दिल्ली वार्ता: मजबूत नव्हे; मजबूर भाजपा…

वंदना बर्वे

बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. या राज्यात भाजपने माघार घेतली आहे. आता उत्तर प्रदेश, पंजाब, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश यासारख्या राज्यांमध्ये जेथे भाजपला मित्रपक्षाशी हात मिळवणी करून लोकसभेच्या निवडणुकीला सामोरे जायचे आहे. उत्तरप्रदेशातील अपना दलाच्या नेत्या अनुप्रिया पटेल यांनीही भाजपवर नाराजी व्यक्त केली आहे. उध्दव ठाकरे नित्यनेमाने नरेंद्र मोदी यांच्या सरकारचा समाचार घेतात. अशात त्या राज्यांमध्ये भाजप नेमकी कोणती भूमिका घेते हे बघणे मजेशीर राहील.

भारतीय जनता पक्षानं नितीशकुमार आणि रामविलास पासवान यांच्या अटी मान्य करून बिहारमध्ये रालोआला बेचिराख होण्यापासून वाचविलं. लोकसभेच्या निवडणुकीत आघाडी कायम ठेवण्यासाठी जेडीयूला 17 जागा द्याव्या लागल्या आहेत. लोजपासाठी सहा जागा सोडाव्या लागल्याच; शिवाय आसाममधून राज्यसभेवर पाठविण्याचं वचनही द्यावं लागलं. 40 जागांच्या बिहारमध्ये एवढा त्याग करावा लागला असेल तर 48 जागांच्या महाराष्ट्रात भाजप काय करणार?
शेवटी, भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं घोडं बिहारमध्ये गंगेत न्हालं! संयुक्त जनता दलाचे अध्यक्ष नितीशकुमार नाराज असल्यामुळे भाजप-जेडीयूची आघाडी खरंच होणार का? असं विचारलं जात होतं. आता उपेंद्र कुशवाहा यांना मागणीप्रमाणे जागा न मिळाल्यामुळे ते महाआघाडीत सामील झाले आहेत. पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत पराभव झाल्यानंतर भाजपला आता मित्र पक्षांची आवश्‍यकता भासू लागली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कदाचित म्हणूनच एक पाऊल मागं घेत भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, बिहारचे मुख्यमंत्री नितिशकुमार यांनी ही बोलणी जाहीर करताना वारंवार रामविलास पासवान आणि त्यांचा पक्ष यांचा “उचित सन्मान’ होईल असं बोलून दाखवले. खुदद्‌ पासवान यांनीही या सन्मानाचा उल्लेख केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जागा वाटपावरून बिहारमध्ये निर्माण झालेल्या चित्रावरून “भाजप मजबूत नव्हे तर मजबूर पक्ष’ म्हणून दिसू लागला आहे. भाजपने बिहारमध्ये जेडीयू आणि लोजपा या दोन्ही पक्षांसोबत कल्पनातीत समझोता केला, असे स्पष्टपणे दिसून येते.
भाजपचे बिहारमध्ये 22 खासदार आहेत. आता झालेल्या वाटाघाटीनुसार भाजप 17 जागा लढविणार आहे. म्हणजे जिंकलेल्या पाच जागांवर पाणी सोडावे लागले. वर्ष 2014 च्या निवडणुकीत जेडीयूचे फक्त दोन, लोजपाचे सहा आणि भाजपचे 22 खासदार निवडून आले होते. अशात, दोन जागा जिंकणाऱ्या जेडीयूसाठी 17 जागा सोडणे आणि स्वतःच्या पाच जागा सोडून 17 जागांवर लढणे भाजपची कमजोरी सिध्द करणारे आहे. शिवाय, वाटाघाटी करताना उपेंद्र कुशवाहा हे जुने मित्र भाजपला सोडून गेले.

याच काळात रामविलास पासवान यांचे चिरंजीव खासदार चिराग पासवान यांनी सुध्दा भाजपला दबावात घेण्याचा प्रयत्न केला. यामागचा हेतू एकच की, लोजपासाठी सहा जागा आणि रामविलास पासवान यांच्यासाठी राज्यसभा निश्‍चित करणे हाच होता. कुशवाहा यांच्या राष्ट्रीय लोक समता पक्षाचा दबाव कामी आला नाही. परंतु, पासवान यांच्या दलित मतदारांचा दबाव भाजपला नमते घ्यायला लावण्यात कामी आला. कुशवाहा रालोआ सोडून गेले तरी भाजपने त्याची पर्वा केली नाही. नितीशकुमार यांचा कुशवाहा यांना पाठिंबा मिळाला नाही. हा पाठिंबा पासवान यांना मिळाला. शिवाय, दलितांची किंचितही मते आपल्यापासून दूर जावू नये असे भाजपला वाटत होते.

