दारुविक्रीप्रकरणी त्या हॉटेलवर पुन्हा छापा

नारायणगाव -नारायणगाव-जुन्नर रस्त्यावरील आर्वी फाट्यावर एका हॉटेलवर सलग दुसऱ्यांदा नारायणगाव पोलिसांनी छापा टाकून अवैधरित्या विक्री करणारा 2 हजार 400 रुपयांचा दारूचा अवैध साठा व हुक्का पॉट जप्त केला, अशी माहिती सहायक पोलीस निरीक्षक अजय गोरड यांनी दिली.
उमेश गोफणे (रा. सहाणेवस्ती, वारूळवाडी, ता. जुन्नर) याच्यावर महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई), सिगारेट व अन्य तंबाखूजन्य अधिनियम 2004 कलम 4, 21नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस कॉन्स्टेबल सचिन प्रकाश सातपुते यांनी फिर्याद दिली आहे. गोरड यांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी (दि. 27) मध्यरात्रीनंतर एकच्या सुमारास हॉटेलवर बेकायदेशीर दारूविक्री होत असल्याची माहिती मिळाल्याने गोरड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक आर. व्ही. शिंदे, सुयोग लांडे, जायभाये, निखिल गोसावी, सचिन सातपुते यांनी हॉटेलवर छापा टाकला असता 2 हजार 400 रुपये किमतीची विदेशी दारू व हुक्का पॉट जप्त केला. या हॉटेलवर 19 ऑगस्टला छापा टाकून 4 हजार रुपयांचा दारूचा अवैध साठा जप्त केला होता. ही दुसरी कारवाई याच हॉटेलवर पोलिसांनी केली आहे. या पुढील तपास पोलीस हवालदार शंकर भवारी व निखील गिरीगोसावी हे करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)