दिलीप कुमारनी 20 कोटी भरावेत; सर्वोच्च न्यायालयाकडून सूचना

नवी दिल्ली- रिअल इस्टेटच्या एका प्रकरणामध्ये 20 कोटी रुपये न्यायालयाच्या रजिस्ट्रीमध्ये जमा करण्याची सूचना सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांना दिले आहेत. ही रक्कम चार आठवड्यांच्या आत जमा करण्यात यावी, अशी सूचनाही न्यायालयाने केली आहे.

मुंबईतील पाली हिल येथील 2,412 चौरस यार्ड जागेवर बांधकामासाठी सुमारे दशकभरापूर्वी दिलीप कुमार यांनी प्राजिता डेव्हलपर्स प्रा. लि. बरोबर करार केला होता. मात्र विकसकाकडून कोणतेच बांधकाम न झाल्यामुळे दिलीप कुमार यांनी आपल्या जागेच्या ताब्यासाठी मागणी केली. त्यावर न्या. जे. चेलामेश्‍वर आणि न्या. एस. अब्दुल नझीर यांच्या समोर सुनावणी झाली.

दिलीप कुमार यांनी डिमांड ड्राफ्टच्या स्वरुपात 20 कोटी रुपये कोर्टाकडे जमा केल्यावर प्राजिता डेव्हलपर्सने सात दिवसाच्या आत जागेवरील सर्व सुरक्षा रक्षक काढून घ्यावेत आणि जागेचा ताबा मुंबईच्या पोलिस आयुक्‍त किंवा वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दिलीप कुमार यांना द्यावा.

पोलिसांकडून सत्यस्थितीचा पंचनामा कोर्टाला सादर करण्यात यावा. त्यानंतर प्राजिता डेव्हलपर्स कोर्टाकडे जमा असलेल्या 20 कोटी रुपयांसाठी अर्ज करू शकेल, असे न्यायालयाने सांगितले. विकसक आणि दिलीप कुमार यांच्यातील पैशाच्या व्यवहाराचा तपशील निश्‍चित करण्यासाठी न्या. पी. वेंकटरामा रेड्डी यांच्या लवादाची नियुक्‍ती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)