दिंडीतील टाळांना नगरी नाद …

देविप्रसाद अय्यंगार

नगर येथील काश्‍याच्या टाळांना राज्यभरातून मागणी


शेवगाव देवस्थानकडून दरवर्षी अगाऊ नोंदणी


सात कारखान्यांमधून वर्षभरात 50 ते 75 हजार टाळ जोडांची निर्मिती

नगर – आषाढी एकादशीच्या वारीसाठी दिंडीतील वारकऱ्यांची पाऊलं पंढरपुरच्या दिशेने झेपावत आहेत. ज्ञानोबा, तुकाराम आणि विठूनामाच्या जयघोषाने आसमंत दुमदुमतो, या जयघोषाबरोबरच ऐकू येणारी टाळांची किणकिण, त्यामागचा सुमधूर नाद कित्येक वेळ कानात घर करून राहतो. राज्याच्या कानाकोपऱ्यातून विठ्ठलनामाचा जयघोष होतो, पण त्याला मिळणारी टाळांची जोड आणि त्यामागचा नाद मात्र नगरी असतो. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आदी ठिकाणाहून शेकडो दिंड्या नगरमधून पंढरपूरकडे मार्गस्थ होतात. मात्र नगर मुक्‍कामी वारकरी येथील काटेगल्लीत आपली पायधूळ नक्‍कीच झाडतात. त्याचे कारणच मुळात येथे तयार होणारे काश्‍याचे टाळ हे होय.

नगरमध्ये तयार केले जाणारे काश्‍यांचे टाळ राज्यभर प्रसिद्ध आहेत. शहराच्या मध्यवस्तीत असलेल्या काटेगल्ली येथे टाळ निर्मितीचे सात कारखाने आहेत. प्रत्येक कारखान्यात रोज जवळपास 25 ते 30 टाळ जोडांची निर्मिती होते. म्हणजेच सर्व कारखान्यातून रोज 175 ते 225 टाळ जोड तयार होतात. या कारखान्यातून बाराही महिने काम सुरू असते. त्यामुळे दरवर्षी जवळपास 50 ते 75 हजार टाळ जोडांची निर्मिती होते. यातही पंचधातू आणि काश्‍याचे टाळ बनविले जातात. त्यातही काश्‍याच्या टाळांचा आवाज मंजूळ असल्याने त्यालाच जास्त मागणी असते. शिवाय भजनाचा टाळ वेगळा आणि कीर्तनाचा टाळ वेगळा असल्याने त्यासाठी वेगवेगळी निर्मिती केली जाते. शिवाय टाळ गळ्यात घालण्यासाठी लागणारी नवारीची पट्टी धरण्यासाठीचा मणी खिळ्याच्या सहायाने लावण्यासाठी तसेच भट्टीत ओतीव काम करण्यासाठी, मशीनवर घासून गुळगुळीतपणा आणण्यासाठी कारागिरांची गरज भासते. त्यामुळे त्यातून अनेकांना रोजगारही उपलब्ध होतो.

टाळ बनविणाऱ्या सात कारखान्यांपैकी बरेच कारखाने हे पिढीजात आहेत. काही कुटूंबे या व्यवसायात शतकापेक्षा अधिक काळापासून कार्यरत आहेत. काही कारखान्यांचे ग्राहकही कित्येक वर्षापासून ठरलेले आहेत. शिवाय शेगाव संस्थानसारखे ग्राहक दरवर्षी आपली मागणी नोंदवत असतात. शेगाव संस्थानच्या वतीने दरवर्षी गजानन महाराजांच्या प्रकट दिनी, आषाढी एकादशीला, कार्तिकी एकादशीला त्याचबरोबर रामनवमी ऋषीपंचमीच्या दिवशी टाळ, वीणा, पखवाजांचे मोफत वाटप करत असल्याने त्यांच्याकडून टाळ-जोडांना दरवर्षी मोठी मागणी असते. काश्‍याचे टाळ ओतीव असल्याने वजनाला जड असतात. 1 किलो वजनात कीर्तनाचे केवळ 2 टाळजोड येतात, अशी माहिती कारखानदार किशोर दुधाले यांनी दिली.

आषाढीपूर्वी चार महिने तयारी सुरू…
दिवसाकाठी प्रत्येक कारखान्यातून साधारणतः 12 ते 15 किलो काश्‍याचे ओतीव काम केले जाते. त्यातून 25 ते 30 टाळ जोडांची निर्मिती होते. अशा वर्षभराच्या मागणीसाठी हे उत्पादन परंतु असे असले तरी आषाढी वारीच्या अगोदर चार महिने टाळनिर्मितीसाठी अतिरिक्‍त एकतरी भट्टी प्रत्येक कारखान्यात लावली जाते. त्यातून अतिरिक्‍त मागणी पुरविली जाते.

भजनी मंडळे, किरकोळ व्यापाऱ्यांची गर्दी
राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाने प्रत्येक गावातील भजनी मंडळांना टाळ, हार्मोनियम पेटी, पखवाज मोफत देण्याची योजना सुरू केली आहे. काही व्यापारी जिल्हा परिषदेत निविदा भरतात. टाळ मात्र नगरमधील उत्पादकांकडून खरेदी केले जातात. शिवाय राज्यभरातील व्यापारीही किरकोळ विक्रीसाठी याच उत्पादकांकडून टाळ खरेदी करतात. वारीच्या वेळी कित्येक वारकरी पंढरपूरला जाताना एक जोड टाळ नक्‍कीच घेवून जातो, तर परतीच्या प्रवासात गावच्या भजनी मंडळासाठीही टाळजोड नेतात.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)