इंधन भडक्‍याचे सत्र कायम
नवी दिल्ली – इंधनाचा भडका कायम राहत लिटरमागे पेट्रोल 39 पैशांनी, तर डिझेल 44 पैशांनी महागले. त्यामुळे देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दराने प्रथमच ऐंशीची पातळी ओलांडली.

अमेरिकी डॉलरच्या तुलनेत रूपयाने नीचांकी मूल्य गाठल्याने कच्च्या इंधनाच्या आयातीसाठीचा खर्च वाढला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेल दरवाढीचे सत्र सुरू आहे. हे सत्र कायम राहिल्याने पेट्रोल दिल्लीत 80.38 रूपयांवर तर मुंबईत तब्बल 87.77 रूपयांवर पोहचले. डिझेलच्या दराची दिल्लीत 72.51 रूपये तर मुंबईत 76.98 रूपयांची नोंद झाली. इंधन दरांनी जनसामान्यांचे कंबरडे मोडल्याने त्यांना दिलासा देण्यासाठी कर कमी करण्याची मागणी विरोधकांकडून केली जात आहे.

मात्र, इंधनांवरील कर कमी करण्याचा मोदी सरकारचा तूर्त कुठलाही विचार नसल्याचे संकेत मिळत आहेत. दरवाढीच्या सत्रामुळे सरकारविरोधात निदर्शने करण्यास सज्ज झालेल्या विरोधकांच्या संकल्पाला आणखीच इंधन मिळत आहे. इंधन दरवाढीचा निषेध करण्यासाठी कॉंग्रेसने तर सोमवारी (10 सप्टेंबर) भारत बंदची हाक दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)