#दिल्ली वार्ता: मायावतींनी कॉंग्रेसला अचानक धक्का का दिला? 

वंदना बर्वे 
शेवटी मायावती यांनी कॉंग्रेसच्या स्वप्नांवर विरजण ओतलं. आता मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये बसपा स्वबळावर लढणार. या राज्यांत बसपशी आघाडी करून निवडणुकीला सामोरं जाण्याची राहुल गांधी यांची इच्छा होती. मात्र, बहनजींनी झटका दिला. आघाडी का होवू शकली नाही? कॉंग्रेसने खरंच जास्त जागा सोडल्या नाहीत की सीबीआयची भीती होती म्हणून? खरं-खोटं बहनजींनाच ठाऊक! 
लोकसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजपाचा धुव्वा उडविण्यासाठी विरोधक महाआघाडी बनविण्याची तयारी करीत असतानाच बसपा प्रमुख मायावती यांनी कॉंग्रेसला जोरदार झटका दिला आहे. मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि मिझोरम या चार राज्यांसह तेलंगणमध्येही विधानसभा निवडणूकीची प्रक्रिया सुरु झाली आहे. भाजपशासीत तिन्ही राज्यांमध्ये दलित मतदारांची संख्या निकाल प्रभावित करणारी आहे. यामुळे बसपशी आघाडी करण्याची कॉंग्रेसची इच्छा होती. परंतु, चर्चा फिसकटली. बहनजींनी “एकला चलो’चा मार्ग पकडला.
बसपने कॉंग्रेसला धक्का दिल्यामुळे लोकसभेच्या निवडणुकीत होणारी कथित महाआघाडी अस्तित्वात येण्याआधीच फुटली आहे की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. राहुल गांधी यांनी महाआघाडीला आकार देण्याची महत्वपूर्ण जबाबदारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर टाकली आहे. आता प्रश्‍न असा आहे की, पवार मायावतींना कोणत्या मुद्यावर समजावू शकतील? शिवाय बहनजींनी छत्तीसगडमध्ये कॉंग्रेसऐवजी कॉंग्रेसचे बंडखोर नेते अजित जोगी यांच्याशी हातमिळवणी केली आहे. त्यामुळे कॉंग्रेसची बोलती बंद झाल्याचे चित्र आहे.
लोकसभा निवडणूक होईपर्यंत बहनजी आणखी किती झटके देतात, हाच उत्सुकतेचा विषय आहे. बहनजींनी जोगी यांना राखी बांधली. राजस्थान आणि मध्यप्रदेशातही स्वबळावर लढण्याची तयारी दर्शवली आहे. यात आता अखिलेश यादव यांनीसुध्दा उडी मारली आहे.
थोडक्‍यात, कॉंग्रेस किंवा समाजवादी पक्षापुढे वाकायला मायावती अजिबात तयार नाहीत; विधानसभाही नाही आणि लोकसभेच्या निवडणुकीतही नाही. त्या सदैव “बार्गेनिंग मोड’मध्ये असतात. यामुळे त्यांना “बार्गेनिंग क्वीन’ म्हटलं जातं. “बसपला ताकदीप्रमाणे सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत, तर आपण आघाडीत सामील होणार नाही,’ असं त्यांनी सपा नेते अखिलेश यादव यांना बजावण्यात जराही मागे-पुढे बघितले नाही. यावरून त्यांचा तोरा लक्षात येतो.
मात्र, महाआघाडीची मोट बांधताना कॉंग्रेसलाही डोक्‍यावर बसू द्यायचे नाहीच, याचीही तयारी सर्व पक्षांनी केली आहे. अर्थात, केंद्रात महाआघाडीची सत्ता आल्यास पंतप्रधान कोण होणार, याचा निर्णय निवडणुकीनंतर घेतला जाईल. परंतु, राहुल गांधी पंतप्रधान होणार नाहीत, याची खबरदारी आतापासूनच घ्यायची, अशी सर्वांची सुप्त भावना आहे. कॉंग्रेसला धुडकावण्याची ही मशाल सध्या मायावती यांनी आपल्या हाती घेतली आहे. मायावती आणि अखिलेश यादव उत्तरप्रदेशात कॉंग्रेसला सोबत घेण्यास तयार नाही. यानंतरही येनकेप्रकारेन आघाडीत सामील करून घेतलेच तर तिथे कॉंग्रेसला सहा-सातपेक्षा जास्त जागा दिल्या जाणार नाहीत.
सुरवातीला समाजवादी पक्षाचे वर्तमान अध्यक्ष अखिलेश यादव कॉंग्रेससाठी फक्त दोन जागा सोडण्यास तयार होते. वर्ष 2014 च्या निवडणुकीत अमेठी आणि रायबरेली या जागांवर कॉंग्रेसला विजय मिळाला होता. आगामी निवडणुकीत या दोन जागा मंजूर असतील तर कॉंग्रेसला सोबत घ्यायचे; अन्यथा सपा आणि बसपाने आघाडी करून निवडणुकीला सामोरे जायचे, असे अखिलेश यादव यांचे अजूनही मत आहे.
