दिल्ली वार्ता : लोकसभेला भाजप-कॉंग्रेसच सरळ लढत 

वंदना बर्वे 

वर्ष 2019 मध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकीत जगातील सर्वांत मोठ्या राजकीय पक्षाचा, म्हणजेच भारतीय जनता पक्षाचा थेट सामना कॉंग्रेसशीच आहे, ही बाब नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनासुध्दा पटली आहे. कदाचित म्हणूनच ते सतत राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधत असतात. आता 11 डिसेंबरला पाच राज्यांच्या निवडणुकांचा निकाल लागल्यावर भाजप विरोधी आघाडी बनवण्याचा कार्यक्रमाला आणखी जोर चढेल. 

लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अश्वमेध खुंट्याला बांधायचा असेल तर भाजपविरोधी पक्षांची मोट बांधली जाणे खूप आवश्‍यक आहे, याची जाणीव धर्मनिरपेक्ष पक्षांना बऱ्यापैंकी झाली आहे. ही एकजूट झाली तर 2019 च्या निवडणुकीत 1996 सारखं चित्र बघायला मिळेल. महत्वाचं म्हणजे, सीबीआयला आंध्रप्रदेशात बॅन करणारे चंद्राबाबू नायडू यांनी या कामाचं “जू’ आपल्या खांद्यावर घेतलं आहे.

-Ads-

नायडू यांनी मोदींच्या नेतृत्वातील सरकारची झोप पुन्हा उडविली आहे. त्यांनी सीबीआयला आंध्रात बंदीचा निर्णय घेतला आहे. सीबीआयला आता आंध्रप्रदेशात चौकशी किंवा कारवाई करायची असेल तर आधी राज्य सरकारची परवानगी घ्यावी लागेल. तत्पूर्वी, नायडू यांनी भाजपप्रणित “रालोआ’ला रामराम ठोकला; आणि धर्मनिरपेक्ष पक्षांची मोट बांधण्याची तयारी सुरू केली आहे. त्यांनी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्यासह बहुतांश धर्मनिरपेक्ष पक्षांच्या नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीसुध्दा संपुआतील घटक पक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न सुरू केला होता. मात्र, नायडू यांनी यात आघाडी घेतली आहे. दिवंगत कम्युनिस्ट नेते हरकिशनसिंग सुरजीत यांची भूमिका बजावण्याचा (वर्ष 2004) प्रयत्न नायडू करीत आहेत. सुरजीत यांची एकजूट फळाला आली आणि डॉ. मनमोहन सिंग यांच्या नेतृत्वात केंद्रात कॉंग्रेसप्रणित संपुआचे सरकार स्थापन झाले होते.

मोदींच्यापुढे टिकायचं असेल तर भाजपविरोधी पक्षांची एकजूट होण्याची गरज आहे, असं धर्मनिरपेक्ष पक्षांना वाटू लागलं आहे. मात्र अजून तरी त्या दिशेनं काहीच सकारात्मक घडत नाही आहे. राहुल गांधी यांनी ही मोहिम शरद पवार यांच्याकडे सोपवली होती.पवारांनीही बसपा सुप्रिमो मायावती, सपा मुखिया अखिलेश यादव यांच्याशी चर्चा सुरू केली. मायावतींना महाराष्ट्रात येण्याचं निमंत्रण दिलं आणि मदतीचं आश्वासनही दिलं. यामुळे, 2019 च्या निवडणुकीत संपुआचा चेहरा स्पष्ट नसला तरी सर्वमान्य शरद पवार एकजुटीचे सुत्रधार असतील, असे चित्र निर्माण झाले होते.

दरम्यान, मायावतींनी मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये कॉंग्रेसशी आघाडी करायला नकार दिला. आणि तिकडे, “राफेल’ विमानांच्या किमतीवरून लोकांच्या मनात संशय नाही,’ हे पवारांचं विधान प्रसारित झालं.
यानंतर, अर्थातच तेच घडलं! “अस्तित्वात येण्यापूर्वीच भाजपविरोधी-महाआघाडीचा भोपळा फुटला’, याचा प्रचार सुरू झाला. पवार यांच्याप्रती भाजपविरोधी पक्षांमध्ये अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले.

आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसम पक्षाचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी याच संधीचं रूपांतर संधीत करायला सुरवात केली. आता जी भूमिका पवार वठविणार होते; तीच भूमिका निभावण्याचं काम नायडू यांनी स्वतःहून आपल्याकडे घेतलं. यात त्यांना थोडंसं यशसुध्दा मिळालं आहे. तेलंगण विधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्याविरूध्द टीडीपी-कॉंग्रेसची आघाडी मैदानात उतरली आहे. शिवाय कोणत्याही पक्षाला नायडू यांचं वावडं नाही. याची दोन कारणं आहेत. पहिलं म्हणजे त्यांचे सर्वपक्षांच्या नेत्यांशी खूप चांगले संबध आहेत. पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासोबत जेवढे चांगले संबध आहेत, तेवढेच चांगले संबध डाव्यांशीसुध्दा आहेत.

