दिल्लीतील “सुपारी किलर’चा पुण्यात थरार

महिलेच्या खुनानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या खुनाचा प्रयत्न


वाहतूक पोलीस व गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याच्या दिशेनेही केला गोळीबार


गोळीबाराच्या चार घटनांनी पुणे हादरले

पुणे – दिल्लीतील दोघा “सुपारी किलर’नी शहरात दाखल होऊन बुधवारी सकाळी महिलेचा खून केल्यानंतर पळून जाताना पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांवर केलेल्या गोळीबारामुळे पोलीस दलात खळबळ उडाली. सकाळी आठ वाजल्यापासून ते सायंकाळी साडेपाचपर्यंत या दोघा “सुपारी किलर’ने तब्बल तीन ठिकाणी गोळीबार केला. यामध्ये चंदननगर येथे एकता ब्रिजेश भाटी (38) यांचा जागेवरच मृत्यू झाला. तर, पुणे रेल्वे स्थानकावर त्यांचा माग काढणाऱ्या गुन्हे शाखा युनिट-2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन पवार यांच्यावर दोन गोळ्या झाडल्याने ते गंभीर जखमी झाले. यानंतर रेल्वे स्थानकातून पळून जाताना एका आरोपीने वाहतूक पोलीस व गुन्हे शाखेच्या कर्मचाऱ्याच्या दिशेने मालधक्का चौकात गोळ्या झाडल्या. या घटनाक्रमामुळे पुणे पोलीस दलातील सर्व वरिष्ठ अधिकारी गुन्हे शाखा, चंदननगर पोलीस स्टेशन, रेल्वे पोलीस आणि समर्थ पोलीस स्टेशनला आरोपींनी दमछाक केली. दरम्यान, येवलेवाडी येथे एका सराफी पेठीवरील कर्मचाऱ्यावर चौघांनी गोळीबार केल्याचा प्रकार दुपारी घडला. या चारही गोळीबाराच्या घटनांमुळे शहर दिवसभर चर्चेत राहिले होते.

चंदननगर येथे महिलेची हत्या
चंदननगर परिसरातील आनंद पार्क येथील इंद्रायणी गृहरचना सोसायटीत बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास महिलेवर दोघांनी गोळीबार केला. यामध्ये गोळी महिलेच्या बरगडीमध्ये आरपार घुसून तिचा मृत्यू झाला. दोन व्यक्तींनी गोळीबार केल्याचे महिलेच्या पतीने सांगितले आहे. दरम्यान, याप्रकरणी सोसायटीतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले असून पतीचीही चौकशी करण्यात येत आहे.

भाटी परिवार हा मूळचा दिल्ली येथील आहे. दोन वर्षापूर्वीच ते चंदननगर येथे स्थायिक झाले आहेत. एकता भाटी या पती ब्रिजेश, सासरे आणि दोन लहान मुलांसह वास्तव्यास होत्या. एकता या खानावळ चालविण्याचे काम करतात. आयटी कंपनीतील कर्मचाऱ्यांना त्या डबे पुरवतात. यासाठी त्यांनी एका इमारतीतील तीन सदनिका भाड्याने घेतल्या आहेत. खानावळीसाठी त्यांच्याकडे दोन महिला व एक पुरुष कर्मचारी आहे. तळमजल्यावरील एका सदनिकेत सासरे नातवांसह राहतात, तर शेजारच्या सदनिकेत जेवणाचे डबे बनवले जातात. तर, वरील मजल्यावरील सदनिकेत एकता व पती राहतात. तर त्याच्या शेजारची सदनिका भाड्याने देण्यात आली आहे.

बुधवारी सकाळी आठ वाजण्याचे सुमारास तळमजल्यावर राहणाऱ्या सासऱ्यांनी त्यांना चहासाठी बोलावले होते. यावेळी प्रथम ब्रिजेश खाली गेले. यानंतर एकता या थोड्या वेळाने चहासाठी निघाल्या असता, जिन्यातच दोन मारेकऱ्यांनी येऊन एकता यांच्यावर गोळीबार केला. पत्नीचा ओरडण्याचा आवाज ऐकून ब्रिजेश धावतच जिन्यात आले असता तेथे एकता या रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दिसल्या. गोळीबाराचा आवाज ऐकून सोसायटीतील इतर लोकही घटनास्थळी दाखल झाले. जखमी अवस्थेतील पत्नीस ब्रिजेशने उचलून रुग्णालयात नेले. मात्र, एकता यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेच्या तासाभरानंतर माहिती मिळताच चंदननगर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी एकता भाटी यांचा मृतदेह ताब्यात घेऊन ससून रुग्णालयात विच्छेदनासाठी पाठविला. तर, त्यांचे पती ब्रिजेश भाटी यांचा जबाब घेतला. मारेकऱ्यांचे नेमके वर्णन सांगण्यास ब्रिजेश असर्मथ ठरले. दरम्यान, घटनास्थळातील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या सोसायटीला रखवालदार नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. दरम्यान, तपासासाठी पाच पथके तयार करण्यात आली आहेत, असे पोलिसांनी सांगितले.

गोळीबाराची घटना घडल्यानंतर याची माहिती पोलिसांना एक तास उशिराने देण्यात आली. फिर्यादीच्या सांगण्यानुसार दोन जणांनी गोळीबार केला आहे. यामुळे परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले आहेत. हे कुटुंब दोन वर्षांपासून येथे वास्तव्यास आहे.
– राजेंद्र मुळीक, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, चंदननगर

गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी सुपारी
दरम्यान, आरोपींना अटक केल्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात मृत महिला एकता भाटी हिच्या पतीने दिल्लीत एक गुन्हा केल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्याचा बदला घेण्यासाठी दोघा आरोपींना सुपारी देण्यात आली होती. दोघेही आरोपी सध्या गुन्हे शाखेच्या ताब्यात आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)