दिल्ली वार्ता: …तर जगात भारताचं नाव झालं असतं! 

वंदना बर्वे 

मुद्दा फक्‍त उंच पुतळे उभारण्यापुरता मर्यादित नाही. अर्थव्यवस्था, रोजगार निर्मिती आणि ब्रॅंडिगचाही आहे. पुतळ्याचे फक्त धातू ओतण्याचे काम चीनमध्ये झाले. बाकी काम भारतातच झाले. पण, नाव चीनचे झाले. जगातील सर्वांत उंच पुतळा भारतात असला तरी तो चीनमध्ये तयार झाला आहे. म्हणजे नाव कुणाचं होतंय तर चीनचं. पुतळा बनविण्यास तीन हजार कोटी रूपये खर्च आला. हा पुतळा भारतात तयार झाला असता तर, तीन हजार कोटी रूपये भारतातच फिरले असते. अर्थव्यवस्थेला बळ मिळाले असते. सगळ्यात उंच पुतळा बनविणारा देश म्हणून भारताचे जगात ब्रॅंडिंग झाले असते. 

लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जगातील सर्वात ऊंच पुतळ्यामुळे भारताची मान उंचावली आहे. मात्र, हा पुतळा चीनऐवजी भारतात तयार झाला असता तर सव्वाशे कोटी भारतीयांची छाती खरंच फुगली असती. कारण, या पुतळ्याचं इत्यंभूत काम भारतातच झालं. साचा भारतात तयार झाला. छोटी प्रतिकृती येथेच तयार झाली. सगळं काही पटेलांच्या देशात झालं. फक्त कारखाना नव्हता; म्हणून हा पुतळा चीनमध्ये तयार झाला. सरकारने राम सुतार यांना फक्‍त जमीन आणि वीज उपलब्ध करून दिली असती, तर जगातील सर्वात उंच पुतळा भारतातच तयार झाला असता!

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे पहिले गृहमंत्री लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा जगातील सर्वात ऊंच पुतळा “स्टॅच्यू ऑफ युनिटी’ 31 ऑक्‍टोबर रोजी राष्ट्राला समर्पित केला. आतापर्यंत न्यूयॉर्कमधील “स्टॅच्यू ऑफ लिबर्टी’ची चर्चा सर्वाधिक व्हायची; आता भारतातील सरदार पटेल यांच्या पुतळ्याची होईल. जगातील सर्वात ऊंच पुतळा बघण्यासाठी जगभरातील पर्यटक आता भारतात येतील. ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब आहे. गुजरातच्या सरदार सरोवरात उभारला गेलेल्या या पुतळ्यामुळे भारताचं नाव जगभरात पोहचलं आणि यात सिंहाचा वाटा उचलला तो महाराष्ट्राने. महाराष्ट्राचे सुपुत्र शिल्पकार पद्मभूषण विजेते राम सुतार यांच्या देखरेखीखाली चीनने हा पुतळा तयार केला आहे.

मोदींनी पंतप्रधान म्हणून देशाची धुरा स्वीकारल्यानंतर पटेल यांचा सर्वात उंच पुतळा उभारण्याचा संकल्प घेतला. “स्टॅच्यू ऑफ युनिटी’च्या निर्णयानंतर या कामाला वेग आला. हा पुतळा कसा असावा, याचा अभ्यास करण्यासाठी गुजरात सरकारने मायकल ग्रेव्ह या अमेरिकन इतिहास तज्ज्ञाची नेमणूक केली.

सरदार पटेल यांच्या विविध मुद्रा असलेल्या पुतळ्यांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून त्यातील एकाची निवड “स्टॅच्यू ऑफ युनिटी’साठी करण्याची जबाबदारी गेव्ह यांच्यावर सोपविण्यात आली होती. ग्रेव्ह यांनी देशभरातील पटेल यांच्या चारशेपेक्षा जास्त पुतळ्यांची पाहणी केली, अभ्यास केला. आणि शेवटी अहमदाबाद विमातळावरील सरदार पटेल यांचा पुतळा “स्टॅच्यू ऑफ युनिटी’साठी सर्वोत्कृष्ठ असल्याचा अहवाल दिला.

यानंतर अहमदाबाद विमातळावरील पुतळा कुणी बनविला? याचा शोध सुरू झाला आणि लक्षात आलं की, तो पुतळा शिल्पकार राम सुतार यांनी बनविलेला होता. गुजरात सरकारने राम सुतार यांच्याशी संपर्क साधला आणि या पुतळ्याची मोठी प्रतिकृती उभारण्यास आपली हरकत आहे काय? असा प्रश्‍न विचारला. सुतार यांनीसुद्धा मोठ्या मनाने लगेच आपली काही हरकत नसल्याचे सांगितले.

