दारात घाण पाणी टाकणाऱ्यावर कारवाईची मागणी

सातारा – कुमठे, ता. कोरेगाव येथे राजकीय वादातून दारात जाणीवपूर्वक गटाराचे पाणी सोडणाऱ्यावर आणि त्यास पाठीशी घालणाऱ्या सभापतींवर कारवाई करावी, अशी मागणी रहिवाशी जयसिंग बोधे यांनी केली आहे.

याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कुमठे, ता. कोरेगाव येथे बोधे कुटूंबाचे एकच घर आहे. राजकीय द्वेषापोटी येथील अनिल तुकाराम जगदाळे हे घरासमोर गटाराचे पाणी सोडत असतात. त्यामुळे घरासमोर गटाराच्या पाण्याचे डबके झाले आहे. मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी व डासांचे प्रमाण वाढले असून आरोग्याचा प्रश्‍न उभा राहिलेला आहे.

दीड वर्षांपासून जिल्हाधिकारी, उपविभागीय पोलीस अधिकारी कोरेगाव, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रारी करीत आहेत. तरीसुद्धा कोणत्याही यंत्रणेने त्यांची अद्याप दखल घेतलेली नाही. तसेच कोरेगाव पंचायत समितीचे सभापती हे त्यांच्या भावकीतील असल्यामुळे ते जगदाळे यांना पाठिशी घालत आहेत. त्यामुळे जगदाळेंची गावात दंडेलशाही वाढलेली आहे. त्यामुळे अनिल जगदाळे व पंचायत समिती सभापती यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जयसिंग बोधे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)