दाव्यांसाठी खेटे थांबले!

या प्रकरणांत मागितली जाते दाद
जमिनींना आलेले सोन्यांचा भाव, हद्दीवरून असलेले वाद, सातबारा उताऱ्यामधील चुका आदी कारणांमुळे महसूल अधिकाऱ्यांकडे जमिनींच्या दाव्यांची संख्या वाढत आहे. जमिनीचा वाद, वारस नोंद, सातबाऱ्यावर नाव नोंदणी, इतर हक्कातील नाव कमी करणे, कुळ कायदा नोंद, फेरफार रद्द करणे, जमिनीवरील शासकीय बोजा रद्द करणे, अशा अनेक प्रकरणांसाठी मंडल अधिकारी, नायब तहसीलदार, तहसीलदार, प्रांताधिकारी, अपर जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी, अपर विभागीय आयुक्त आणि महसूल सचिव यांच्याकडे दाद मागितली जाते.

राज्य शासनाची ई-डिसनिक प्रणाली : घरबसल्या समजणार माहिती

पुणे – विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी आणि तहसीलदार या महसूल न्यायालयात दाखल केलेल्या अपिलांची पुढील तारीख, केसची स्थिती आणि निकालाची प्रत आदी माहिती जाणून घेण्यासाठी आता या कार्यालयांमध्ये न जाता मिळणार आहे. त्यासाठी शासनाने ई-डिस्ट्रीक इन्फॉरेमेशन सिस्टीम ऑफ एनआयसी (ई-डिसनिक) ही संगणक प्रणाली विकसित केली आहे. त्यामुळे नागरिकांना दाव्यांची माहिती घरबसल्या समजणार आहे.

एक नजर आकडेवारीवर
689
एकूण महसूल न्यायालये


3 लाख 19 हजार 427
दाखल अपिले


2 लाख 1 हजार 351
निकाली काढलेली अपिले


2 लाख 13 हजार 671
एकूण पक्षकार


25 लाख 51 हजार 425
ई डिसनिक संकेतस्थळाला भेट देणारे


4 लाख 87 हजार 614
एसएमएस पाठविले


अशी आहे नोंदणी आणि निकालाची प्रक्रिया
जमीनविषयक दाव्यांच्या माहितीसाठी राज्य शासनाने ई डिस्ट्रीक इन्फॉरेमेशन सिस्टीम ऑफ एनआयसी (ई डिसनिक) ही संगणक प्रणाली विकसित केली आहे. तहसीलदार, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त या महसूल अधिकाऱ्यांकडे दाव दाखल केल्यानंतर संबधित कारकून याची नोंद ई-डिसनिक या प्रणालीमध्ये करत आहे. यामध्ये दाव्याचा तपशील, पक्षकारांचा मोबाइल नंबर आदी माहिती भरली जाते. त्यानंतर पक्षकारांना पुढील तारीख कधी याची माहिती देणारा एसएमएस येतो. तसेच दाव्याचा निकाल लागल्यानंतर निकालाची प्रतही ई डिसनिकवर “अपलोड’ करण्यात येते. त्यामुळे निकालाची प्रतही घरबसल्या बघता येण्याची सोय उपलब्ध झाली आहे.

ई डिसनिक प्रणाली कशासाठी?
महसूल अधिकाऱ्यांकडे महिन्याला सरासरी 250 ते 300 अपिलांची सुनावणी होते. यामुळे अर्जदाराला संबधित दाव्यावर पुढील सुनावणी माहिती घेण्यासाठी संबधित महसूल अधिकाऱ्यांच्या कार्यालयात फेऱ्या माराव्या लागतात. त्यासाठी शेतकऱ्याला गावावरून या कार्यालयांमध्ये यावे लागते. अधिकाऱ्यांची अनुपस्थिती किंवा इतर कारणामुळे अनेकदा पुढची तारीख मिळते. यामुळे पक्षकारांना आर्थिक भुर्दंड बसतो. त्यांचा वेळही वाया जातो. त्याचबरोबर मनस्तापही वाढतो. नागरिकांची ही गैरसोय दूर करण्यासाठी राज्य शासनाने सर्व महसूल कार्यालयांमध्ये ई-डिसनिक ही प्रणाली सुरू केली आहे.

एका क्‍लिकवर माहिती
ऑनलाइन अपिलांची माहिती देणाऱ्या ई-डिसनिक या संगणक प्रणालीमध्ये अर्जदारांना दाव्यांची तारीख, दाव्यांची स्थिती, महसूल न्यायालयातील रोजच्या तारखा, आदी माहिती एका क्‍लिकवर उपलब्ध होते. त्यामुळे घरबसल्या ही माहिती मिळते. या सुविधेमुळे नागरिकांना दाव्याची स्थितीची माहिती घेण्यासाठी संबधित महसूल न्यायालयात चकरा माराव्या लागू नये, या मागचा उद्देश आहे. या वेबसाइटवर मिळेल माहिती www.edisnic.gov.in

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)