गुजरात सरकारने कॉपी राईटशी संबधित सर्व प्रकारची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली आणि “ल्युयान’ या चीनी कंपनीला सरदार पटेल यांचा जगातील सर्वात मोठा उंच पुतळा बनविण्यासाठी करार केला. चीनी आणि भारतीयांचा चेहरा वेगवेगळा आहे. संस्कृती, पोशाख, भाषा, हावभाव सगळं काही वेगळं. अशात, सरदार पटेल यांचा पुतळा हुबेहुब कसा बनवणार? हा प्रश्‍न ल्युयान या कंपनीला पडला. म्हणून त्यांनी अर्थात ल्युयान या कंपनीने राम सुतार यांचीच कंसलटंट म्हणून निवड केली.

पटेल यांचा पुतळा बनविण्याचा करार चीनच्या कंपनीशी झाला असला तरी सगळी जबाबदारी आली ती राम सुतार यांच्या अंगावर. पटेल यांच्या मूळ प्रतिकृतीचाच साचा आपण तयार केला तर तो कसा होईल? याचा नेम नाही. शिवाय हुबेहुब होणार की नाही? याचीही शाश्‍वती नाही. म्हणून ल्युयानने पुतळ्याचे डिझाईन बनवून देण्याची विनंती केली आणि सुतार यांनी डिझाईन बनवून दिले. मात्र, त्या डिझाईनच्या आधारावर ल्युयानने बनविलेला मिनी पुतळा पटेलांऐवजी वेगळाच दिसत होता. मिनी पुतळ्याचा चेहरा, हातपाय, चप्पल, पोशाख सगळे काही वेगळे होते.

यानंतर, राम सुतार आणि मुलगा अनिल सुतार अनेकदा चीनला जावून आले. ल्युयान कंपनीच्या अभियंत्यांना मार्गदर्शन केले. पुतळ्याचे बारकावे सांगितले. मात्र, भारतीय आणि चीनी माणूस दिसायला वेगळा असल्यामुळे मिनी पुतळा काही हुबेहुब तयार होवू शकला नाही. शेवटी, चीनच्या कंपनीने मिनी पुतळा आणि साचा बनवून देण्याची विनंती राम सुतार यांच्याकडे केली. सुतार यांनी ती मान्य केली आणि अशाप्रकारे सरदार सरोवरात उभारला गेलेला पटेल यांच्या पुतळ्याचा मूळ साचा सुतार यांच्या नोयडातील स्टुडियोत तयार झाला.

पुतळ्याचे डिझाईन, मिनी पुतळा, साचा, पटेल यांचा चेहरा आदी सगळं काही राम सुतार यांच्या स्टुडियोत तयार केलं गेलं. मग, 597 फुटाचा पुतळा भारतातच तयार होवू शकला नसता काय? डिझाईन आपले, मिनी पुतळा आपला, साचा आपला, कारागिर आणि बुद्धीही आपलीच. फक्त मोठी फाऊंड्री (धातू ओतण्याचा कारखाना) भारतात नाही, या एका कारणामुळे जगातील सर्वात ऊंच पुतळा बनविण्याचं काम चीनच्या कंपनीला देण्यात आलं. चीनमध्ये आहेत तशा मोठमोठ्या फाऊंड्री भारतात नाहीत.

मात्र, केंद्र किंवा गुजरात किंवा महाराष्ट्र सरकारच्या मदतीने पटेलांचा पुतळा निर्माण करता येईल अशी मोठी फाऊंड्री तयार करता आली नसती काय? सध्या सुतार यांच्या कारखान्यात 40 फुटाचा पुतळा उभारला जावू शकतो. जसा 40 फुटाचा उभारला जावू शकतो तसाच 400 फुटाचाही उभारला जावू शकतो, असं सुतार कुटुंबाला वाटतं. सरकारने फक्त जमीन, पाणी आणि वीज एवढीच व्यवस्था करून द्यावी. आर्थिक सहायतासुध्दा नको! जमीन-पाणी दिलं तरी पटेल यांच्या पुतळ्यापेक्षा मोठा पुतळा उभारता येतो, असा सुतार परिवाराचा दावा आहे.

जगातील विकसित देश त्यांचे उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी इस्रोच्या दारात रांग लावून उभे आहेत. उंच पुतळे बनविण्याच्या बाबतीतही आपण असेच सर्वशक्‍तिमान बनलो असतो. म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने तरी किमान गुजरातसारखी चूक करू नये. अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचा आणि इंदू मिलमध्ये घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा उभारला जाणार आहे. दोन्ही पुतळे भारतातच तयार होतील अशी काहीतरी उपाययोजना सरकारने करायला हवी.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)