दारूचे दुकान निघालेच पाहिजे:खा. उदयनराजे

आमदार शिवेंद्रराजे मित्रमंडळीना समजावून सांगावे
सातारा:प्रतिनिधी
मला अन्याय सहन होत नाही.आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर अन्याय झाला तरी मी खपवून घेणार नाही. जुना मोटार स्टॅंन्ड परिसरातील दारूचे दुकान निघाले पाहिजे ही माझी स्पष्ट भूमिका आहे. जुना मोटार स्टॅंन्ड परिसरात झालेल्या तणातणीच्या पार्श्‍व्‌भूमीवर जामीन झाल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली.
ते म्हणाले मी तत्वाशी बांधील असतो आणि माझ्या भूमिकेत बदल होत नाही . जुना मोटार स्टॅंन्डचा परिसर तुम्ही स्वतः पहा तिथे ट्रक बे चे आरक्षण आहे. मंडईत महिलांचा वावर असतो. मंडईतील अतिक्रमणे निघायलाच हवीत. मी म्हणतो म्हणून नाही, तुम्ही स्वत: तेथे जाऊन पाहणी करा. भर मंडईत दारूचे दुकान असेल तर काय म्हणायचे ते एका बाजूला असेल तर ठिक आहे. मात्र इथे परिस्थितीच वेगळी आहे. इथे दाद कुणी मागायची ? अन्याय विरोधात मी नेहमीच सडेतोडपणे भुमिका मांडत आलो आहे. आणि माझ्या भुमिकेत बदल होत नाही. सर्वसामान्य असो की, अगदी आमचे बंधु शिवेंद्रसिंहराजे असो त्यांच्यावरील अन्याय कदापी खपवून घेतला जाणार नाही. येथे काही जणांनी पैशाच्या जोरावर जागा बळकावल्या आहेत. आमदार शिवेंद्रराजे यांनी आपण कोणत्या घराण्यात जन्मलो हे लक्षात घ्यावे आणि आपल्या मित्रमंडळीना समजावून सांगावे. त्यांना चार समजुतीच्या गोष्टी सांगितल्या तर बरे होईल, असे आम्हाला वाटते.
25 जणांना जामीन
सोमवारी सातारा शहरातील जुना मोटर स्टॅंड परिसरातील दंग्याप्रकरणी खा.उदयनराजे भोसले यांच्यासह 25 जणांना न्यायालयाने जामीन मंजुर केला.गुरूवारी खासदार उदयनराजे भोसले आणि 25 समर्थक सातारा येथील न्यायालयात हजर राहिले होते. दरम्यान दुपारी त्यांच्यासह 25 जणांना या दोन गुन्ह्यांत जामीन मिळाला.सोमवारी दुपारी जुना मोटर स्टॅंड येथे दारूच्या दुकानाचे अतिक्रमण काढण्यावरून खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे भोसले कार्यकर्त्यांसह समोरासमोर आले होते. यावेळी दोन्ही बाजूचे त्यांचे समर्थक मोठ्या प्रमाणात असल्याने वातावरण काही काळ तंग झाले होते. त्यामुळे परिसरात काही तणाव निर्माण झाला होता.दरम्यान पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने दोन्ही राजेंच्यातील संघर्ष टळला. याची पोलिसांनी गंभीर दखल घेत मोठा फौजफाटा तैनात केला होता. त्यानंतर पोलिसांनी जमाव बंदीचा आदेश भंग केल्याप्रकरणी दोन्ही राजेंच्या व कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. तर आ. शिवेंद्रराजे भोसले समर्थक यांनी एक तक्रार खा.उदयनराजे यांच्या विरोधात दिली होती.असे एकूण दोन गुन्हे दाखल झाले होते. या दोन्ही गुन्ह्यांसाठी गुरुवारी दुपारी खा. उदयनराजे न्यायालयात हजर राहिल होते. त्यानंतर दोन्ही पक्षाचा युक्तिवाद झाल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजुर केला. दरम्यान याचप्रकरणातील आ.शिवेंद्रराजे यांचे समर्थक रवी ढोणे यांच्यासह 7 जणांना न्यायालयाने जामीन मंजुर केला.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)