दारु न दिल्याने एकास जीवे मारण्याचा प्रयत्न

कोरेगाव भीमा दंगलीत आरोपी गणेश फडतरेवर शिक्रापूर पालिसांत गुन्हा

शिक्रापूर/कोरेगाव भीमा- कोरेगाव भीमा (ता. शिरूर) हे गाव एक जानेवारी रोजी झालेल्या दंगलीच्या कारणामुळे देशामध्ये चांगलेच चर्चेत आले असून या दंगलीमध्ये आरोपी असलेल्या माजी उपसरपंच गणेश फडतरे व त्याच्या साथीदारांवर दारू न दिल्याच्या कारणावरून एकाला रिव्हॉल्वरने मारहाण करीत शिवीगाळ दमदाटी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

माजी उपसरपंच गणेश भाऊसाहेब फडतरे, आकाश अनिल गव्हाणे, मनोज पवार, इंगळे (संपूर्ण नाव माहित नाही) तसेच एक अनोळखी (सर्व रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर) अशी गुन्हे दाखल झालेल्यांची नावे आहेत. यासंदर्भात कोरेगाव भीमा येथे रोहिदास उंद्रे यांच्या मालकीच्या असलेल्या श्री वाईन्सचे व्यवस्थापक महेश शांताराम उंद्रे (वय 38, रा. मांजरी खुर्द, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली.

महेश उंद्रे व काही कामगार हे श्री वाईन्स शॉपीच्या काउंटरवर असताना एका पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट कारमधून हे पाचजण आले. त्यापैकी गणेश फडतरे याने काउंटरवर येऊन “मी पाठविलेल्या पोरांना दारू का देत नाही?’ असे म्हणून महेश याला शिवीगार्ळें दमदाटी करण्यास सुरवात केली व यावेळी गणेश फडतरे याने महेशला शर्टाची कॉलर पकडून बाहेर ओढत आणले त्याच्या जवळील रिव्हाथल्वरने डोक्‍यात, तोंडावर मारून जखमी केले व “तुला आता संपूनच टाकतो,’ असे म्हणत महेशवर रिव्हॉल्वर रोखली त्यावेळी घाबरून गेलेला महेश झटापट करून गणेशच्या तावडीतून सुटून पळून जाऊ लागला.

त्यावेळी त्याच्यासोबत आलेल्या चार जणांनी महेशला पकडून लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. त्यावेळी गणेश फडतरे याने पुन्हा “आता याला संपूनच टाकू’ असे म्हणत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने रिव्हॉल्वरने डोक्‍यात मारण्यास सुरवात केली. त्यावेळी वाईन शॉपीमधील कामगारांनी महेशला मारेकऱ्यांच्या तावडीतून सोडविले. त्यावेळी गणेश फडतरे व त्याचे साथीदार त्यांनी आणलेल्या स्विफ्टकार मधून पळून गेले. आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न, मारहाण शिवीगाळ, दमदाटी केल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक रमेश गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गणेश

गणेश फडतरेवर यापूर्वीही गुन्हे
कोरेगाव भीमा येथे खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेला माजी उपसरपंच गणेश फडतरे हा येथील एका ग्रुपशी संबंधित असून त्याच्यावर यापूर्वी देखील कोरेगाव भीमा येथे एक जानेवारी रोजी दंगल घडविल्याबाबत तसेच त्यापूर्वी मारामारी शिवीगाळ, दमदाटीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर तो फरार झाला होता त्यानंतर त्याला अटक झालेली होती. काही दिवस कारागृहात राहून तो जामिनावर सुटून आलेला असताना आता पुन्हा गंभीर गुन्हे करून दहशत निर्माण करत असल्याचे दिसून येत आहे. शिक्रापूर पोलीस आता काय कारवाई करणार? याकडे नागरिकांचे लक्ष लागलेले आहे.

रिव्हॉल्वर येतात तरी कोठून?
शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये यापूर्वी कुरियरवाल्याला बंदुकीच्या धाकाने लुटण्याचे, सणसवाडी येथे एकाची बंदुकीतून गोळ्या घालून हत्या, शिक्रापूर येथे एकावर गोळीबार केला असल्याची घटना अलीकडील काही महिन्यांमध्ये घडली. त्यामुळे या भागात रिव्हॉल्वर येतात तरी कोठून? असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)