दापोडीत बेशिस्त वाहतुकीला मोकळे रान

राजश्री पवार

दापोडी – येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातील वाहतूक नियंत्रक दिवा मागील सहा वर्षांपासून बंद आहे. त्यामुळे बेशिस्त वाहतुकीला मोकळे रान मिळाले आहे. विशेष म्हणजे येथेच पोलीस चौकी आहे. या चौकापासून हाकेच्या अंतरावर दोन शाळा, रेल्वे फाटक असूनही वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष झाल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

दापोडीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक हा महत्त्वाचा चौक आहे. पिंपळे गुरव, खडकी आणि पुणे-मुंबई महामार्गाला जोडणाऱ्या या चौकात वाहनांची कायम वर्दळ असते. येथून जवळच दापोडी रेल्वे स्थानक आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी मोठ्या संख्येने या रस्त्यावरुन ये-जा करतात. परिसरातच हुतात्मा भगतसिंग विद्या मंदिर आणि स्वामी विवेकानंद विद्यामंदिर या दोन शाळा आहेत. शाळा सुटल्यानंतर या चौकात मुलांची गर्दी होते. परंतु, मुलांना या वाहतूक कोंडीतून वाढ काढताना कसरत करावी लागते. तसेच हा रस्ता सुरक्षित नसल्याने पालकांना देखील काळजी वाटते. सिग्नल बंद असल्याने मुलांना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरावा लागतो.

भाजी, फळ विक्रेते, वाहनांच्या गर्दीमुळे सतत वाहतुकीची कोंडी होते. तसेच या चौकातील रस्त्यावर खाद्यपदार्थ व चहाच्या टपऱ्या तसेच रस्त्यावरील रिक्षांच्या अतिक्रमणामुळे पायी चालणे देखील कठीण झाले आहे. सर्रास खाद्यपदार्थाच्या हातगाड्या लावून रस्त्याची कोंडी होताना दिसत आहे. येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यालाही अतिक्रमणांनी विळखा घातला आहे. या पुतळ्यांच्या देखरेखीसाठी पोलीस चौकी याठिकाणी उभारली आहे. पोलिसांनी तर रस्त्यावरच व्हॅन पार्क करून नियम धाब्यावर बसवले आहेत. महापालिका आणि वाहतूक पोलीस प्रशासनाचे या चौकाकडे दुर्लक्ष झाले आहे. बंद असलेल्या सिग्नलवर मोठ-मोठे होर्डिंग लावून राजकीय कार्यकर्त्यांनी चौकाच्या विद्रुपीकरणात भर घातली आहे.

रोडरोमिओंचा उच्छाद
येथील पीएमपीएमएलचे बस स्थानक, खाद्यपदार्थाच्या हातगाड्या, चहाच्या टपऱ्यांसमोर रोडरोमिओ ठाण मांडून असतात. परिसरातील शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींची रोडरोमिओ छेड काढतात. विद्यार्थिनींकडे पाहून गाणे म्हणणे, चित्र-विचित्र आवाज काढणे असे प्रकार सर्रास घडतात. पोलिसांनी मध्यंतरीच्या काळात शाळा, महाविद्यालयाबाहेर दिसणाऱ्या रोडरोमिओंवर कारवाईची मोहीम हाती घेतली होती. मात्र, मागील दोन महिन्यांपासून ही मोहीम बारगळली आहे. ही कारवाई पुन्हा सुरू करण्याची मागणी येथील विद्यार्थिनी करत आहेत.

या चौकात कायमच वाहतुकीची वर्दळ असते. त्यातल्या त्यात सकाळी आणि सायंकाळी या चौकात वाहतूक कोंडी होते. वाहतूक पोलीस याठिकाणी कधीच नसतात. आम्ही काही स्थानिक नागरिक पुढाकार घेवून वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करतो.
– विशाल नांदकर, स्थानिक रहिवासी.

चौकाच्या आजूबाजूला अनेक वस्त्या आहेत. तसेच शाळा देखील आहे. त्यामुळे या ठिकाणी शालेय विद्यार्थी ये-जा करतात. वाहतूक कोंडीमुळे या मुलांना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. बऱ्याच वेळा या ठिकाणी अपघात होतात. हे अपघात टाळण्यासाठी सिग्नल सुरू व्हायला हवा.
– गणेश गायकवाड, स्थानिक रहिवासी.

या चौकातील सिग्नलचा फारसा उपयोग होत नसल्याचे कारण पुढे करत वाहतूक विभागानेच येथील वाहतूक नियंत्रक दिवे बंद केले आहेत. वाहतूक कोंडी झाल्यास वाहतूक पोलीस याठिकाणी येतात. परंतु, कायम स्वरुपी वाहतूक पोलीस उपलब्ध करण्याबरोबरच वाहतूक नियंत्रक दिवा सुरू करण्यासाठी वाहतूक विभागाला येत्या पंधरा दिवसात पत्र देणार आहे.
-आशा शेंडगे-धायगुडे, नगरसेविका.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)