दिल्लीतील प्रसिद्ध लाल किल्ला ५ वर्षांसाठी दत्तक!

नवी दिल्ली : मोगल बादशहा शहाजन याने १७ व्या शतकात बांधलेला  किल्ला आणि देशाचे पंतप्रधान स्वातंत्र्यदिनी तिरंगा ज्या ठिकाणावरून ध्वज फडकावून देशाला उद्देशून भाषण करतात तो दिल्लीतील ऐतिहासिक लाल किल्ला सरकारने दत्तक दिला. दालमिया भारत समूहाला २५ कोटी रुपयांत ५ वर्षांसाठी दत्तक दिला असल्याचे सांगण्यात आले आहे.

दालमिया भारत समूह सिमेंट उत्पादक असून, ऐतिहासिक वास्तू दत्तक घेणारा तो देशातील पहिला उद्योग समूह ठरला आहे. ‘अपनी धरोहर, अपनी पहचान’ या योजनेंतर्गत लाल किल्ला दत्तक देण्यात आला आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी २७ सप्टेंबर २0१७ रोजी जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून या योजनेची घोषणा केली होती. पर्यटन मंत्रालय आणि भारतीय पुरातत्व विभागासोबत कंपनीने गेल्या मंगळवारी यासंबंधीच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या.

दत्तक करारानुसार, लाल किल्ल्याची देखभाल, संवर्धन आणि सुशोभीकरण करणे तसेच परिसराचे नूतनीकरण करणे या जबाबदाऱ्या दालमिया समूहावर राहतील. किल्ल्याला भेट देणा-यांकडून शुल्क वसूल करून महसूल मिळवण्याचा हक्कही कंपनीला राहील. एकूण २२ ऐतिहासिक वारसा स्थळे दत्तक देण्याची सरकारची योजना आहे. जगप्रसिद्ध ताजमहालही या यादीत आहे. जीएमआर स्पोर्टस् आणि आयटीसी हे उद्योग समूह आता ताजमहाल दत्तक घेण्यास उत्सुक असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, पुनीत दालमिया यांच्या नेतृत्वाखालील दालमिया समूहाला लाल किल्ला दत्तक घेण्यासाठी इंडिगो एअरलाईन्स आणि जीएमआर समूहाशी स्पर्धा करावी लागली. ‘वारसास्थळे दत्तक देणे ही पर्यटन मंत्रालयाची अनोखी कल्पना असून, आम्ही भारतीय वारसा स्थळांना मौल्यवान करण्याचे प्रयत्न करू’, असे पुनीत दालमिया यांनी सांगितले.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)