उपाध्यक्षपदी अनिल शेवते यांची निवड
भुईंज – भुईंज, ता. वाई येथील दिनबंधू मित्रमंडळ यांच्या सुवर्ण महोत्सवी म्हणजेच 50 व्या वर्षात राजेंद्र गायकवाड यांची अध्यक्षपदी आणि अनिल शेवते यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली. भुईंज तालुका वाई तेथील मागील 49 वर्ष कार्यरत असलेल्या दिनबंधु मित्र मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभेची मीटिंग नुकतीच भुईंज, फुलेनगर येथे घेण्यात आली. या मीटिंगमध्ये मंडळाच्या 50 व्या म्हणजेच सुवर्ण महोत्सवी वर्षासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
यावेळी दिन बंधू मित्र मंडळाच्या अध्यक्षपदी प्रगतशील आदर्श शेतकरी राजेंद्र गायकवाड यांची तर उपाध्यक्षपदी अनिल शेवते यांची निवड करण्यात आली. मंडळाचे सचिव म्हणून सतीश जायकर, सहसचिवपदी शंकर शेवते, खजिनदार शशिकांत दगडे, सहखजिनदार विठ्ठल जायकर, कार्यकारिणीच्या संचालकपदी विजय बनकर, दत्तात्रय शेवते, जगन्नाथ दगडे, किसन अडसूळ, रमेश दगडे, सुहास शेवते, बजरंग अडसूळ, महादेव बनकर, राहुल लोखंडे, संतोष जायकर, किसन शेवते, शेखर दगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
याप्रसंगी नूतन अध्यक्ष राजेंद्र गायकवाड म्हणाले की, दिन बंधू मित्र मंडळाचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असून मागील 49 वर्षांपासून दिन बंधू मित्र मंडळाने समाजपयोगी विविध उपक्रम राबवून संपूर्ण सातारा जिल्ह्यामध्ये आदर्श निर्माण केला आहे. आमच्या मंडळाने राबवलेल्या विविध कार्यक्रमांना ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी, नरेंद्र दाभोलकर, नितीन बानुगडे-पाटील,लक्ष्मण माने, लक्ष्मणराव पाटील, पी. जी. पाटील, अरुण गोडबोले, यशवंत पाटणे, डॉ. आ. ह. साळुंखे मान्यवरांनी उपस्थित राहून मंडळाच्या विविध उपक्रमाचे कौतुक केले आहे.
50 व्या वर्षी भुईंज येथे महाराष्ट्रातील माळी समाजाच्या सर्वात मोठ्या मेळाव्याचे आम्ही आयोजन करणार असून त्यानिमित्त विविध राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.50 व्या वर्षानिमित्त मंडळातर्फे प्रत्येक महिन्याला विविध समाजपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीसुद्धा या प्रसंगी मंडळाचे अध्यक्ष राजेंद्र गायकवाड आणि उपाध्यक्ष अनिल शेवते यांनी दिली. या प्रसंगी भुईंजमधील ग्रामस्थ, मान्यवर आणि सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा