“दामिनी’ पथकांची शाळांकडे पाठ

पिंपरी – शहरातील शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलिसांनी “दामिनी’ पथक सुरु केले आहे. मात्र, अनेक शाळेच्या आवारात पेट्रोलिंगसाठी “दामिनी’ पथकातील कर्मचारी जात नाहीत. पेट्रोलिंग करताना महापालिका व खासगी शाळेतील मुख्याध्यापकांना भेट द्यावी. तसेच, “दामिनी’ पथकातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी महापालिकेच्या शिक्षण समितीने पोलीस आयुक्त स्मार्तना पाटील यांच्याकडे केली. त्यावर मुलींच्या सुरक्षिततेसाठी योग्य त्या उपाययोजना तत्काळ करण्याची ग्वाही पाटील यांनी दिली.

शहरातील शाळा, महाविद्यालयात मुलींच्या छेड काढण्याच्या घटना वाढल्या आहेत. अनेक वेळा मुली बदनामीच्या भीतीने तक्रार करत नाहीत. त्याचा टवाळखोर गैरफायदा घेत असल्याचे निदर्शनास आले आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्‍यकता आहे.

-Ads-

शहरात महापालिकेच्या 111 शाळा असून 527 खासगी अधिकृत शाळा आहेत. महापालिकेच्या हद्दीतील शहराचा वाढता विस्तार व “स्मार्ट सिटी’च्या दिशेने होत असलेली वाटचाल पाहता शैक्षणिक दृष्ट्या अतिशय प्रगत शहर म्हणून पिंपरी-चिंचवडचा नावलौकिक वाढत आहे. यामुळे, देशभरातून शहरात शिक्षणासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढत असून विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी महापालिका व पोलीस प्रशासनाची आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी पोलीस खात्याने रोडरोमियांवर नजर ठेवण्यासाठी विविध पथकांची नेमणूक केली आहे. मात्र, शहरातील काही ठिकाणी पथकातील पोलीस कर्मचारी जात नसल्याचे दिसून आले आहे. सध्या, या पथकात दोनच कर्मचारी आहेत. शहराचा वाढता विस्तार पाहता पथकातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्याची समितीच्या सदस्यांची मागणी आहे.

शहरातील काही ठिकाणी शाळा व महाविद्यालयाच्या आवारात अनेक टवाळखोर मुलींना त्रास देतात. काही मुली भीतीपोटी तक्रार करत नाहीत. मात्र, विद्यार्थिनींनी निर्भिडपणे पोलीस व शाळेचे मुख्याध्यापक यांच्याकडे तक्रार करावी. तसेच, तक्रार पेटीच्या माध्यमातून आलेल्या तक्रारींवर तत्काळ कार्यवाही केली जाईल. तसेच, दामिनी पथकातील कर्मचाऱ्यांची संख्या वाढविण्यात येणार आहे. शाळेप्रमाणेच शहरातील सोसायटींमध्येही तक्रार पेट्या बसविण्यात येणार असल्याची माहिती परिमंडल एकच्या पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांनी दिली.

शहरात मुलींवरील अत्याचाराच्या घटना वाढताना दिसत आहेत. सद्य परिस्थितीत शहरातील विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्‍न ऐरणीवर आहे. शहरातील पोलिसांच्या “दामिनी’ पथकातील कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे. या पथकातील कर्मचाऱ्यांना फोन केल्यास शाळेत जाऊन आढावा घेतोय, अशी माहिती देतात. मात्र, प्रत्यक्षात कुठेही नोंद केली जात नाही. तसेच, शाळेतील तक्रार पेटीतील तक्रारींची माहिती “दामिनी’ पथकातील सदस्यांनी घेतली पाहिजे. याचबरोबर, शाळेच्या आवारात पेट्रोलिंग करताना दामिनी पथकातील कर्मचाऱ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व विद्यार्थ्यांशी संवाद साधावा
– प्रा. सोनाली गव्हाणे, सभापती, शिक्षण समिती महापालिका.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)