दिल्लीचे अधिकारी स्वछतेसाठी पांढरेवाडीत

कुरकुंभ- भारत देश दि.2 ऑक्‍टोबर 2019 पर्यंत संपुर्ण हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट्‌ ठेवण्यात आले आहे. यामुळे सर्व राज्यांत स्वछता कामाची गती देण्यासाठी राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळांचे आयोजन करण्यात येत असून याअंतर्गत प्रत्यक्ष क्षेत्रभेट नुसार दौंड तालुक्‍यातील पांढरेवाडी येथे येवून शासकीय अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना शौचायलाय, शोषखड्डे आणि त्याद्वारे तयार होणारे सोनखत याबाबत माहिती दिली.
यावेळी नियंत्रक व महालेखा परीक्षक राजीव महर्षी, पेयजल व स्वछता मंत्रालयाचे सचिव परमेश्वर अय्यर, स्वच्छ भारत मिशनचे महानिरीक्षक अक्षय राऊत, सहसचिव अरुण बरोका, समीर कुमार, सोनाली घोष या अधिकाऱ्यांसह मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे, गटविकास अधिकारी गणेश मोरे, ग्रामविकास अधिकारी अश्‍लेषा भाऊसो रोकडे यांच्यासह विविध राज्यातील 150 पेक्षा अधिक शासकीय अधिकारी तसेच पांढरेवाडी ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
याबाबत माहिती अशी की, पेयजल व स्वछता मंत्रालय, पाणी पुरवठा व स्वछता विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या सयुंक्त विद्यमाने स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत राष्ट्रीय स्तरावरील कार्यशाळेचे आयोजन पुणे येथे दि. 16 मे ते 17 मे करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या नियोजनात दौंडमधील पांढरेवाडी येथे क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते. स्वच्छतेबाबतच्या लोकांत जागृती होवून त्यामध्ये शाश्वता टिकुन राहण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. देशातील विविध राज्यांचे पाणी व स्वछता विभागाचे प्रधान सचिव, सचिव, मुख्य अधिकारी असे 150 पेक्षा अधिक शासकीय अधिकारी यामध्ये सहभागी झाले आहेत.
यावेळी राजीव महर्षी यांनी स्वतः शौचालय शोषखड्ड्यात उतरून शोषखड्ड्यांतील सोनखताचे महत्व याची माहिती उपस्थितांना दिली. यावेळी गावातील एक नादुरुस्त शौचालय दुरुस्ती व एक पूर्ण दोन शोषखड्ड्यांचे शौचालय उभारण्यात आले. शौचालय खड्ड्यातून निर्माण होणाऱ्या खताचा (सोनखताचा) वापर शेतीस केल्यास इतर सर्व खतांच्या तुलनेत याचे चांगले परिणाम असल्याचे निदर्शनास आले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)