वर्ष 2014 च्या निवडणुकीत सपच्या पाच जागा निवडून आल्या होत्या आणि बसपा पूर्णपणे भुईसपाट झाली होती. उत्तरप्रदेश विधानसभेच्या निवडणुकीत समाजवादी पक्षाने कॉंग्रेसशी समझोता केला होता. मात्र, सपचा पराभव झाला. कॉंग्रेसशी हातमिळवणी केली म्हणून आपला पराभव झाला होता, असे यादव यांचे म्हणणे आहे. यूपीत सप-बसप-कॉंग्रेस आघाडी झाली तर कॉंग्रेसला जास्त जागा द्याव्या लागतील. दोन्ही पक्ष कॉंग्रेससाठी दोनपेक्षा जास्त जागा सोडण्यास तयार नाही. दुसरीकडे, मायावती यांनी 40 पेक्षा कमी जागा न घेण्याचा स्पष्ट इशारा दिला आहे.
वर्ष 2014 मधील लोकसभेच्या निवडणुकीनंतर बिहार विधानसभेची निवडणूक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अश्वमेध रोखण्यासाठी भाजपविरोधी पक्षांची महाआघाडी करण्याचा प्रयत्न यावेळी झाला होता. वेगळी चूल मांडण्याचे जे काम आता मायावती यांनी केले. तेच काम बिहार निवडणुकीच्यावेळी सप नेते मुलायमसिंह यादव यांनी केले होते. यादव यांना कसली तरी भीती होती म्हणून त्यांनी जनता परिवाराच्या आघाडीपासून स्वतःला लांब ठेवले, अशी चर्चा तेव्हा जोरात होती.
मुलायमसिंह यादव यांच्या भूमिकेमुळे जनता परिवाराची हवा निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच निघाली होती. राजदचे लालूप्रसाद यादव, लोजपाचे रामविलास पासवान, बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार, शरद यादव ही सगळी मंडळी लोहियावादी. बिहारच्या निवडणुकीत सगळ्यांनी एकत्र येण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, स्वार्थापोटी हा प्रयत्न फसला.
जेडीयू-राजद-सपा-कॉंग्रेस या आघाडीला भगदाड पाडल्याशिवाय भाजपला बिहार काबीज करता येणार नाही, याची जाणीव शहा-मोदी जोडीला फार आधीपासून होती. यामुळे “आघाडीत बिघाडी’ करण्याचे प्रयत्नसुध्दा सुरू झाले होते. मुख्यमंत्री नितीशकुमार यांची व्होटबॅंक पळविण्यासाठी भाजपने आधी माजी मुख्यमंत्री जीतनराम मांझी यांना जवळ केले. यानंतर लालूप्रसाद यादव यांची यादवांची मतपेढी आकर्षित करण्यासाठी पप्पू यादव यांना वेगळे केले. आता मुलायमसिंह यादव आघाडीपासून वेगळे झाले. यामुळे भाजपचे चांगलेच फावले आहे. पाच राज्यांतील निवडणुकीची घोषणा होण्याच्या मुहूर्तावरच बसप-कॉंग्रेसचा काडीमोड झाल्यामुळे भाजपच्या अंगणात दिवाळी-दसऱ्याचा आनंद आहे.
सपाप्रमुख मुलायमसिंह यादव यांनी तेव्हा वेगळी चूल का मांडली होती; आणि आता बहनजींनी “एकला चलो’चा मार्ग का स्वीकारला, हा संशोधनाचा विषय आहे. मुलायमसिंह आणि पवार बेरजेच्या राजकारणात तरबेज आहेत. पवार आता महाआघाडीसाठी प्रयत्न करीत आहेत. अशात ही वजाबाकी का? हा प्रश्न उपस्थित होतो.
खरं म्हणजे, बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणामुळे मुलायमसिंह यादव यांनी यापूर्वी अनेकदा भूमिका बदलली आहे. वर्ष 2008 मध्ये अणु कराराच्या मुद्यावर मुलायमसिंहांनी डाव्यांची सोबत सोडून कॉंग्रेसचे सरकार वाचवले होते. वर्ष 2012 मध्ये राष्ट्रपती निवडणुकीच्यावेळीही मुलायमसिंहांनी ममता बॅनर्जी यांचा भ्रमनिरास केला होता. तसेच, 2002 मध्ये मुलायमसिंह यांनी राष्ट्रपतीपदासाठी अचानक डॉ. अब्दुल कलाम यांचे नाव समोर केले होते. कॉंग्रेस सत्तेत असताना कितीतरी वेळा यादव सरकारसमोर नमले होते. हेच सोयीचं राजकारण!
What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)