असं असलं तरी भाजपासाठी धोका टळला असं अजिबात नव्हे. लोकसभेच्या निवडणुकीत लालूप्रसाद यादव यांचा राष्ट्रीय जनता दल आणि कॉंग्रेसची आघाडी मजबूत होताना दिसत आहे. त्यातच कुशवाहा या आघाडीत सामील झाले आहेत. भाजपविरोधी वातावरण लक्षात घेता भाजप-जेडीयू सोडून राजद-कॉंग्रेसमध्ये सामील होण्याची पासवान यांची इच्छा होती. लोजपाची केंद्र सरकारवर नाराजी एवढी वाढली होती की, सरकार बेरोजगार आणि शेतकऱ्यांसाठी काहीही करताना दिसत नाही, असे विधान पासवान यांनी केले. परंतु, राजद-कॉंग्रेसमध्ये पोकळी न दिसून आल्यामुळे त्यात सामील होण्याची इच्छा त्यागावी लागली. मनाची द्विधा स्थिती असतानाच भाजपने त्यांना राज्यसभेचे आश्वासन दिले.
बिहारमधील जागवाटवाचा निर्णय होण्यापूर्वी भाजप जेडीयूसाठी दहापेक्षा जास्त जागा सोडणार नाही अशी चर्चा रंगली होती. ही चर्चा जोर पकडण्यापूर्वीच नितीशकुमार यांनी कठोर भूमिका घेण्यास सुरवात केली. सुशासनबाबूंचा आक्रमकपणा एवढा जास्त होता की, वातावरण बिघडण्यापूर्वी अमित शहा यांनी जेडीयूला बरोबरीने जागा देण्याचे आश्वासन दिले. यानंतर पासवान यांनीही आडमुठी भूमिका घेण्यास सुरवात केली होती.

थोडक्‍यात, अमित शहा यांनी जेडीयूसाठी 17 जागा सोडण्याचा जो निर्णय घेतला तो बिहारमध्ये राजद-कॉंग्रेस आघाडीच्या वाढत्या प्रभावामुळे यात किंचितही दुमत नाही. भाजपाध्यक्षाच्या या निर्णयाचा बारकाईने विचार केला तर दोन गोष्टी प्रामुख्याने लक्षात येतात. जेडीयू किंवा नितीशकुमार यांना भाजपविरोधी आघाडीत सामील होण्यापासून लांब ठेवणे. तसेच नितीशकुमार यांच्या वलयांकित व्यक्तीमत्वाला सोबत घेत यादव-मुस्लिम यांच्या महाआघाडीचा मुकाबला करणे. हीच बाब पासवान यांच्याशी समझोता करताना लक्षात ठेवली गेली. बिहारमधील दलित मतदार भाजपपासून दूर होणार नाही, याची खास खबरदारी या वाटाघाटीवेळी भाजपाध्यक्षांनी घेतली.

मोदी सरकारच्या विरोधात देशात वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधी पक्ष करीत होते. ही बाब रालोआतील घटक पक्षांनाही मनातल्या मनात आवडत होती. त्यामुळे आपण आपले मत मांडू शकू आणि शक्‍यतोवर आपले म्हणणे मान्य करायला लावू शकू, अशी परिस्थिती मित्र पक्षांसाठी निर्माण झाली होती. लोजपाने केलेली वाटाघाटी याचे ताजे उदाहरण म्हणून घेता येईल.

भाजपने नितीशकुमार किंवा रामविलास पासवान यांच्या म्हणण्याला वाव न देता तटस्थ भूमिका घेतली असती तर बिहारमध्ये आघाडी होण्याऐवजी बिघाडी झाली असती, असेही अनेकांना वाटते. कदाचित म्हणूनच, भाजप एवढी लाचार का झाली? या प्रश्नाचे उत्तर भाजपची मंडळी यास चाणक्‍यनीती सांगून देतात. मात्र, यामुळे बिहारमधील भाजप नेते आणि कार्यकर्त्यांचा उत्साह कमी झाला हे खरे आहे. सुरवातीला कुणालाही न जुमानता भाजप स्वबळाची भाषा करीत होती. आता अचानक जेडीयू आणि लोजपापुढे गुडघे टेकावे लागले. मुळात, जनता केवळ केंद्र सरकारवर नाराज असे नव्हे; तर नितीशकुमार सरकारवरही नाराज आहे, अशी चर्चा गावागावात सुरू आहे. तिकडे, लालूप्रसाद यादव यांचे चिरंजीव तेजस्वी यादव आक्रमक भूमिका घेवून लोकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न करीत आहेत. तरीसुध्दा, राजद-कॉंग्रेस आघाडी कितपत यशस्वी होईल, हे सांगता येत नाही. कारण, बिहारमध्ये लालूप्रसाद यादव यांचे 10 वर्ष सरकार होते. या काळात भ्रष्टाचार फोफावला. विकास खुंटला. गुंडगिरी वाढली होती. आता एकीकडे जेडीयू-भाजप-लोजपा आघाडी आहे, तर दुसरीकडे राजद-कॉंग्रेस आघाडी.
पाहू काय होते ते!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)