फिनिक्‍स फाउंडेशन : 1840 वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करुन औषधांचे वाटप
नगर – दिंडीतील वारकऱ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यासाठी फिनिक्‍स सोशल फाउंडेशनच्या वतीने 1840 वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. शहरात दाखल झालेल्या संत निवृत्तीनाथ महाराज व श्री क्षेत्र देवगड दिंडीतील वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करुन त्यांना औषधांचे वाटप करण्यात आले.
बुधवारी किसनगिरीबाबा नगर येथे देवगड दिंडीतील वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिराचे उद्‌घाटन महंत भास्करगिरी महाराज यांच्या हस्ते झाले. यावेळी फिनिक्‍स फाउंडेशनचे अध्यक्ष जालिंदर बोरुडे, डॉ. ए. जे. खन्ना, डॉ. संजय शिंदे, सागर फुलसौंदर, डॉ. सुहास वाळेकर, मच्छिंद्र वारुळे, संजय सावंत आदी उपस्थित होते.
जालिंदर बोरुडे म्हणाले, समाजसेवेचे व्रत घेऊन फिनिक्‍स फाउंडेशन कार्य करीत आहे. गोरगरीब, वंचितांना दृष्टी देण्याची मोठी चळवळ फिनिक्‍सच्या माध्यमातून उभी राहिली असून, दर महिन्याला नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर घेतले जातात.
भास्करगिरी महाराज म्हणाले, वंचित व दीनदुबळ्यातच भगवंताचा वास आहे. समाजात नि:स्वार्थ भावनेने काम करणाऱ्यांची गरज आहे. वारकऱ्यांसाठी दरवर्षी आरोग्य शिबीर घेऊन फिनिक्‍सच्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवेचे त्यांनी कौतुक केले. आभार सागर फुलसौंदर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)