दुसरं कारण जास्त महत्वाचं आहे. मायावती, ममता, पवार आदी नेत्यांचा डोळा पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर आहे.या स्पर्धेत नायडू अजिबात नाहीत. कारण, आंध्रात लोकसभेच्या फक्त 25 जागा आहेत. टीडीपीने कितीही चांगले प्रदर्शन केले तरी सर्व जागांवर काही टीडीपीचा विजय होणे नाही. अशात पंतप्रधानपदाच्या खुर्चीवर दावा करावा एवढ्या जागा नायडू यांच्याकडे नसतीलच. म्हणून कुणीही त्यांच्याकडे स्पर्धक म्हणून पाहत नाहीत.

वर्ष 2019 मध्ये कॉंग्रेस विरोधी पक्षातील सर्वात मोठा पक्ष असेल. कॉंग्रेसला पुरेशा जागा नाही मिळाल्या तर राहुल गांधी पंतप्रधानपदावरचा आपला दावा मागे घेतील, अशी घोषणा त्यांनी आधीच केली आहे. वर्ष 2004 मध्ये सुरजीत यांनी द्रमुकला कॉंग्रेसशी आघाडी करण्यास राजी केले होते. द्रमुकचे एलटीटीईशी संबध असल्यामुळे कॉंग्रेसच्या तत्कालिन अध्यक्षा सोनिया गांधी तयार नव्हत्या होत्या. परंतु, सुरजीत यांच्या पुढाकारामुळे आघाडी झाली आणि या निवडणुकीत द्रमुक-कॉंग्रेसचा एकतर्फी विजय झाला होता. याच धर्तीवर नायडू दिल्लीत कॉंग्रेस आणि आम आदमी पक्षाला एकत्र आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. सध्यातरी त्यांना यात यश आलेले नाही. परंतु, हीच त्यांची अग्निपरिक्षा होय. यात यशस्वी झाले तरच सुरजीत यांचा उत्तराधिकारी होण्याचा मान मिळेल!

राजकारणात कायमचे शत्रू किंवा मित्र कोणीही नसतं. कायम असतात फक्त हितसंबंध. लोकसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत तसं नेतेमंडळी त्यांचे राजकीय रंग बदलाताना दिसत आहेत. पंतप्रधान म्हणून चंद्रशेखर यांची कारकीर्द फार छोटी राहिली असेल पण राजकीय परिस्थितीचं ते अचूक निदान करण्यात पारंगत होते. एकदा त्यांनी “तिसरी आघाडी’ म्हणजे “तिसऱ्या दर्जाची आघाडी’ अशी कोपरखळी मारली होती. आता एकविसाव्या शतकाचं दुसरं दशक संपत आलं असताना त्यांचं विधान अजून बरोबर आहे, हे परत एकदा दिसून आलं आहे.

मात्र, खरंच ही आघाडी अस्तित्वात येईल काय? असा प्रश्न आतापासून सुरू झाला आहे. कारण, मायावती आणि ममता पंतप्रधान होण्यासाठी खूप उत्सुक आहेत. कदाचित म्हणूनच दीदी राहुल गांधी यांची दावेदारी फेटाळण्याचे काम करीत असतात. तिकडे, छत्तीसगड विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर कॉंग्रेस फोडून अजित जोगी यांनी स्वतःचा वेगळा पक्ष काढला. बसपाशी आघाडी केली आणि मायावतींना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा जाहिर केला आहे.

आठ-नऊ महिने आधीपर्यंत सत्ताधारी रालोआचे महत्त्वाचे घटक असलेले नायडू आता नरेंद्र मोदी-अमित शाह यांना धडा शिकवण्याची गोष्ट करत आहेत. गेल्या तीन दशकांचं कॉंग्रेस-विरोधाचं राजकारण सोडून देऊन ते आता राहुल गांधींबरोबर काम करू लागले आहेत. “जे आमच्याबरोबर राहणार नाहीत, ते भाजप बरोबर आहेत असं समजलं जाईल,’ असं जाहीर करून त्यांनी फेडरल फ्रंट या कल्पनेचं पेकाटच मोडलेलं दिसत आहे. कॉंग्रेस हा “मुख्य विरोधी’ पक्ष आहे असं स्पष्ट करून भाजप विरोधात सर्वांनी एकदिलानं काम केलं पाहिजे हेच अधोरेखित केलं आहे.

आता ‘वेगळं व्हायचंय मला’ असं कोणताही भाजपाविरोधातला प्रादेशिक पक्ष म्हणत नाही. मोदी-शाह यांच्या नेतृत्वाखालील भाजप साम-दाम-दंड-भेद वापरून आपल्याला सरळ करायला निघाला आहे, याची त्यांना खात्री पटल्यासारखी वाटते. पश्‍चिम बंगालमध्ये भाजपने ममतांना जबर आव्हान उभं केलं आहे. मात्र, सीबीआयच्या धसक्‍याने मायावती सध्या गप्प आहेत इतकंच.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)