दापोडी रेल्वे स्थानकातील वाहन तळाचा तिढा कायम

मागील वर्षापासून नूतन निविदा प्रक्रिया रखडली

दापोडी,  (प्रतिनिधी) – अवास्तव भाडे व रेल्वेच्या जाचक अटीमुळे दापोडी रेल्वे स्थानकातील वाहन तळाची नूतन निविदा प्रक्रिया मागील वर्षापासून रखडली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाचा लाखो रुपयांचा महसूलही बुडत आहे.

पुणे ते लोणावळा दरम्यानचे दापोडी रेल्वे स्थानक हे अनेक कारणांनी महत्त्वपूर्ण आहे. हजारो प्रवासी या स्थानकावरून रोज प्रवास करतात. दापोडीसह पिंपळे-गुरव, सांगवी परिसरातील नागरी वसाहत मागील 10 वर्षात मोठ्या प्रमाणात वाढली आहे. स्वस्त सेवा म्हणून सर्वसामान्य प्रवासी वर्ग रेल्वेकडे आकर्षिला गेला. लांबच्या रेल्वे प्रवासाकरीता पुणे रेल्वे विभागाच्या वतीने वाहन तळाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र हे वाहन तळ सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकले आहे.

दापोडीतील वाहन तळ मागील वर्षभरापासून नूतन निविदा अभावी बंद आहे. सध्या रेल्वे प्रवासी या वाहन तळाचा मोफत वापर करीत असून रेल्वे प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रेल्वेचा लाखो रुपयांचा महसूल बुडत आहे. 7 ते 8 लाख रुपये, अनामत रक्‍कम 57 हजार रुपये, मासिक भाडे, निविदा घेताना तीन महिन्यांचे आगाऊ भाडे अदा करणे, 20 टक्‍के विविध कर व अधिभार आदी कारणांमुळे कंत्राटदारांनी येथील वाहन तळ निविदा प्रक्रियेत भाग घेण्याकडे पाठ फिरवली आहे. 5 रुपये दिवसाला भाडे आणि साधारण चारशे ते पाचशे दुचाकी वाहने लावण्याची क्षमता असल्याने वाहन तळ भाडे, वीज बील, कामगाराचे वेतन व इतर खर्च मिळणाऱ्या उत्पन्नापेक्षा जास्त असल्याने वाहन तळाकडे कंत्राटदारांनी पाठ फिरवली आहे. कंत्राटदाराच्या खिशालाच कात्री लावणारे वाहन तळ असल्यामुळे काही कंत्राटदारांनी तीन-चार महिन्यातच पळ काढला आहे.

सध्या या वाहन तळास कोणी वाली नसल्याने रेल्वे प्रवाशांसह इतर लोक या वाहन तळाचा मोफत वापर करीत आहेत. मोफत वाहन तळ सुविधेमुळे येथील वाहने चोरीच्या घटनांतही वाढ झाली आहे. वाहन तळाचा गैरफायदा घेऊन एखादी मोठी दुर्घटनाही घडण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने येथील रखडलेला वाहन तळाचा निविदा प्रश्‍न तातडीने निकाली काढणे अत्यंत गरजेचे आहे. पुणे रेल्वे विभागाचे जनसंपर्क अधिकारी मनोज झंवर यांच्याशी या प्रकरणी संपर्क साधला असता ते उपलब्ध होऊ शकले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)