दाहकता! महिनाभरात टॅंकर दुपटीने वाढले

पाणीटंचाईची तीव्रता वाढली : बारामती आघाडीवर

पुणे – जिल्ह्यातील पाण्याची टंचाई वाढू लागल्याने गाव आणि वाड्यावस्त्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या टॅंकरची संख्याही झपाट्याने वाढली आहे. मागील महिनाभरात ही संख्या दुपटीने वाढली असून त्यावरून जिल्ह्यातील टंचाईची तीव्रता दिसून येते. सद्यस्थितीत सात तालुक्‍यातील 26 गावे आणि 371 वाड्यावस्त्यांसाठी 46 टॅंकरने पाणीपुरवठा सुरू असून, त्यामध्ये सर्वाधिक टॅंकरची संख्या बारामती तालुक्‍यात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्ह्यात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चारा टंचाईचा प्रश्‍न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. जानेवारीतच टॅंकरची संख्या 46 वर गेल्यामुळे प्रशासनामध्येही टंचाई कशा पद्धतीने हाताळायची याबाबत चिंता वाढू लागली आहे. परतीच्या पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे जिल्हा परिषद प्रशासनाने दोन महिन्यांपासून भविष्यातील दुष्काळाची तीव्रता लक्षात घेऊन कामाला सुरूवात केली आहे. परंतु, पाण्याचे योग्य नियोजन झाले तरच प्रशासन या दुष्काळाला तोंड देऊ शकते. त्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्ष विश्‍वास देवकाते, मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज मांढरे कंबर कसली करून टंचाई निवारणासाठी स्वतंत्र कक्ष उभारला आहे.

दरम्यान, बारामती, दौंड, पुरंदर, शिरूर, जुन्नर, आंबेगाव व इंदापूर तालुक्‍यात टॅंकर सुरू झाले आहेत. त्यामध्ये बारामती तालुक्‍यात 16 टॅंकरने 11 गावे व 140 वाड्यांतील 31 हजार 717 नागरिकांना पाणीपुरवठा केला जात आहे. त्या खालोखाल पाच गावे व 58 वाड्यांतील 25 हजार 624 नागरिकांना 13 टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे.

दौंड तालुक्‍यातील चार गावे व 63 वाड्यावस्त्यांतील 12 हजार 388 नागरिकांची तहान टॅंकरने भागवली जात आहे. आंबेगावमधील 3 गावे व 15 वाड्यांमध्ये चार टॅंकर सुरू आहेत. पुरंदरमध्ये तीन, जुन्नर तालुक्‍यात दोन तर इंदापूरमध्ये एक टॅंकर सुरू असून, या तिन्ही तालुक्‍यातील सहा गावे व सहा वाड्यांतील 8 हजार 704 नागरिकांना सहा टॅंकरने पाणी पुरवठा केला जात आहे. दरम्यान, जिल्ह्यातील गावे आणि वाड्या-वस्त्यावरील नागरिकांना टॅंकरद्वारे मिळणारे पाणी चांगले असावे, त्यासाठी आरोग्य विभागाकडून वेळोवेळी पाण्याची तपासणी करण्याबाबतच्या सूचना तालुकास्तरावरील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यातून दूषित पाण्यामुळे आरोग्याचा प्रश्‍न उद्‌भवू नये, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप माने यांनी सांगितले.

जिल्ह्यातील दुष्काळ परिस्थिती लक्षात घेता मागील दोन महिन्यांपासून पाण्याचे आणि चाऱ्याचे नियोजन करण्यात येत आहे. तसेच पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी गाव आणि वाड्यावस्त्यांवर प्लॅस्टिकच्या मोठ्या टाक्‍या पुरविण्यात याव्यात, असे आवाहन एमआयडीसीला करण्यात आले आहे. पाण्याचा अपव्यय होणार नाही, याची काळजी नागरिकांनीही घ्यावी.
-विश्‍वासराव देवकाते, अध्यक्ष, जिल्हा परिषद पुणे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)