदीनंतर भारताची अर्थव्यवस्था कोलमडली. दीड लाख कोटी रुपयांच्या अर्थव्यवस्थेला दहा लाख कोटी रूपयाचे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांची पेरणीसुध्दा अडचणीत आली. यामुळे शेती उत्पन्न संकटात सापडले. असंघटीत क्षेत्रात नगदीचा वापर सर्वाधिक होतो. यामुळे असंघटीत क्षेत्राचे कंबरडे मोडले गेले. संघटीत क्षेत्रात डिजिटलायजेशन आधीपासूनच आहे. यामुळे नोटबंदीमुळे डिजिटलायजेशनमध्ये वाढ झाली असे म्हणणे चुकीचे आहे. त्यामुळे भ्रष्टाचराला लगाम बसतो असे म्हणणे संयुक्तिक नाही.
नोटबंदीमुळे नगदीचा वापर कमी झाला असं म्हणणेही चुकीचेच आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये 18 लाख कोटी रुपये नगदी स्वरूपात चलनात होते. आता 23 लाख कोटी रुपये नगदीच्या स्वरूपात चलनात आहेत. यामुळे निवडणुकीच्या तोंडावर सरकार तोंडघशी पडली आहे. याचा नेमका परिणाम काय होतो, हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडी प्रतिक्षा करावी लागेल.

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
2 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)