एखाद्या वस्तूंवरून किंवा सेवेवरून दुकानदारांकडून फसवल्या जाणाऱ्या ग्राहकांना आता ग्राहक मंचाकडून एक चांगली बातमी आहे. एखाद्या कंपनीविरुद्ध पाच लाखांपर्यंतचा दावा विनाशुल्क दाखल करता येणार आहे. त्याचवेळी तक्रार दाखल करण्यासाठी न्यायालयातही जाण्याची गरज नसून एका मेलवरून संबंधित दुकानदार, व्यावसायिक, व्यापारी, कंपनीविरुद्ध तक्रार दाखल करता येणार आहे. या निर्णयामुळे ग्राहकांना एकप्रकारे दिलासा मिळाला आहे. अगोदरच दुकानदाराच्या फसवणुकीचा सामना करणारे ग्राहक हे ग्राहक मंचाकडे धाव घेण्यास उदासीन असत. मात्र, आता घरबसल्या तक्रार करता येणार आहे.
एखाद्या कंपनीविरुद्ध एक ते वीस लाखांपर्यंतचा दावा दाखल करण्यासाठी पाचशे रुपयांपर्यंतचे शुल्क जमा करावे लागत होते. मात्र, ग्राहक संरक्षण अधिनियमनुसार सरकारने शुल्क रचनेत फेररचना केली असून त्यानुसार तक्रार दाखल करणाऱ्या ग्राहकावर कमी शुल्क आकारण्याची अधिसूचना जारी केली आहे. यानुसार आता पाच लाखांपर्यंतच्या कोणत्याही खटल्यांवर एक रुपयाही फीस भरावी लागणार नाही. त्याचवेळी दहा लाखांपर्यंतच्या प्रकरणासाठी दोनशे रुपये आणि वीस लाखांपर्यंतच्या प्रकरणासाठी चारशे रुपये शुल्क भरावे लागणार आहे. ग्राहक मंचात शुल्क कमी करण्याबरोबरच सरकारने पीडित ग्राहकाला लवकरात लवकर न्याय देण्याची देखील तरतूद केली आहे.
– अंजली महाजन
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा